समग्रतेची विवेकवादी पडताळणी ‘शून्य एक मी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 12:19 PM2017-10-01T12:19:43+5:302017-10-01T12:20:04+5:30
बुक शेल्फ : ज्या देशात समता, न्याय, बंधुता हा मानवी मूल्य जपणारा संविधानिक विचारच पुरता झिरपला नाही, जिथे जात विस्तवाचे पापुद्रे खरवडल्याशिवाय मानवी उतरंडच पूर्ण होत नाही. एकीकडे सर्वच सामाजिक चळवळींच्या नाकापुढे सूत धरण्याची वेळ आली आहे, तर दुसºया बाजूस सनातनी सांस्कृतिक दहशतवाद पुरोगामी रचितांच्या भूमीत खुलेआम मेंदूत गोळ्या घालून मूल्यात्मक विचारांचे चक्रच थांबू पाहत आहेत. अशा भयावह वर्तमानात जर पी. विठ्ठलसारखा कवी ‘शून्य एक मी’ असे म्हणत असेल, आधुनिक विचार म्हणून सोडून देता येत नाही.
- श्यामल गरुड
कवी पी. विठ्ठल नव्वदनंतरच्या समूह जाणिवेचे एक अपत्य आहे. बाजारकेंद्री अर्थव्यवस्थेतील ग्राहक संस्कृती व त्याचे झालेले वस्तूकरण याचे पुरते भान बाळगून आहे. ‘कवी घरातल्या घरात होत चाललेल्या ग्लोबल उलाढाली’ आणि ‘आपले सगळेच अवयव हरवून बसलेत जगण्याचे तपशील’ ही कवीच्या खाजगी नोंदवहीतली केवळ एक सल नाही, तर समग्र पिढीची ती वेदना लिपी कवी आपल्या काव्यातून नोंदवू पाहतो. कवींची नाळ गावगाड्यातल्या कृषिकेंद्रित संस्कृतीत रुजलेली आहे, तर दुस-या बाजूस जागतिकीकरणाच्या भौतिकवादाच्या अमर्याद वावटळीत कवी भोवंडलाय. नव्वदनंतरची सर्वच मध्यमवर्गीय घुसमट कवींनी मांडली आहे.
‘नुकतेच घेतलेत मी ब्रँडेड बूट,
सवय नाही पायांना,
बिचारे गुदमरून जाताहेत माझ्या वागण्यानं’
ही अवस्था बाजारकेंद्री मूल्यधारणेचे डोहाळे लागले तेव्हापासूनची आहे. मातीतल्या सत्त्वावर पोसलेल्या पायांना आधुनिक मूल्यव्यवस्थेतल्या आंतर्विरोधात तग धरणे क्रमप्राप्त झाले होते. एकूण समूहाचे अस्तित्व व परस्परावलंबित्व आधुनिक जगण्याच्या संहितेत ग्लोबल जगण्याच्या झग्याखाली गुदमरून झाकले गेले. वैश्विक नीतिव्यवहाराची ही आधुनिक भौतिक भूक वेगवेगळ्या मार्गांनी आपल्यावर प्रस्थापित झाली. या ग्लोबल गावकुसाआतली अडीच दशकांची ही उस्तरवारी अजूनही सरली नाही. त्यात गावगाड्यातील पडझड व पुनरुत्पादनाच्या नाकेबंदीवर उभी असलेला नवभांडवलशाहीचा मेळ आपल्या बदलत्या जीवनशैलीला पार आतून हादरून टाकतोय. पूर्वापर मूल्यांना हादरे बसलेत. मुंगी उडाली आकाशी, तिने कधीतरी गिळले होते सूर्याला हा आध्यात्मिक अवकाश आता पुरता बदललाय. कवीला ही भौतिकवादाचा झगा घातलेली मुंगी आपल्या नग्नतेचे स्टिंग आॅपरेशन करील किंवा आपल्या आत्मचरित्राचा ब्लर्ब फाडेल, अशी भीती वाटते. या आध्यात्मिक मुंगीचा आता डेटा करप्ट झालाय.
कवी म्हणतो ,
‘चॅनलच्या सांस्कृतिक शॉवरखाली उभ्या आहेत मुंग्या कोणत्याच साबणानं त्या निघत नाहीयत दूर अंगावर ग्लोबालाइज्ड मळ तशा मुंग्या पसरल्यात’
कवींची आध्यात्मिक ओढ व जुन्या सतेज- निखळ जगण्याचा प्रयत्न त्याला आतल्या आत सतत ढुसण्या देत राहतो. परमार्थाच्या आध्यात्मिक डोंगरातून मला खूप-खूप उंच हाक मारायचीय, असेही तो म्हणतो किंवा ‘म्हाता-याकोता-यांची समर्थ विद्यापीठं कालबाह्य झाल्यापासून संस्कारांचं शिक्षण मिळत नाही कुठल्याच खाजगी वा सरकारी शाळा-कॉलेजात’ असे कवीमधल्या शिक्षकाला पुरते ठाऊक आहे. कवी कोवळ्या वयातल्या आठवणींचा सुटलेला पदर घेता येईल का डोक्यावर या प्रचंड ग्लोबल महाजालात? हे सातत्याने स्वत:मध्ये चाचपडताना दिसतो. कवी नातेसंबंधातील धूसर होत गेलेली चकाकी ग्लोबल चष्म्याआडून बघताना अपराधी असतो. ‘काळाच्या कासवाला थांबवता येत नसलं तरी म्हाता-या बापाचं अनादि एकटेपण इतकं का कठोर होत जातं?’ या प्रश्नाने अस्वस्थ होत जातो. त्याच्या बदललेल्या जीवनशैलीत तो बापाचे थोरपण अलगद पकडू पाहतो. कवी म्हणतो...
‘कधीतरी येतो घरी काठी टेकवत
चष्मा सावरत, कळकट मळकट
धोतरातला रापलेल्या चेह-याचा बाप
बापाची आश्वासक नजर फिरते घरभर
आणि भव्य वगैरे असणारं घर
केविलवाण दिसू लागतं
घरासारखं बापाला सजवता येत नाही
बाप घरापेक्षाही थोर असतो’
असे म्हणताना चार भिंतीआतल्या मध्यमवर्गीय सनातनी पुरुषसत्तेलाही उजागर करतो. कवींनी महासत्तेच्या दारातली असहायता भिरकावून विभ्रमाच्या अशाश्वताच्या दांभिक गंडाला नख लावले आहे. ‘शून्य एक मी’ म्हणून घेण्याइतपत निराकार, निर्गुण होऊन पाहिले; परंतु ग्लोबल गावकुसाच्या चावडीवर भरलेल्या गैबान्यांच्या शाळेत तो स्तब्ध बसलेला नाही. म्हणूनच ‘शून्य एक मी’ हा कवितासंग्रह महत्वाचा ठरतो.
शून्य एक मी (कवितासंग्रह)
कवी : पी. विठ्ठल
प्रकाशक : कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
पृष्ठे : १२८, किंमत : १५० रु.