आम्ही देणं लागतो...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 01:16 PM2017-10-08T13:16:43+5:302017-10-08T13:17:12+5:30

वर्तनाचे वर्तमान : जळत्या घरातून उड्या मारलेल्या पिलावळींना आता उरलं नाही देणं-घेणं, आपल्या डोक्यावरचे छत अन् पायातलं बळ कोणामुळे आलं याचं... गावांशी आणि गावातल्या आपल्या माणसांशी नाळ तोडताना होत नाहीत वेदना अन् मन खिन्न-विच्छिन्न...‘आम्ही देणं लागतो’ या ‘मातीचे’ आणि या मातीच्या गोळ्याला आकार देणा-या हातांचे; या संस्कारांचा पडतो कसा विसर ‘काळ’ बदलला की....! कुणाच्या तरी पायांतले ‘कुरुपं’ आणि हातांच्या ‘घट्यांवर’ पोसले हे ‘वर्तमान’ याचे राहत नाही ‘भान’ या मायावी झगमगाटात. महानगरांनी कोणत्या बेड्या घातल्या आमच्या पायात; ज्या रोखतात आम्हाला मुळांना ओल देण्यापासून..!  घ्यावा शोध, करावं ‘आत्मचिंतन’आणि पाहावे तपासून आपणच आपल्या ‘माणूस’ असण्याला...!!

We have to pay ...! | आम्ही देणं लागतो...!

आम्ही देणं लागतो...!

Next

- डॉ. गणेश मोहिते

पारावर बसलेल्या आबारावचे डोळे डबडबले. चेहरा सुकला अन् नजर पायाच्या अंगठ्यावर स्थिरावली. बसल्या-बसल्या अंगठ्याने माती उकरून खड्डा केला तरी मन भानावर नव्हतं. एरव्ही मुलगा नोकरीला लागला तेव्हापासून जाणा-या येणा-याला ऐटीत ‘रामराम’ ठोकून आपण पारावर बसलो याचे दिमाखात सुचन करायची भारी हौस. उंचापुरा गडी, मध्यम बांधा, लांबसडक टोकदार नाक, अर्ध्या नाकापासून कपाळावर गेलेला अष्टगंध, मध्यभागी बुका, गळ्यात ठळक दिसेल अशी मोठ्या मण्याची तुळशीची माळ, डोक्यावर मळकट फेटा. पाच-सहा एकर जमिनीचा मालक, पूर्वी चौकोनी कुटुंब म्हणून टुमटुमीत जगायची लागलेली सवय. कधी कुठल्या गोष्टीसाठी ओढातान नाही. पाऊसपाणी बरा असला की फिकीर नसायची. शेतीबाडीच्या दिवसात नीट शेती, घरच्या शेतातून उसंत मिळाली की बाजारहाटापुरती मजुरी व हंगाम संपला की अखंड हरिनाम सप्ताहात भजन-कीर्तन. हा वर्षभराचा नित्यनेम न चुकणारा.

‘नित्यनेम नामीं ते प्राणी दुर्लभ,
लक्ष्मीवल्लभ तयां जवळी’ 

