परीक्षांचे निकाल आणि...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 11:23 AM2018-06-14T11:23:47+5:302018-06-14T11:23:59+5:30
शिक्षण ही एक नैसर्गिक कृती आहे हे आम्ही समजून घेतले पाहिजे, तसेच आयुष्याची गणिते ही गुणांमुळे नव्हे तर गुणवत्तेतून सोडविली जाऊ शकतात, हेसुद्धा आम्हाला कळायला हवे.
सविता देव हरकरे
नागपूर:
माझ्या एका मैत्रिणीच्या मुलाला दहावीत ९४.८ टक्के गुण मिळाले तेव्हा तिच्या कुटुंबात जो आनंदोत्सव साजरा झाला होता तो आजही स्मरणात आहे. आपल्या मुलाने जणुकाही आयुष्यातील सर्वोच्च शिखरच पादाक्रांत केले असल्याची भावना होती. हा आनंद स्वाभाविकच होता. कारण या कुटुंबाच्या अख्ख्या पिढ्यांमध्ये आजवर कुणीही एवढी मजल मारली नव्हती. ९० टक्क्यांच्या आसपासही कुणी पोहोचले नव्हते. मुलाने पुढे काय करायचे, यावर कुटुंबीयात चर्चा झाली. अखेर जेईई देऊन आयआयटीतून इंजिनिअर व्हायचे असे ठरले. स्पर्धा परीक्षेसाठी उत्तमोत्तम शिकवणी वर्गाचा शोध सुरू झाला. चांगल्या शिकवणी वर्गात प्रवेश म्हणजे शुल्कही जास्तच (दोन ते अडीच लाख) असणार. कुटुंब मध्यमवर्गीयच. पण मुलगा एवढ्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यावर त्याच्या करियरपुढे पैशांचे मोल नव्हते. दोन अडीच लाख खर्चून शिकवणी लावण्यात आली. दोन वर्ष मैत्रीण आणि तिच्या कुटुंबीयांनी मुलाची सर्वतोपरी काळजी घेतली. त्याला कुठल्याही गोष्टीची कमी पडू दिली नाही. बारावी आणि इंजिनिअरिंगची स्पर्धा परीक्षा आटोपल्यावर सर्वजण मोठ्या आतुरतेने त्याच्या निकालाची प्रतीक्षा करीत होते. निकालानंतर काय यावर गप्पा सुरू असताना घरातील आज्जी तर नातवासोबत अमेरिकेतही पोहोचल्या. अमेरिकेत मोठ्या पॅकेजची नोकरी, गाडी बंगला... पण... निकाल आला तसा या कुटुंबावर फार मोठा दु:खाचा डोंगर कोसळला. मुलाला बारावीत फक्त ६७ टक्के गुण मिळाले होते. जेईईमध्ये तर तो उत्तीर्णही झाला नव्हता. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न हे अघटित कसे घडले? दहावीत ९४ टक्के घेणारा बारावीत एवढे कमी गुण कसा मिळवू शकेल? मग प्रश्नच चुकीचे विचारले होते, उत्तर पत्रिका तपासण्यात प्रचंड गोंधळ असतो, अशी एक ना अनेक कारणे समोर यायला लागली. आता पुढे काय? रिपिट करतो हा मुलाचा हट्ट. पूर्वी ड्रॉप घेत असत तसे आजकाल रिपिटचे फार फॅड आहे. रिपिट म्हणजे पुन्हा शिकवणी, नवा खर्च... पण रिपिट करू द्यायचे असा निर्णय झाला. या वेळेला काही कारणाने नसेल जमले, पुढल्या वेळी जमेल, अशी आशा... दुसऱ्या वर्षीच्या निकालातही काही फारसा फरक पडला नाही. अखेर बी.कॉम.ला प्रवेश घेतला.
