संपत देसाई यांना आलेल्या धमकीच्या पत्राचा सांगावा काय ?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2017 07:54 PM2017-11-06T19:54:11+5:302017-11-06T19:57:44+5:30
माणसाचं जगणं-मरणं इतकं स्वस्त झालं आहे का, असा प्रश्न पडावा अशीच सध्याची परिस्थिती आपल्या सभोवती दिसते.
- धनाजी कांबळे
माणसाचं जगणं-मरणं इतकं स्वस्त झालं आहे का, असा प्रश्न पडावा अशीच सध्याची परिस्थिती आपल्या सभोवती दिसते. जिथं जनावरं सुरक्षित नाहीत, तिथं जिवंत माणसांची काय कथा असे म्हणावे इतका माणूस स्वस्त झाला आहे. त्यातच तो जर सर्वसामान्य माणसाला स्वाभिमान देणारा, लढायचं बळ देणारा, न्याय-हक्क मिळवून देणारा असेल, तर मात्र त्याला पाण्यातच पाहणारा एक गट समाजात कार्यरत असतो, हे पुन्हा एकदा कॉ. संपत देसाई यांना आलेल्या धमकीच्या निनावी पत्राने पुढे आले आहे. अशा प्रकारची झुंड कशी रोखणार? हा खरा प्रश्न आहे.
समता, स्वातंत्र्य आणि बंधुता, न्याय यानुसार इथल्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यात उजेड यावा. सुख-समृद्धी यावी असे प्रामाणिकपणे वाटणारी माणसं हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढीच असतात. ती प्रत्येक गावागावांतही असतात. ती माणसं करत असलेले काम डोळ्यांत खुपणारेही काही महाभाग आपल्या अवतीभवती असतात, हे अशा प्रकारच्या धमकींची पत्रं आल्यावरच ख-या अर्थाने समोर येतं. तारुण्य बेचिराख करून समतामूलक, नव्या मानवी समाजाचं स्वप्न उराशी बाळगून धडपडणारी माणसं विरळीच. पण अशा हरहुन्नरी, जिवाभावाच्या माणसांना मारण्याची, त्यांना संपविण्याचा इशारा देणारी पत्रं जेव्हा निनावी धडकतात, तेव्हाच शत्रू किती लेचापेचा आहे हे समजते. धमक्यांना भीक घालणारी माणसं चळवळीत येत नाहीत. आणि एकदा चळवळीत आली की, ती घरावर तुळशीपत्र ठेवून आणि डोक्यावर कफन बांधून येतात, हे धमकी देणा-या भ्याड माणसांना नाही उमगणार... तरीही धमकीचा इशारा काय समजावा... याचा मात्र सर्वच चळवळीतील नेत्यांनी कार्यकर्त्यांनी नीट विचार केला पाहिजे.
पुरोगामी हा शब्दही आता इतका सरधोपट झाला आहे की, तो लिहितानाही क्षणभर पेनही अडखळते. आपल्या महाराष्ट्रात आणि जवळच असलेल्या कर्नाटकात डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, डॉ. एम. एम. कलबुर्गी आणि अलिकडेच पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या. त्यांचे मारेकरी अजूनही मोकाट आहेत. मात्र, तपास सुरू आहे, यापलिकडे आपली यंत्रणा सरकलेली नाही. हे सगळे सुरु असतानाच ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. भारत पाटणकर, कॉ. धनाजी गुरव, विचारवंत डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस, अॅड. असीम सरोदे आणखी काही जणांना देखील जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
सरकारने वेळोवेळी दखल घेऊन, स्वत:हून पुढाकार घेऊन या आवाज उठवणा-या माणसांना सुरक्षा पुरविण्याबाबत तत्परता दाखवली. मात्र, केवळ सुरक्षारक्षक देऊन प्रश्न सुटणार नाही, तर या मागे जी यंत्रणा, संस्था-संघटना किंवा कुणाचाही मास्टर माइंड काम करीत असेल, तर त्यांच्या मुसक्या आवळणे महत्त्वाचे आहे. परंतु, दुदैवाने सध्या तरी तसे होताना दिसत नाही. महाराष्ट्र आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, लेखक हे देखील अशा प्रकारच्या धमक्यांमुळे अस्वस्थ आहेत. ज्येष्ठ विचारवंत डॉ. कांचा ईलाया यांना केवळ धमकी नव्हे; तर त्यांच्यावर एकदा हल्लाही झाला आहे. त्यामुळे पुरोगामी, परिवर्तनवादी विचार मांडणाºया लेखक, विचारवंत, कलावंत, कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे उघडपणे समोर येत आहे. जे छानशौकी, गुडीगुडी लिहिणारे आहेत, ते तुलनेने अधिक सुरक्षित वाटावेत, किंबहुना अशांना पुरस्कार मिळावेत, त्यांचा गुणगौरव व्हावा अशी परिस्थितीही दुस-या बाजूला दिसते. परंतु जे सुधारणावादी विचार मांडतात त्यांना मात्र ‘टिपून’ ठेवले जात असल्यासारखी स्थिती दिसते आहे.
