‘हम दो, हमारे दो और मतीन का एक !’
By गजानन दिवाण | Published: October 8, 2017 11:59 AM2017-10-08T11:59:05+5:302017-10-08T12:01:43+5:30
प्रासंगिक : दिवाळी म्हणजे आनंदाचा, प्रकाशाचा सण. दिवाळीत आपल्या घरासमोर ठेवल्या जाणाºया पणत्या हे काही केवळ शोभेचे साधन नाही. अज्ञानाचा अंधकार दूर करणारी ही पणती ज्ञानाच्या प्रकाशाने तेवत राहते तेव्हा प्रत्येक माणसामधील चांगुलपणा जगासमोर येत असतो. तसा प्रत्येक माणसामध्ये चांगुलपणा असतोच. दिवाळीच्या पणत्यांच्या प्रकाशात तो जगासमोर येतो.
- गजानन दिवाण
जालन्यातील मैत्र मांदियाळी हा ग्रुप गेल्या चार वर्षांपासून समाजातील हाच चांगुलपणा प्रकाशात आणण्याचे काम करीत आहे. विदर्भात अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा येथे ‘प्रश्न चिन्ह’ नावाच्या शाळेत पाचशेवर पारधी मुले राहतात-शिकतात. तिथेच लहानाचे मोठे होतात. कोणाचा बाप, तर कोणाची आई राज्याच्या कुठल्यातरी पोलीस ठाण्यात शिक्षा भोगत आहे. गुन्हेगारीचा शिक्का सोबत घेऊन जन्माला आलेल्या या मुलांना आधार दिला तो मतीन भोसले या तरुणाने. फासेपारधी समाजातील हा तरुण स्वत:च्या समाजातील हे भयावह चित्र पाहून व्यथित व्हायचा. स्वत:साठी आणि स्वत:च्या कुटुंबासाठी जगण्याचा त्याला तिटकारा यायचा. याच तिटका-यातून त्याने जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाची नोकरी सोडून या मुलांसाठी भीक मागितली. साध्या झोपडीत शाळा सुरू केली. अजूनही या शाळेला कुठले अनुदान नाही.
‘मैत्र मांदियाळी’ ग्रुप त्यांचा महिन्याचा किराणा भरून देतो म्हणून या मुलांचे पोट भरते. याच ग्रुपच्या माध्यमातून जमा झालेल्या निधीतून ‘प्रश्न चिन्ह’ ही फासेपारधी मुलांची शाळा आता नव्या इमारतीत भरते आहे. छताचा प्रश्न मिटला. पोटा-पाण्याचा मात्र कायम आहे. राज्यभरातील सदस्यांनी एकत्र येऊन स्थापन केलेला मैत्र मांदियाळी ग्रुप महिन्याला प्रत्येकी २०० रुपये जमा करतो. शिवाय राज्यभरातून अनेकांचे मदतीचे हात प्रत्येक महिन्याला समोर येतात. यातूनच ‘प्रश्न चिन्ह’चा प्रत्येक महिन्याचा किराणा भरला जातो. या मुलांसाठी साधारण महिन्याला एक लाख रुपयांचा किराणा लागतो. यासाठी मदत देणाºया प्रत्येकाला दर महिन्याला जमा झालेल्या प्रत्येक पैशाचा हिशेब व्हॉटस् अॅप-फेसबुकच्या माध्यमातून दिला जातो. समाजातील प्रत्येक घटक या ग्रुपशी जोडला गेला आहे. त्यामुळे महिन्याचा खर्च तर भागतो. पुढील आठवड्यात आलेल्या दिवाळीचे काय? गेल्यावर्षी या मुलांसाठी समाजातील विविध स्तरांतून तब्बल एक लाख ३७ हजार ९१० रुपयांची मदत जमा झाली. त्यामुळे या फासेपारधी मुलांची दिवाळी गोड झाली. यंदाचे काय?
बाजारात मंदी असो वा तेजी. दिवाळीत प्रत्येकाच्या घरी आपल्या मुलांना नवे कपडे घेतले जातात. घरात गोडधोड खायला होते. आतषबाजी होते. परिस्थिती नसेल तर उसनेपासने करून मुलांचा हा दिवाळीहट्ट पूर्ण केला जातो. मतीनच्या ‘प्रश्न चिन्ह’ शाळेत राहणाºया पाचशेवर मुलांचे काय? त्यांचा हट्ट कोण पूर्ण करणार? शाळेला अनुदान नाही. रोजच्या दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, तिथे मतीन एवढ्या पोरांना नवे कपडे काय घेणार आणि गोडधोड काय खाऊ घालणार? आजची आपली सामाजिक संस्कृती म्हणजे ‘हम दो, हमारे दो.’ या दिवाळीपुरती यात आणखी एकाची भर पडली तर...? आपल्या घरी दोन मुले असतील आणि त्यात या दिवाळीपुरती आणखी एकाची भर पडली, तर तो भार पेलणे फार कठीण नाही. कपडेलत्ते, गोड-धोड पदार्थ असा किती खर्च वाढेल? ‘मैत्र मांदियाळी’चे अजय किंगरे म्हणाले, एका मुलाची दिवाळी दोन हजारांत गोड होते. याचा अर्थ समाजमन जिवंत असलेले पाचशेजण समोर आले, तर ‘प्रश्न चिन्ह’मधील पाचशे मुलांची दिवाळी गोड होईल. एकट्या मराठवाड्याचा विचार केला तरी ही संख्या फार मोठी नाही. केवळ जिल्ह्यांच्या आठ शहरांतूनही प्रत्येकी एवढे दानशूर समोर आले, तर ‘प्रश्न चिन्ह’च नव्हे, तर अनाथ मुलांच्या राज्यातील अनेक शाळांतील मुले दिवाळीच्या आनंदापासून दूर राहणार नाहीत. या अनाथ मुलांची दिवाळी गोड करण्यासाठी मला फक्त ‘हम दो, हमारे दो और मतीन का एक!’ असे समजून एका मुलाचा भार उचलायचा आहे. त्यातून मिळणारा आनंद हा पैशांत न मावणारा आहे.