यावर त्याची अपार श्रद्धा. अंगठ्याने खड्डा मोठा होत गेला तसं त्याला आठवलं; तरुणपणातले अपार कष्ट, मेहनतीने नवरा-बायकोने गावकुसालगतच्या पांढरीत विहीर पाडली. चार-दोन एकर भिजू लागलं. हंगामी पिकं घेऊन संसाराचा गाडा सुरळीत चालू झाला. एक मुलगा, एक मुलगी आगेमागे गावातल्या शाळेत जायची. गावातली शाळा संपली की मुलगा तालुक्याला जाऊ लागला. तालुक्याच्या ठिकाणी दोघांचे शिक्षण बापाला जड जाईल म्हणून दहावी संपली की मुलगी शिक्षणाला रामराम ठोकून शेतीबाडी, घरकामात मायीला मदत करू लागली. पुढे पोरगा बारावी पास झाला तशी आबारावची छाती दोन इंच पुढं आली. गावच्या गल्लीत त्याचं पाऊल आता माव्हत नव्हतं. पोरगा भरपूर शिकला पाहिजे असं मनोमन वाटू लागलं. ‘आपण उन्हातान्हात राबराब राबतो, मातीत खपतो, खस्ता खातो, पण हातात काय उरतं डोंबलं? किमान पोराच्या वाट्याला हे दिवस येऊ नयेत’, म्हणून नवरा-बायको दिवस-रात्र राबायची. बापजाद्यापासून कष्ट नशिबी. मागच्या दहा पिढ्यांत घरात कोणाला अक्षर ओळख नव्हती. आता ‘पोरगं शिकून नाव काढील’, ‘मोठा साहेब होईल’ या विचाराने दोघांचा हुरूप काही औरच असायचा.

पोराला दहावीलाही चांगले गुण मिळाले होते. म्हणून बारावीला शहरात ठेवले. मोठ-मोठे क्लासेस लावले. पोरगं डॉक्टर, इंजिनिअर झालं पाहिजे म्हणून आबारावने पदरमोड करून मुलीच्या लग्नासाठी जमवलेले लाख-दीड लाख रुपये त्याच्या क्लाससाठी मोजून क्लासवाल्याचे घर भरले; परंतु पोरगं मेडिकल, इंजिनिअरिंगला लागलं नाही. ‘आरक्षण’ नसल्याने आपले असेच होते; अशी बोंब मारून पोरगा मोकळा  झाला. माय-बापाला यातले काडीचे कळत नाही; याचा त्याला अंदाज होताच. नंतर त्याने पदवी घेतली. काही दिवस स्पर्धा परीक्षेचे ढोंग करून दिवस वाया घालवले. वय वाढले, पण नोकरी नाही. दरम्यानच्या काळात आबारावने हातावरचे स्थळ पाहून मुलीचे लग्न लावून दिले. भावाच्या स्वप्नांसाठी उन्हातला जोडीदार बहिणीने हसत स्वीकारला. ‘भाऊ शिकला तर माय-बापाला दिवस सुखाचे येतील,’ अशी तिची भाबडी आशा. मुलीच्या लग्नाने कर्जाचा डोंगर झाला. पोराने कुठे तरी नोकरी शोधावी म्हणून आबारावने हट्ट धरला; पण मायीचं प्रेम आडवं आलं ‘इतके वरीस शिकवलं अजून दोन वरसानं कुठं बिघडतं’ म्हणून तिने मुलाच्या स्वरात स्वर मिसळला. पुढे पोरगा आणखी शिकला. कोणती तर परीक्षा पास झाला. तेव्हा आबारावची छाती पुन्हा फुगून आली. नोकरीसाठी राज्यभरात फिरू लागला; पण नोकरी कुठेच लागेना; कारण भरायला पैसे नाहीत. हे समजलं तसं आबारावचा जीव तिळतिळ तुटायचा. लग्नाचं वय उलटून चाललं म्हणून मायीला काळजी वाटायची. सारख्या मुलाखती द्यायचा; परंतु नोकरी लागत नाही; म्हणून घरात आदळआपट करायचा. त्याच्या जीवाची घालमेल पाहून मायीला वाटायचं, ‘अंगावर किडूकमिडूकपण नाही. विकावं तरी काय? जमिनीचा तुकडा! त्यांना ते पटायचं कसं? पण सोन्यासारखं लेकरू सावलीत राहत असेल तर आपल्याला तरी काय करायची जमीन-जुमला, त्याचीच हाय त्याच्यासाठीच तर जाईल, उद्या त्योच तर हाय आपल्या ‘काठीचा आधार’ वगैरे पटवून तिनं राजी केलेच आबारावला. दोन-चार एकर काळजाचा टुकडा विकून एका ठिकाणी भरला पैसा.‘पोरगा नोकरीला लागला तो सावलीत राहील’ या विचारानं आबाराव काळ्या-आईचा तुकड्याला पारखा झाला तरी रडला नाही.