ही घटना सांगण्याचा उद्देश हा की सध्या अनेक कुटुंबांमध्ये ही परिस्थिती आहे. दहावीचे निकालसुद्धा नुकतेच लागलेय. यंदा राज्यातील १२५ विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळालेत. धक्कादायक म्हणजे चार हजारावर शाळांचा निकालही १०० टक्के लागलाय. निकालाच्या टक्केवारीत नागपूर विभागाने मात्र शेवटचा क्रमांक पटकाविला. अमरावती विभाग नागपूरच्या पुढे आहे. नागपूर विभागात जवळपास ८०,००० विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत तर साडे तीन हजारावर मुलांना ९० टक्क्यांवर गुण मिळालेत. सर्व गुणवंतांचे मनापासून कौतुक. पण हे अभिनंदन करीत असताना मनात सहज विचार येतो; यापैकी नेमके किती विद्यार्थी बारावीत व त्यानंतरच्या स्पर्धा परीक्षांमध्ये एवढेच यश संपादित करतात. अलीकडच्या काही वर्षांपासून गुण फुगवट्याचा जो ‘ट्रेंड’ आलाय त्याने विद्यार्थी आणि विशेषत: पालकांना पार हुरळून टाकलेय. या गुणरंजनात ते एवढे गुरफटतात की बरेचदा मग गुणवत्तेचे भानच राहात नाही. आज शिक्षण ही एक बाजारपेठ झालीय. उत्तम शिक्षण म्हणजे भरपूर गुण हे एक समीकरण झाले असून शिक्षणातून गुणवत्तेचा विकास करण्याचा हेतू पार मागे पडलेला दिसतोय. दुसरे महत्त्वाचे असे की या ‘गुण’गानात जी मुले कमी गुण प्राप्त करतात अथवा अपयशी ठरतात त्यापैकी अनेक मुख्य प्रवाहातून बाहेर पडतात. नैराश्याच्या गर्तेत सापडतात. हा खेळ कुठेतरी थांबला पाहिजे. पुढील वर्षापासून गुणांची ही खैरात बंद करण्याचा विचार शिक्षण मंडळ करतेय, हे फार चांगले झाले. अंतर्गत मूल्यांकन पद्धतीने निकाल प्रचंड वाढलाय. पण विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा कस लागत नाही, ही बाब मंडळाच्या लक्षात आली यात आनंद मानायचा. त्यामुळे यापुढे गुणांवर नव्हे तर गुणवत्तेवर भर दिला जाईल, अशी अपेक्षा आहे. जगप्रसिद्ध इन्व्हेस्टमेंट गुरू वॉरेन बफेट यांनी सांगितलय, यशासाठी शाळेचे वर्ग करणे किंवा टॉपर असणेच आवश्यक नाही. खुद्द बफेट यांनासुद्धा हार्वर्डमध्ये प्रवेश मिळाला नव्हता, हे विशेष! बिल गेटस् आणि मार्क झुकेरबर्ग हे दोघेही पदवीधर नाहीत. हार्वर्डमधून अर्धवट शिक्षण सोडून बाहेर पडले. पण यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचले. याला काय म्हणायचे? गेटस् एकदा म्हणाले होते, मी कधीच टॉपर नव्हतो पण आज सर्वश्रेष्ठ विद्यापीठातील ‘टॉपर्स’ माझे कर्मचारी आहेत.
एकदा काही शिक्षक आचार्य विनोबा भावे यांना भेटण्यास गेले होते. चर्चेअंती या शिक्षकांनी विनोबांकडे आग्रह केला, आम्हाला काही तरी संदेश द्या. विनोबांनी त्यांना प्रश्न केला,‘तुम्ही सर्व काय करता?’ शिक्षक उत्तरले, ‘आम्ही शिकवतो.’ यावर विनोबा म्हणाले, ‘मग शिकवू नका.’ हा सल्ला ऐकून सर्व शिक्षक अचंबित झाले. हा कुठला सल्ला? आम्ही शिक्षक आहोत. मग शिकवायचे नाही तर काय करायचे? शिक्षकांचा प्रश्न. तेव्हा विनोबाजी म्हणाले, शिकणे ही एक नैसर्गिक कृती आहे आणि शिकविणे कृत्रिम असते. मुलांना शिकवू नका, त्यांना शिकू द्या. तुम्ही फक्त त्यांना शिकण्यास सहकार्य करा. पण आज आपण काय बघतोय. मुलांना केवळ जास्तीतजास्त गुण कसे प्राप्त करायचे हे शिकविल्या जातेय. शिक्षण ही एक नैसर्गिक कृती आहे हे आम्ही समजून घेतले पाहिजे, तसेच आयुष्याची गणिते ही गुणांमुळे नव्हे तर गुणवत्तेतून सोडविली जाऊ शकतात, हेसुद्धा आम्हाला कळायला हवे.