बाजीरावचे जाणे अपघाती की...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2018 11:38 AM2018-01-06T11:38:29+5:302018-01-06T11:39:18+5:30
गेल्या आठवड्यात नागपूर-अमरावती महामार्गावर वाडीपासून १३ किमी अंतरावर बाजीराव नावाचा तरुण वाघ अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार झाला. हा अपघात होता आणि असे अपघात होत असतात, असे सांगून आपण आपल्या मनाचे समाधान करून घेणार असलो तरी यामुळे दुभंगत चाललेली जंगले आणि वाघांसह अन्य वन्यप्राण्यांच्या स्थलांतरणास निर्माण झालेला धोका आदी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत.
सविता देव हरकरे
गेल्या आठवड्यात नागपूर-अमरावती महामार्गावर वाडीपासून १३ किमी अंतरावर बाजीराव नावाचा तरुण वाघ अज्ञात वाहनाच्या धडकेने ठार झाला. त्याच्या या अशा अपघाती मृत्यूने वनविभागाला आणि या परिसरात राहणाऱ्यां लोकांनाही मोठा धक्का बसला. कारण काही दिवसांपासून हा वाघ येथे सतत दिसत होता. बाजीराव या नावाने ओळखला जाणारा हा रांगडा वाघ कळमेश्वरकडून बोर वनपरिक्षेत्रात जात असताना हा अपघात घडला. सायंकाळी रस्ता ओलांडत असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. हा अपघात होता आणि असे अपघात होत असतात, असे सांगून आपण आपल्या मनाचे समाधान करून घेणार असलो तरी यामुळे दुभंगत चाललेली जंगले आणि वाघांसह अन्य वन्यप्राण्यांच्या स्थलांतरणास निर्माण झालेला धोका आदी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत. तसेच मानव-वन्यजीव संघर्ष भविष्यात अधिक तीव्र होणार काय? हा सुद्धा प्रश्न प्रकर्षाने जाणवतो आहे. याचे कारण असे की, ज्या ठिकाणी या वाघाचा अपघात झाला तो नागपूर-अमरावती महामार्ग अत्यंत वर्दळीचा आहे आणि हे ठिकाण नागपूर शहराच्या सीमेपासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर आहे. याचा अर्थ असा की वाघ हळूहळू शहराच्या दिशेने आगेकूच करू लागला आहे. गावांमध्ये तर त्याचे आगमन कधीचेच झाले आहे. मागील वर्षभरात चंद्रपूर, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वाघाने गुरेढोरे आणि माणसांवरही हल्ले केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यासोबतच शेतकऱ्यांनी वन्यप्राण्यांपासून पिकांच्या रक्षणाकरिता तारेच्या कुंपणात वीजप्रवाह सोडल्याने वर्षभरात सात वाघ मृत्युमुखी पडले आहेत. बाजीराव तर जंगलातून चक्क महामार्गावर आला होता. तो तेथे कसा आला? हा प्रश्न अधिक गंभीर असून त्याचे उत्तर शोधण्यासोबतच त्यावर त्वरित ठोस उपाययोजना करणे आता गरजेचे झाले आहे.
वाघ संवर्धनासाठी होत असलेल्या प्रयत्नांमुळे विदर्भात वाघांची संख्या वाढली आहे आणि या संख्यावाढीसोबतच स्वाभाविकपणे त्यांचे स्थलांतरणही वाढले आहे. एका वनक्षेत्रातून दुसऱ्या वनक्षेत्रात जाण्याकरिता त्यांना शेतशिवार, गावे आणि महामार्ग ओलांडावे लागतात. पण सुरक्षित कॉरिडोरअभावी हा प्रवास त्यांच्यासाठी अत्याधिक धोकादायक झाला आहे. जंगलांच्या संलग्नतेअभावी बरेचदा हा वाघ कोंडीत सापडतो आणि लोकांच्या रोषाचा बळी ठरतो. नागपूर जिल्ह्यातील सिंदविहिरी येथे विजेचा धक्का लागून एका वाघिणीचा मृत्यू झाल्याचे प्रकरण अजूनही ताजे आहे. मानवावरील हल्ल्यांमुळे नरभक्षक ठरविण्यात आलेल्या या वाघिणीला चंद्रपुरात आणून बोर अभयारण्यात सोडण्यात आले होते. सुरक्षित अधिवासाच्या शोधात ती भरकटत होती. वनविभागाचे शूटर तिच्या मागावर होते. पण तत्पूर्वीच तिचा असा करुण अंत झाला. अलीकडच्या काही काळापासून अशाप्रकारच्या घटना वाढण्यामागे जी अनेक कारणे सांगितली जातात त्यात नष्ट होत चाललेले कॉरिडोर हे महत्त्वाचे कारण आहे. राष्ट्रीय महामार्गांचे चौपदरीकरण, असंख्य खाणी आणि प्रकल्पांमुळे वन्यजीवांना जोडणारे कॉरिडोर धोक्यात आले आहेत, हे नाकारून चालणार नाही. मध्य भारताचा विचार केल्यास येथील विविध व्याघ्रप्रकल्प आणि अभयारण्यांना जोडणारे १६ कॉरिडोर असून त्यापैकी निम्मे घोक्यात आहेत. वन्यप्राणी याच कॉरिडोरच्या माध्यमाने एका जंगलातून दुसऱ्या जंगलात जात असतात. वन्यप्राण्यांचेही सहजीवनाबाबत काही नियम आहेत.
वाघ असो वा अन्य वन्यप्राणी ते प्रजनन काळात साथीदाराच्या शोधात दुसऱ्या जंगलात जात असतात. याशिवाय जंगलांच्या क्षमतेपेक्षा वाघांची संख्या वाढली की त्यापैकी काहींना दुसरे निवासस्थान शोधावे लागते आणि कॉरिडोर हा यातील महत्त्वाचा दुवा आहे. परंतु हा दुवाच तुटत असल्याने जंगलांमधील अतिक्रमण आणि गर्दी वाढली आहे. परिणामी महाराष्ट, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश या क्षेत्रातील वन्यप्राण्यांच्या मुक्त हालचालींवर गदा आली आहे. याचा अर्थ वाघांच्या स्थानांतरणाचे प्रयोग यशस्वी होतच नाहीत असेही नाही. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील एका वाघिणीने सुमारे ११० किमीचे अंतर पार करून उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यात प्रवेश केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. यापूर्वीही नागझिरा अभयारण्यातील जय, प्रिन्स, अल्फा यांनी तेथून बाहेर पडत यशस्वीपणे दुसरा अधिवास शोधला होता. परंतु भविष्यात बाजीरावसारखे अपघात घडू नयेत आणि वाघांना शहरापर्यंत येणे भाग पडू नये यादृष्टीने तातडीने दीर्घकालीन उपाय करावे लागतील, हेही तेवढेच खरे!