छत्रपतींचा विचार आपल्या कृतीतून का हरवतोय?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 04:10 AM2018-02-19T04:10:30+5:302018-02-19T04:38:00+5:30
राजकीय वातावरणाने सामाजिक सलोखा ढवळून टाकला आहे. थोडस निमित्त होत आणि एकूण समाजमन कलुषित होऊन जातं. सोबत राहणाऱ्या माणसांना जातीचा आधार घेऊन वेगळं करणं राजकारण्यांना कधी नव्हे ते इतकं सोप्प झालं आहे.
राजकीय वातावरणाने सामाजिक सलोखा ढवळून टाकला आहे. थोडस निमित्त होत आणि एकूण समाजमन कलुषित होऊन जातं. सोबत राहणाऱ्या माणसांना जातीचा आधार घेऊन वेगळं करणं राजकारण्यांना कधी नव्हे ते इतकं सोप्प झालं आहे. हातातील स्मार्ट फोन सहजपणे नियंत्रित करणारा समाजातील प्रत्येक घटकाला आपल्याला भावना आणि मनावर मात्र अद्यापही नियंत्रण मिळवता आलेलं नाही. त्यामुळेच समाजातील आजही दुभंगलेपणा वारंवार उसळून येतो. यात बंधुता आणि सलोखा नाहीसा होऊन हिंसा हीच एक प्रतिक्रिया सहजपणे उमटते. पुरोगामी, प्रतिगामी या वादात माणूसपण हरवलं जात. माणसाने माणसाशी माणसारखं वागावं ही अपेक्षा बाळगणंही दुरापास्त होतं. अशा या सामाजिक असमतोलाच्या वेळी महापुरुषाचा विचार दिशा देण्याचं काम करत असतो. या विचारांमुळेच नकारात्मकता जाऊन सकारात्मकता दिसायला लागते.
आज घडीला समाजाला महापुरुषांच्या विचारांचं, त्याच्या कार्याचं काही गांभीर्य राहिलं का?? शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञानाबरोबर झपाट्याने भौतिक बदल होत असताना सामाजिक मानसिकता का त्या तथाकथित रुंदीमध्ये पडलेली आहे. शिक्षणाने सामाजिक सुधारणा होण्यास मदत होईल, असा आशावाद व्यक्त केला गेला. पण आजच वास्तव बघितल्यानंतर हा आशावाद फौल ठरतो. छत्रपती शिवाजी महाराज ते फुले-शाहू- आंबेडकर असा सामाजिक सुधारणांचा वारसा महाराष्ट्राला आणि जातीत विखुरलेल्या मानवी समाजाला मिळाला. पण तो वारसा असा जातीत विखुरलेला आहे. यात छत्रपती शिवाजी महाराजच कार्य आणि कर्तृत्व इथल्या समाजातील प्रत्येक घटकांसाठी अभिमानास्पद आहे. त्यांची थोरवी त्यांच्या कार्यातून दिसते. आजच्या परिस्थितीतही त्यांचे विचार मार्गदर्शक ठरतात. रयतेसाठी इतका आर्दशवत राजाचा वारसा मिळालेला असताना समाजाने गोंधळून का जावे??? पुन्हा मानसिक अधोगतीकडे का जावे???
काहीतरी घडतं. त्यामागची राजकीय प्रेरणा माहिती होते. पण तरीही सारासार विचार बाजूला ठेवून हिंसा घडते. जात आणि धर्माच्या आधारे वर्गवारी करून माणसांना मारलं जात. ज्या शिवाजी महाराजानी अठरापगड जातीतील माणसं सोबत घेऊन स्वराज्य उभं केलं. ज्याने जात न बघता माणसं उभी केली. स्त्रीचा आदर केला. शेतकरी, कष्टकऱ्याला जपलं. त्या राजाचा पाईक म्हणून घेणारा का निर्णायक वळणावर त्यांचा विचार विसरून जातो. का भावनेच्या आहारी जाऊन विवेक हरवून बसतो. सोशल माध्यमांवर ज्ञान पाजळणारा. का एखाद्या राजकीय प्रेरणेने भडकावलेल्या दंगलीला बळी पडतो???
घसरत चाललेल्या राजकीय नीती मूल्यांबरोबर, जोर धरत असलेली स्वार्थी वृत्ती, व्यभिचार, स्रियांवरील अत्याचार, शेतकरी आत्महत्या, शिक्षणाचे बाजारीकरण, बेरोजगारी, आर्थिक विषमतेतील वाढती दरी आणि समाजातील तेढ. असा कल्लोळ आजूबाजूला दिसत आहे. या सगळ्या परिस्थितीला राजकारण आणि राजकीय पक्षांना जबाबदार ठरवून समाजातील प्रत्येक घटक आपले उत्तरदायित्व झटकण्याचा प्रयत्न करत आहे. पण सगळ्यात मी कुठे असं स्वतःच मूल्यमापन करण्याची तसदी मात्र घेत नाही. या सामाजिक असमतोलात आपण किती जबाबदार आहोत हे, जाणून घेण्याची तसदी घेतली तर, शिवाजी महाराजांचं उठसुठ नाव घेणाऱ्या प्रत्येकाला आपल्या शिवाजी महाराजांचा विचार आपल्या कृतीतून हरवला आहे यांची जाणीव होईल. ही जाणीव होणं कदाचित नव्या समाज निर्मितीच बीज असेल.... आणि हेच रयतेच्या राजाला अपेक्षित असलेलं अभिवादनही!
- भागवत हिरेकर
(औरंगाबाद लोकमतच्या आवृत्तीमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत)