बाबागिरीवर हवा अंकुश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 09:52 PM2018-04-30T21:52:47+5:302018-04-30T21:53:41+5:30
ढोंगी आणि अत्याचारी बाबा आणखी किती वर्षे या देशातील जनतेची पिळवणूक करणार? येथील भोळीभाबडी जनता आणखी किती वर्षे असल्या भोंदूबाबांच्या नादी लागून आपली फसवणूक करून घेणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधी मिळतीलही की नाही, याबाबत शंका वाटते.
सविता देव हरकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
ढोंगी आणि अत्याचारी बाबा आणखी किती वर्षे या देशातील जनतेची पिळवणूक करणार? येथील भोळीभाबडी जनता आणखी किती वर्षे असल्या भोंदूबाबांच्या नादी लागून आपली फसवणूक करून घेणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे कधी मिळतीलही की नाही, याबाबत शंका वाटते. सुशिक्षिततेतून अंधश्रद्धेवर मात केली जाऊ शकते, असे वाटले होते. पण हा विश्वाससुद्धा आम्ही भारतीयांनी फोल ठरविला आहे. कारण मोठेमोठे सुशिक्षित, उच्चपदस्थ अधिकारी, एवढेच नाही तर पंतप्रधानांपासून इतर अनेक मंत्री-संत्री, राजकीय पुढारी अशा बाबांच्या दरबारांमध्ये लोटांगण घालत असतात, हे सर्वांना माहीत आहे. आणि मग याच राजकीय श्रद्धावानांचा पुरेपूर फायदा घेत हे बाबालोक आपले दुष्ट हेतू साध्य करीत असतात. बुवाबाबांचे दिवसेंदिवस वाढते प्रस्थ आणि अंधश्रद्धेचा फास भारतीय मनावर एवढा घट्ट आवळला गेलाय की तो सुटायला आणखी किती काळ लागेल कुणास ठाऊक.
आसाराम बापू नावाच्या स्वत:ला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या अशाच एका बाबाला न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपात मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. त्याबद्दल न्यायालयाचे अभिनंदन करावयास हवे. तसेच या बापूविरोधात तक्रार करणारी पीडित तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांच्या धाडसालाही दाद द्यावी लागेल. पण एवढे सगळे घडूनही लोकांचे डोळे काही उघडलेले नाहीत. बापूच्या पायाची धूळ मस्तकी लावण्याचा प्रकार काही थांबलेला नाही. याला काय म्हणावे, मूर्खपणा की लाचारी? या बापूचीही शिरजोरी केवढी बघा, आपल्यासारख्या ब्रह्मज्ञानीला अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याने पाप लागत नाही, असे हा स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू निर्लज्जपणे सांगत होता, असे या खटल्यातील एका साक्षीदारानेच न्यायालयासमक्ष सांगितले. आताही त्याची मग्रुरी थांबलेली नाही. या कथित गुरूने जेलमधून त्याच्या अहमदाबादेतील आश्रमात आपल्या भक्तगणांसोबत संवाद साधत त्यांना तत्त्वज्ञान पाजळलेच. त्याचे शिष्यही केवढे आज्ञाधारी आणि निष्ठावंत म्हणायचे. या संवादाची एक ध्वनिफीतच त्यांनी प्रसारित करून टाकली. त्यात बापू आपल्या अनुयायांना मी लवकरच बाहेर येईल, अशी खात्री देताना ऐकिवास येतो. बापूविरोधात अवाक्षरही काढलेले या शिष्यांना चालत नाही. अशा काही लोकांवर जीवघेणे हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षी रामरहीम नावाचा असाच एक बाबा गजाआड गेला. त्याची कथा आणि प्रताप सर्वांना माहीत आहे.
भारतवंशात संत-महात्म्यांची एक उज्ज्वल परंपरा आहे. पण असल्या भंपक आणि भोंदूबाबा-बुवांनी ती पार मोडित काढली. अध्यात्माचा धंदा करून त्यांनी भक्तांना पैशाने लुटलेच, शिवाय त्यांच्या आयाबहिणींची अब्रूसुद्धा वेशीवर टांगली. पण आम्ही काही सुधारण्यास तयार नाही. आज बाबा-बुवांची फार मोठी जमात भारतात निर्माण झाली आहे. आणि लाखो लोक निव्वळ अविचाराने त्यांच्या आहारी जाताना दिसतात. खेदाची बाब म्हणजे स्वत:ला सुबुद्ध म्हणवून घेणारा समाजही त्यात मागे नाही. अध्यात्म आणि राजकारणाची अभद्र युती साधण्यात आली असून, या भरवशावर हे बाबा आपले इप्सित साधताना दिसतात. थोडक्यात काय तर बाबागिरीचा धंदा या देशात मोठ्या प्रमाणात फोफावलाय आणि त्याला कारणही तसेच आहे. अत्यंत सुरक्षित असा हा धंदा असून त्यात कोट्यवधींची माया आहे; तीसुद्धा कुठल्याही गुंतवणुकीशिवाय. यासाठी फारसे श्रमही नाही. तुम्हाला केवळ लोकांच्या भावना आणि समस्यांना हात घालून त्यांना मूर्ख बनवायचे आहे. हे सर्व धर्माचे ठेकेदार आपल्यापैकी अनेकांना बिनबोभाटपणे लुटताहेत आणि आम्ही धर्मधर्म करीत त्यांच्या गुन्ह्यात सहभागी होत आहोत. यावर अंकुश घालणे अत्यावश्यक झाले असून, यासाठी लोकांना आपले डोळे उघडावे लागतील.