घाव मनसेवर, दुखापत भाजपाला! शिवसेनेच्या खेळीने बदलली मुंबईतील राजकीय गणिते

By Balkrishna.parab | Published: October 13, 2017 08:42 PM2017-10-13T20:42:34+5:302017-10-13T20:45:35+5:30

शिवसेनेने मुंबईतील आपले सिंहासन टिकवण्यासाठी घाव मनसेवर घातलाय. मात्र त्याची दुखापत भाजपाला झाली आहे.  आता त्याचे पडसाद पुढच्या काळात निश्चिटपणे उमटणार आहेत. 

Wounded MNS, injured BJP! Political Mathematics in Mumbai Changed by Shivsena Khel | घाव मनसेवर, दुखापत भाजपाला! शिवसेनेच्या खेळीने बदलली मुंबईतील राजकीय गणिते

घाव मनसेवर, दुखापत भाजपाला! शिवसेनेच्या खेळीने बदलली मुंबईतील राजकीय गणिते

ठळक मुद्देआज मुंबईत घडलेल्या घडामोडींमुळे अनेक राजकीय गणिते पार उलटीपालथी झालीराजकीय उलथापालथींचे केंद्र ठरली ती मुंबई महानगरपालिका आणि ही उलथापालथ घडवून आणली ती शिवसेनेनेशिवसेनेने मुंबईतील आपले सिंहासन टिकवण्यासाठी घाव मनसेवर घातलाय मात्र त्याची दुखापत भाजपाला झाली आहेत्याचे पडसाद पुढच्या काळात निश्चिटपणे उमटणार आहेत

आजचा दिवस महाराष्ट्र आणि मुंबईतील राजकारणामध्ये जबरदस्त तीव्रतेचा भूकंप घेऊन आला. नांदेडच्या निकांलांमुळे राज्यातील राजकीय वातावरण आधीच ढवळून गेले असताना आज मुंबईत घडलेल्या घडामोडींमुळे अनेक राजकीय गणिते पार उलटीपालथी झाली. या राजकीय उलथापालथींचे केंद्र ठरली ती मुंबई महानगरपालिका आणि ही उलथापालथ घडवून आणली ती शिवसेनेने. काल झालेल्या भांडुपच्या पोटनिवडुकीत विजय मिळवून भाजपा शिवसेनेच्या जवळ आल्यानंतर भाजपा नेत्यांनी मुंबईत भाजपाचा महापौर बसवण्याचे आवाज केले. मात्र भाजपाकडून तशा हालचालींना सुरुवात होण्यापूर्वीच शिवसेनेने अगदी अनपेक्षित अशी खेळी करत मनसेचे सहा नगरसेवक गळाला लावले आणि भाजपाला धोबीपछाड दिला. शिवसेनेने मुंबईतील आपले सिंहासन टिकवण्यासाठी घाव मनसेवर घातलाय. मात्र त्याची दुखापत भाजपाला झाली आहे.  आता त्याचे पडसाद पुढच्या काळात निश्चिटपणे उमटणार आहेत. 
मुंबई महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीत मिळवलेला विजय भाजपासाठी नांदेडमध्ये झालेल्या दारुण पराभवावर मलमपट्टी करणारा ठरला होता. मात्र या विजयामुळे मुंबईतील भाजपा नेत्यांच्या उत्साहाला मात्र उधाण आले होते. त्यांनी मुंबईत भाजपाचा महापौर बसवण्याची घोषणा केली. किरिट सोमय्या आदी मंडळींकडून तर शिवसेनेला थेट आव्हान देण्याचीच भाषा वापरण्यात येत होती. भाजपाचे सध्याचे एकंदरीत राजकीय वर्तमान पाहता भाजपाकडून त्या दिशेने हालचाली होणार आणि शिवसेनेचे मुंबई महानगरपालिकेतील वर्चस्व धोक्यात येणार हे निश्चितच होते. 
मात्र राजकीय अस्तित्वासाठी प्राणवायू असणारी मुंबई महानगरपालिका गमावणे परवडणारे नाही. हे शिवसेनेचे नेतृत्व जाणून आहे. त्यामुळे तातडीने हालचाली केल्या गेल्या. पण या सर्वांमध्ये सर्जिकल स्ट्राइक झाली ती मनसेवर. अगदी गुपचूपपणे कुणालाही कुणकुण लागू न देता  शिवसेनेने मुंबईतील मनसेचे सहा नगरसेवक फोडले. माजी शिवसैनिक, घरवापसी वगैरे गोड नावे त्याला दिली गेली असली, तरी पडद्यामागे नेमक्या काय हालचाली झाल्या त्याविषयी कुणीही स्पष्टपणे सांगू शकत नाही. पण आपले नगरसेवक फुटताना मनसेला मात्र काहीच करता आले नाही. राज्यातील विधानसभेपाठोपाठ मुंबईतही त्यांचा पक्ष एका सदस्यापुरताच उरलाय. एकीकडे राज ठाकरे मोदी सरकार विरोधात रान उठवत असताना दुसरीकडे मनसेवर झालेला हा आघात कार्यकर्त्यांचे मनोधैर्य खच्ची करणारा आहे.
  या सर्व प्रकारात भाजपाचा मात्र पोपट झालाय.  शिवसेनेने बाळगलेल्या गुप्ततेमुळे भाजपाला या फोडाफोडीची खबर उशिराच लागली. त्यानंतर निवडणूक आयोग, कोकण आयुक्त यांच्याकडे तक्रार केली गेली, पण तोपर्यंत जे व्हायचे ते होऊन गेले होते. मग संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी या सहाही नगरसेवकांना शिवबंधनात बांधून घेत भाजपाच्या सर्व प्रयत्नातील हवा काढून घेतली. खरंतर नगरसेवक फुटले मनसेचे. पण ही फोडाफोड रोखण्यासाठी हालचाली सुरू होत्या भाजपाच्या.  यावरून या नगरसेवकांना गळाला लावण्यासाठी भाजपाचेही प्रयत्न सुरू होते अशी शंका घेण्यास वाव आहे.  आजच्या खेळीने मुंबईमधील संख्याबळात शिवसेना भाजपाच्या खूप पुढे निघून गेली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बसवण्याची मोहीम भाजपाला तूर्तास तरी गुंडाळून ठेवावी लागणार आहे. 

Web Title: Wounded MNS, injured BJP! Political Mathematics in Mumbai Changed by Shivsena Khel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.