याच मालिकेत आता कॉ. संपत देसाई यांच्या नावाची भर पडली आहे. त्यामुळे सर्वहारा असलेल्या सामान्य कार्यकर्ता आणि त्याचे कुटुंब यांनी अशा विकृत आणि असभ्य धमक्यांचा सामना कसा करायचा? त्यांनी कोणाच्या भरवशावर पुन्हा सामान्यांच्या बाजूने निकराचा लढा उभारायचा? कोणतीही सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था ही समाजातील विचारी माणसांच्या योगदानातूनच आकार घेत असते, हे राज्यकर्त्यांनी विसरता कामा नये. सुधारणावादी विचार मांडणाºया कार्यकर्त्यांना धमकी देणारे लोक कोणत्या कंपूतले आहेत, हे शोधून त्यांना वेळीच रोखले पाहिजे. अन्यथा एकामागोमाग एक लाखमोलाची माणसे गमावणे महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारे आहेच, तेवढेच ते समाजाला मागे नेणारे आहे, हे सर्वांनीच समजून घेतले पाहिजे.
माणसं मारल्यावर चळवळींमधले ज्येष्ठ नेते, कार्यकर्ते, लेखक बोलायला लागतात. माणूस मारून विचार संपत नाहीत. पण आज केवळ सुविचाराची वाक्ये बोलून परिस्थिती सुधारणार नाही, तर प्रत्यक्ष उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. आपण आणखी किती लोक गमावणार आहोत? आज महाराष्ट्रात ज्यांच्याकडे आशेने बघावे असे हाताच्या बोटावर मोजता येतील, एवढेच लोक आहेत. त्यांच्यानंतर दुसरा विचारवंत, उत्तराधिकारी, कार्यकर्ता, दिशादर्शक कोण असेल, हे आता सांगता येणार नाही, अशी आपली अवस्था आहे. त्याला राजकीय पक्षांमधील घराणेशाही काही प्रमाणात सामाजिक चळवळींमध्येही शिरल्याचे एक कारण आहे. काही नेत्यांनी देखील चळवळ व्यापक न करता, तिचं नेतृत्त्व स्वत:भोवती किवा घरातील कुणातरी भोवती केंद्रीत करून ठेवलेलं आहे. त्यांनीही आता प्रतिगाम्यांचा प्रतिकार करायचा असेल, तर व्यापक भूमिका घेतली पाहिजे, हे ध्यानात घ्यावे. अन्यथा या पुढील काळात चळवळी करणे, इतके साधेसोपे असेल, असे आतातरी वाटत नाही. चळवळी व्यक्तीकेंद्री किंवा स्वकेंद्री झाल्या, तर अशा संकटाच्या वेळी इतरांना आपल्यासोबत यावे, असा आग्रह तरी कशाच्या आधारावर ठेवता येईल, याचेही आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.
कॉ. संपत देसाई यांना जे धमकीचे निनावी पत्र आले आहे. त्याची भाषा पाहता लोक कोणत्याही पातळीला जाऊन भल्या माणसांचा द्वेष करू शकतात. त्यांना पाण्यात पाहतात. त्यामुळे सरकारी यंत्रणा त्यांच्या पातळीवर जे काही करायचं ते नक्की करेल, मात्र सामाजिक चळवळीतील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी स्वत:च आपल्या संरक्षणासाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे, हे नक्की. शेवटी इतकेच म्हणता येईल...
हे खरे की आज त्यांनी,
घेतले सारेच ठेके
पण, उद्याचा सूर्य काही
त्यापुढे झुकणार नाही...!