बाराव्याच्या वेळी मटणाच्या जेवणाचा आग्रह कशासाठी? - -- जन्म-मृत्यूचा फेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2020 12:39 AM2020-02-20T00:39:38+5:302020-02-20T00:41:16+5:30
अंगावर शहारे येतात. एकाच जन्मात आपल्याला आईवडील नको असतात, सख्खा भाऊ नको असतो. बहिणीशीही काही देणे-घेणे ठेवायचे नसते आणि ही सगळीच रक्ताच्या नात्याची माणसे कायमच तुमच्या वाट्याला येणार असतील, तर लोकांची काय अवस्था होईल! त्यामुळे निसर्गाने जे चक्र तयार केले आहे, ते चांगलेच आहे
- विश्र्वास पाटील
जन्माला येणारा प्रत्येक माणूस एक दिवस मरणार आहे, हे त्रिवार सत्य आहे. हे निसर्गचक्र आहे. झाडे फुलतात, फळतात, लोकांना सावली देतात, ठरावीक कालावधीनंतर त्यांची पानगळ होते. वसंत ऋतूत त्यांना पुन्हा नवी पालवी येते. झाड नव्याने फुला-फळांनी बहरते. माणसांचे जीवनचक्रही काहीसे तसेच आहे. समजा, जन्माला येणारा माणूस जर मरणच पावला नसता तर काही घडले असते, याची फक्त कल्पना करून बघा. अंगावर शहारे येतात. एकाच जन्मात आपल्याला आईवडील नको असतात, सख्खा भाऊ नको असतो. बहिणीशीही काही देणे-घेणे ठेवायचे नसते आणि ही सगळीच रक्ताच्या नात्याची माणसे कायमच तुमच्या वाट्याला येणार असतील, तर लोकांची काय अवस्था होईल! त्यामुळे निसर्गाने जे चक्र तयार केले आहे, ते चांगलेच आहे. जितनी चावी भरी है राम ने... उतना चले खिलौना...!!हे त्यामागील साधे तत्त्वज्ञान आहे. हे करताना देव आपल्यावर काही बोल लागूून घेत नाही. तो काही ना काही दोष माणसांकडेच ठेवतो. जन्माला केव्हा यावे हे जसे तुमच्या-माझ्या हातात नाही, तसेच मृत्यूही कुणाच्या हातात नाही, इतका हा व्यवहार निसर्गाशी बांधील आहे. त्यामुळे मृत्यूच्या घटनेकडेही तितक्याच नैसर्गिक भावनेने पाहायला हवे; परंतु आपल्याकडे मृत्यूच्या घटनेशी अनेक गोष्टी समाजाने जोडल्या आहेत. त्या जोडताना त्यांच्यामागे निश्चितच काही शास्त्रीय कारणे होती, आहेत, तशीच त्याला कर्मकांडाचीही मोठी जोड आहे. या कर्मकांडाला समाजाने भीती जोडली आहे. त्यामुळेच मग ही भीती आपल्या वाट्याला येऊ नये, म्हणून विविध प्रकारचे विधी आणि प्रथा-परंपरा त्याच्याशी जोडल्या गेल्या आहेत.
अलीकडील काही महिन्यांत काही भागांत एक नवीच प्रथा सुरू झाली आहे. ती आहे बाराव्याला मटणाचे जेवण पाहुण्यांनी करून वाढण्याची. बाराव्याला तोंड गोड करण्याची पद्धत होती व आजही ती सर्वत्र पाळली जाते. हे तोंड गोड करण्यासाठी बाराव्याला जाताना सर्वच पाहुणे पिशवीतून किलो-दोन किलो जिलेबी घेऊन जातात. पूर्वी पुरणपोळी किंवा अगदीच झाले तर शिरा-भात आणि आमटीचे जेवण करून तोंड गोड केले जाई. त्यामध्ये कोणताही उत्सवीपणा नव्हता; कारण कुटुंबातील व्यक्तीचे निधन झाले आहे. वातावरण दु:खद आहे. त्यामुळे त्याचे गांभीर्य कटाक्षाने जपले जाई. आपण जिलेबी घेऊन जातो; परंतु त्याचाही फेरविचार करण्याची गरज आहे. त्याचे कारण असे की, १० गावांचे १० पाहुणे १० वेगवेगळ्या दुकानांतून ही जिलेबी आणतात.
प्रत्येकजण किमान किलोभर तर जिलेबी आणतोच. या जिलेबीशिवाय काहीजण पुरणपोळ्या करून आणतात व ज्यांच्या घरी बाराव्याचे कार्य असते, त्यांनीही गोडधोड जेवणाचा बेत केलेला असतो. त्यामुळे पाहुण्यांनी आणलेली सारी जिलेबी एका मोठ्या पातेल्यात एकत्र केली जाते व ती पंगतीला वाढली जाते. त्यातील बरीच जिलेबी तशीच शिल्लक राहते. मग जेवण झाल्यावर ती कुणाला तरी वाटली जाते किंवा अन्य पद्धतीने तिची विल्हेवाट लावली जाते. आपण जिलेबी नेली म्हणजेच पाहुण्यांचे तोंड गोड होणार, या मानसिकतेतून अगोदर लोकांनी बाहेर पडायला हवे.
