जन्म-मृत्यूचा फेरा : कावळ्याचे भूत मानगुटीवरून कधी उतरणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:30 AM2020-02-21T11:30:20+5:302020-02-21T11:54:22+5:30
अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये ज्या प्रथा-परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहेत, त्यातील काहींना जरूर शास्त्रीय आधार आहे, परंतु काही परंपरने चालत आल्या आहेत, म्हणून त्या सुरू आहेत. जे चांगले आहे, ते समाजहिताचे म्हणून जरूर पुढे घेऊन जावे, परंतु काळाच्या ओघात जे कालबाह्य आहे ते मागे सोडून पुढे गेले पाहिजे. या प्रथा कशा सुरू झाल्या याबद्दल एका जाणकाराने दिलेले उदाहरण फारच बोलके
अंत्यसंस्काराच्या विधीमध्ये ज्या प्रथा-परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहेत, त्यातील काहींना जरूर शास्त्रीय आधार आहे, परंतु काही परंपरने चालत आल्या आहेत, म्हणून त्या सुरू आहेत. जे चांगले आहे, ते समाजहिताचे म्हणून जरूर पुढे घेऊन जावे, परंतु काळाच्या ओघात जे कालबाह्य आहे ते मागे सोडून पुढे गेले पाहिजे. या प्रथा कशा सुरू झाल्या याबद्दल एका जाणकाराने दिलेले उदाहरण फारच बोलके आहे.
त्याचे झाले असे, एका कुटुंबात सत्यनारायणाची महापूजा सुरू होती. भटजी महाराज तल्लीन होऊन सत्यनारायणाची पोथी वाचत होते. ज्यांच्या घरी ती पूजा होती, त्या कुटुंबातील लोकही तितक्याच श्रद्धेने ती कथा ऐकत होते. हे सगळे सुरू असताना जिथे पूजा सुरू होती, तिथे एक काळे मांजर प्रसादाच्या वासाने वारंवार इकडून तिकडून उड्या मारीत होते. त्याचा भटजीला त्रास होत होता. त्याने मांजराला प्रसाद खायला घालून बघितला, तरी त्याचे उड्या मारणे थांबले नाही.
शेवटी त्या भटजीने मांजराच्या पायाला दोरी बांधून त्यास चौरंगाच्या पायाला बांधून घातले व पोथी वाचन सुरू केले. हा सर्व प्रकार भटजीच्या मुलानेही पाहिला होता. पुढच्या वेळी तो दुसरीकडे एके ठिकाणी पूजा बांधायला गेला. त्यानेही तिथे आवर्जून चौरंगाला दोरी बांधून त्यास मांजराचे पिल्लू बांधून ठेवले. ते पाहून भटजीला आश्चर्य वाटले. त्याने मुलास असे का केले म्हणून विचारले तर तो म्हणाला, की मागच्या पूजेवेळीही तुम्ही असेच केले होते म्हणून मी तीच पद्धत पुढे चालू ठेवली.
आपल्या समाजातील अनेक प्रथा परंपरा अशा पद्धतीने पुढे चालत आल्या आहेत. त्या का पुढे चालवायच्या याबद्दल फारसा कोणी प्रतिप्रश्न विचारत नाही. विचारला तर त्यास समाज एक तर अतिशहाणा समजतो किंवा खुळ्यात काढतो.
गेल्या आठवड्यातील हे सदर वाचल्यानंतर कोल्हापुरातील मंगळवारपेठेतील सुबराव गवळी तरुण मंडळाजवळचा तरुण शैलेश सुहास मंडलिक यांचा फोन आला. त्यानेही हीच भावना बोलून दाखवली. काही कालबाह्य प्रथा मनाला खटकतात म्हणून बोलून दाखविल्या तर त्यावेळी तू बापाच्या खांद्यावर बसून त्यांचेच कान उपटायच्या फंदात पडू नकोस, असे बजावले जाते, असे त्याचे मत होते व बऱ्याच अंशी ते खरे होते.
रक्षाविसर्जनाला कावळ्याने नैवेद्य शिवणे ही प्रथाही अनेक वर्ष किंवा युगापासून सुरू आहे. इतक्या वर्षात आपल्या समाजाच्या मानगुटीवरून हा कावळा काय अजून उडून जायला तयार नाही. कावळ्याने नैवेद्य शिवला म्हणजे मृताच्या आत्म्याला शांती मिळाली, अशी समजूत करणे म्हणजे हे आत्मसमाधान आहे.
माणूस जिवंत असतो, तेव्हा त्याची मायेने सेवा करणे, त्याला हवे ते खायला घालणे, त्याच्यावर उत्तम औषधोपचार करणे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यातून त्याला जे समाधान मिळेल तेच सर्वांत महत्त्वाचे आहे. परंतु माणूस जिवंत असताना त्याची देखभाल आपण फारशी करत नाही, आणि मेल्यावर मात्र भला मोठा फोटो घरात लावून त्याला कायमस्वरुपी लायटिंगची माळ लावून ठेवतो.