आज मात्र धाय मोकलून मोकळं होऊ पाहत होता; पण सांगावं कसं अन् कुणाला. अवघड जाग्यावरचं दुखणं. वर पाहता लोक येता-जाता बोलायाचे ‘आबारावला आता काय कमी हाय, मुलगा चांगल्या हुद्यावर गेला, महिन्याकाठी पाठवीत असेल पैसे, बसून तर खायचे तुम्हाला,’ पण तसं-तसं आबारावचं मन मनाला खायचं. गेले एक वर्ष झालं पोरानं एक रुपयासुद्धा घरी पाठवला नव्हता. नवरा-बायकोचे हात-पाय थकले. उरलेल्या एकर-दीड एकरात काम करता येत नाही अन्  बटाई केली तर हातात फुटकी कवडी पडत नाही, अशी अवस्था. पोराला नव्यानं नोकरी लागली तेव्हा सुट्टी असली की आठ-पंधरा दिसाला गावाकडं यायचा. ख्याली-खुशाली इचारून हातात खर्चासाठी चार पैसे टेकवून जायचा. पुढं लग्न झालं, शहरात घर घेतलं, गाडी घेतली, लेकरू झालं तेव्हा माय-बापाच्या आनंदाला पारावार नव्हता. गावात उठता-बसता माझं लेकरू किती गुणी; म्हणून कोडकौतुक करताना मायीचंतोंड कधी थकलं नाही; पण हळूहळू लेकरू गावाकडं महिन्याकाठी येता-येता आता तीन-चार महिन्यांत एकदाच येऊ लागलं.

‘हाफ इजार घालून घरातल्या घरात चप्पल घालून फिरू लागलं तेव्हाच ढेकळात अनवाणी फिरलेले हे पाय फितुर झाले मातीला’  हे समजले होते बापाला. गावाकडची माणसं, नातेवाईक सगळे कसे ‘गावंढळ’ झाली होती एकाएकी. शहरात आपल्या सोकॉल्ड इभ्रतीला जाऊ नये तडे म्हणून तो घेत असे सदा काळजी गावातल्या माणसांचा विषय टाळता यावा याची. गावाकडच्या कोणत्याच विषयात नसतो इंटरेस्ट आजकाल साहेबांना. पाऊसपाणी, दुष्काळ, होतं-नव्हतं यांच्याशी नसते कुठलेच सोयरसुतक. बापाचा काल फोन आला ‘गावाकडं वादळ झालं डोक्यावरची चार पतरं उडाली, चूल भिजली, घरात पाणी शिरलं... असं बोलतच होता बाप. मुलांच्या क्लास, स्कूलची फी, घराचा, गाडीचा हप्ता, बायकोचा वाढदिवस अन् पगार वेळेवर झालाच नाही या महिन्या... वगैरे अशी लंबीलाच यादी फोनवरून वाचली गड्यानं बापापुढे. अन् मोबाईलमध्ये झाली गडबड. गोठलं संवेदनांचं नेटवर्क ; शेवटी बापच तो समजला बरंच काही! मायीनंही वाचला चेहरा पाठमोराच अन् फिरवली मान सगळं कळायला शब्दच थोडी लागतात तिला ‘माय’च ती...!
तरीही तिला आलच दाटून आपलं लेकरू किती अडचणीत काढतेय दिवस शहरात म्हणून; पण आता आपण तरी काय द्यावं? आपल्याच डोक्यावरचं छप्परही उडाले देण्यासाठी उरलं काय?  
फक्त एकर भर माती; पण तीही लागेलच ना शेवटी आपण ‘माती’ व्हायला....!

(लेखक बीड येथील बलभीम महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.)

Web Title: We have to pay ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.