जाऊन भेटणे, आधार देणे, दु:खाचा भार हलका करणे हा या विधीचा मुख्य गाभा हवा; परंतु तो राहतो बाजूलाच व आपण जिलेबीसारख्या गोष्टीत अडकून राहतो. जिलेबीऐवजी घरी नंतर वापरता येईल अशा काही गोष्टी नेल्या तर त्यातून पाहुण्यांना मदत होऊ शकेल. काही लोक सुगंधित उदबत्त्यांचा पुडा नेतात. तो कधीही लावता येऊ शकतो. तोंड गोड करण्यासाठी जेवण करण्याची पद्धत असेल तर त्यात मटण कुठून घुसले हे कळायला मार्ग नाही. या कार्यक्रमासाठी जवळचे पै-पाहुणे ५०० ते ७०० रुपयांपर्यंतची रक्कम स्वखुशीने जमा करतात. त्यातून पाच-सहा, आठ किलो मटण आणून त्याचे जेवण केले जाते. गेल्याच आठवड्यात पन्हाळा तालुक्यात असा प्रकार घडला. त्यातील कुटुंबप्रमुखाला ते खटकले. त्यांच्या मते तोंड गोड करायचे असेल तर आम्ही पुरणपोळी करतो; परंतु पाहुणे ऐकायला तयार नव्हते. ह्यतसे केले तर मग आम्ही तुम्हांला मटण करून आणून वाढणार नाही, तोपर्यंत ते तुम्हांला खाता येणार नाही,ह्ण अशी विचित्र अट. म्हणजे ज्यांच्या घरी दु:खद घटना घडली आहे, त्यांना पाहुण्यांनी आणलेले मटण शिजविण्याचा व ते लोकांना करून वाढण्याचा नवा व्याप मागे लागला आहे.
बाराव्याच्या विधीला पूर्वी फक्त कुटुंब, अगदी जवळचे पाहुणे व भावकीतीलच लोक जेवायला यायचे. त्यामुळे बारावे कधी होऊन गेले हे लोकांनाही समजायचे नाही. एखाद्याच्या मृत्यूची घटना समजली की तातडीने जाऊन अंत्यसंस्कार विधीला उपस्थित राहण्यास प्राधान्य दिले जाई. त्याला जमलेच नाही तर मग लोक रक्षाविसर्जनादिवशी हमखास उपस्थिती लावायचे. त्यामुळे पुन्हा बाराव्याला फारसे कोण जात नसे; परंतु आता बाराव्याचा विधीही साखरपुड्यासारखा होत आहे. लोक मंडप घालून जेवणाचा कार्यक्रम आयोजित करीत आहेत. जेवणाचा मेनूही पुरता बदलून गेला आहे. पनीर, मिक्स व्हेजपासून बासुंदी आणि मसालेभात असे पदार्थ ताटांत येत आहेत. बाराव्याचा विधी म्हणजे सांत्वनाचा कार्यक्रम न ठरता त्याला दिवसेंदिवस उत्सवी स्वरूप येऊ लागले आहे. लोक चारशे-पाचशे लोकांचे जेवण घालू लागले आहेत. अमक्याने हा मेनू ठेवला म्हणून आपण हा ठेवू, अशी अनिष्ट स्पर्धाही लागल्याचे दिसत आहे. त्यातून प्रसंगांचे गांभीर्य मागे पडत आहे. कुणाचा मृत्यू झाला तर पाच-पन्नास हजारांचा खर्च त्याच्या कुटुंबीयांना आता सहजपणे करावा लागत आहे.
साडी आणि भ्रम
बाराव्याला आलेल्या नातलग महिलांना सर्रास साड्या घेतल्या जातात. त्या वर्षात फाटायला हव्यात म्हणून फार किमती घेतल्या जात नाहीत. वर्षात साडी फाटण्याची अट अशासाठी की, लोकांनी या गोष्टीवर फार पैसे खर्च करू नयेत. कमी किमतीच्या हलक्या साड्या घ्याव्यात; परंतु त्यातही एक गंमत अशी आहे की, समजा एखादी पाहुणी आलीच नाही तर तिच्यासाठी आणलेली साडी ज्यांच्या घरांतील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्यांना नेसू दिली जात नाही. त्यांनी ती नेसायची नसते, अशी प्रथा आहे. तिला कोणताही आधार नाही.
(लेखक लोकमत कोल्हापूर आवृत्तीप्रमुख आहेत. संपर्क : ९७६३७२५२४४)