लायटिंगची माळ लावणे सोयीचे आहे; ते आपण चटकन करतो. परंतु माणूस जिवंत असताना आजारपणात त्याची काळजी घेणे म्हटले तर ती तपश्चर्या असते. ती जे लोक करतात त्यांचे आई-वडील कधीच अतृप्त आत्मा ठेवून प्राण सोडत नाहीत. माणसाच्या रोजच्या जगण्यातही असाच विरोधाभास दिसतो. एका बाजूला घरोघरी आई-वडिलांचा आक्रोश वाढताना दिसतो.
परवा कोल्हापूरच्या तिन्ही मंत्र्यांनी जो लोकशाही दिन घेतला, त्यामध्येही मुलगा नीट सांभाळत नाही. तो त्रास देतो, अशा प्रकारच्या कौटुंबिक छळाच्या तक्रारी आल्या होत्या. मन:शांतीसाठी मंदिरातील गर्दी वाढत असताना कौटुंबिक व सामाजिक हिंसाचारही वाढताना दिसत आहे. हा दुटप्पीपणाचा व्यवहार जेव्हा कमी होईल तेव्हाच लोक कोणत्याही प्रकारच्या कालबाह्य प्रथापरंपरांच्या जोखडातून बाहेर येतील.
कावळ््याने नैवेद्य शिवण्याचा लोकांना आजही किती मानसिक त्रास होतो. ज्या कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाल्यावर नैवेद्य शिवला नाही, तर मग आता पुन्हा त्यांचे काहीतरी बरेवाईट होईल किंवा ते अशुभ असते अशी फूटपट्टी त्यास लावली आहे.
कावळ््याने नैवेद्य शिवणे या प्रथेला कोणताच शास्त्रीय आधार नाही. विश्वकोशापासून अनेक ग्रंथांत त्यासंबंधीचे काही संदर्भ शोधले तर नैवेद्य, कावळा व आत्म्याची शांती या गोष्टींची सांगड सापडत नाही. पक्ष्यांच्या प्रजातीत कावळा हा एकमेव प्राणी असा आहे की, तो उष्टे खातो. त्याने नैवेद्य शिवल्याने जर आपल्या पितरांना समाधान मिळणार असेल तर आपल्या जीवनात कावळ््याचे स्थान महत्त्वाचे असायला हवे. परंतु तसे ते नाही.
कावळा हा पक्षी तसाही समाजजीवनात बहिष्कृतच आहे. तो कोण घरी हौसेने घरी पाळलेला आढळून येत नाही. आणि समाधानाची फूटपट्टी लावायची झाल्यास निधन झालेल्या शंभरपैकी किमान ८०-९० लोकांची काही ना काही इच्छा अपुरी असतेच; म्हणजे समाधानाचाच निकष लावायचा झाल्यास त्या सर्वांचेच नैवेद्य शिवायला नकोत. परंतु तसे घडत नाही.
नैवेद्य शिवला की नाही आणि कुणाचा शिवला या दोन्ही गोष्टी संबंधित कुटुंबाला त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही प्रचंड मानसिक त्रास देणाऱ्या असतात. एखाद्याचा नैवेद्य नाहीच शिवला तर अगं बाई..अमक्याच्या राखेला नैवेद्य शिवला नाही.
काही अपशकून तरी नाही ना, अशी भीती भेटायला येणारी व्यक्ती त्या कुटुंबाला घालत असते. म्हणजे व्यक्तीचे निधन झाले म्हणून सांत्वन करून आधार देण्यापेक्षा नैवेद्य न शिवल्याची भीती जास्त दाखवली जाते. त्यादिवशी सर्व पाहुण्यारावळ्यामध्ये हाच एक गहन चर्चेचा विषय असतो. मग त्यासाठी काही शांती करून देण्याचे विधीही करून घेण्याचा सल्ला पूर्वी दिला जात असे.
कावळा आला नाही म्हणून उन्हातान्हात झाडाकडे व आभाळाकडे लोक दोन-दोन तास डोळे लावून बसायचे. आता मात्र त्यातून थोडासा समाज बाहेर येऊ लागला आहे. तो आता कावळ्याची वाट पाहत नाही.
कावळा नसेल तर मग गायीला स्मशानभूमीत आणून तिला नैवेद्य खायला देण्याची प्रथाही पाळली जाते. आता गायीला वगळून लोक थेट नदीत नैवेद्य सोडून ही प्रथा मागे टाकण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु तसे सगळीकडेच घडते असे नाही. तसे पाऊल समाजाने उचलले पाहिजे तरच हे कावळ्याचे भूत आपल्या मानगुटीवरून खाली उतरू शकेल.
-विश्र्वास पाटील
(लेखक ‘लोकमत’ कोल्हापूर आवृत्तीप्रमुख आहेत. संपर्क : ९७६३७२५२४४)