बलात्कारी संस्कृती थोपवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 11:01 IST2018-04-20T11:01:05+5:302018-04-20T11:01:05+5:30
एका आठ वर्षाच्या निरागस बालिकेवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करणे, हीच का तुमची संस्कृती?

बलात्कारी संस्कृती थोपवा
सविता देव हरकरे
नागपूर:
भारतवंशातील उज्ज्वल परंपरा, येथील सर्वसमावेशक आणि सभ्य संस्कृती, सद्भाव याचे गुणगान आम्ही जगभरात गात असतो. भारतासारखी संस्कृती जगाच्या पाठीवर कुठेही सापडणार नाही, असा दावाही करायला आम्ही मागेपुढे बघत नाही. ज्या जगात आम्ही मोठ्या पुरुषार्थाने हे ढोल बडवत आलोय ते जग आज आम्हाला विचारतेय, एका आठ वर्षाच्या निरागस बालिकेवर पाशवी अत्याचार करून तिची हत्या करणे, हीच का तुमची संस्कृती? नोकरीच्या शोधात घराबाहेर पडलेल्या अल्पवयीन मुलीवर सत्ताधारी पक्षाचा आमदार लैंगिक अत्याचार करतो आणि तिने या अन्यायाला वाचा फोडली म्हणून तिचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त करू पाहतो, हीच का तुमची संस्कृती? आणि यापेक्षाही अमानवीय आणि भीषणता ही की समाजातील या विकृतीचे काही तथाकथित मोठे लोक निर्लज्जपणे समर्थन करतात, आरोपींच्या बचावाचा प्रयत्न करतात, हीच का तुमची संस्कृती? अखेर ही पाशवी बलात्कारी संस्कृती या देशात एवढी फोफावतेय कशी?
पुढारलेपणाच्या, स्री-पुरुष समानतेच्या मोठ्यामोठ्या गप्पा मारणारे लोक आता कुठे गडप झाले? एक पीडित मुलगी तिच्यावरील अत्याचाराला वाचा फोडते तेव्हा तिच्या मदतीला धावण्याऐवजी येथील पोलीस यंत्रणा तिच्या वडिलांनाच बेदम मारहाण करते, एवढी अमानुष की त्यात तिच्या निर्दोष पित्याचा जीव जातो. या देशात जे काही सुरू आहे ते अत्यंत अस्वस्थ करणारे आणि चीड आणणारे आहे. पण गेंड्याचे कातडे परिधान केलेल्या येथील राजकीय पुढाऱ्यांना मात्र त्याच्याशी जणू काहीही सोयरसुतक नाही. उलट अशा घटनांकडेही राजकीय आणि धार्मिक दृष्टिकोनातून बघण्याचा नीचपणा हे पुढारी आणि त्यांचे राजकीय पक्ष करताना दिसतात. अत्याचाराच्या या दुर्दैवी घटनांमधूनही आपली राजकीय पोळी कशी शेकता येईल, हाच त्यांचा कुटील डाव असतो. बलात्कार तर होणारच! मुली तोकडे कपडे घालतील, रात्रीबेरात्री फिरतील तर त्यांना बघून पुरुषांच्या भावना चाळवणे स्वाभाविकच, अशी उद्दामपणाची विधाने करणारे महाभाग राजकीय पुढारी आपल्या येथे आहेतच. त्यांना एकच प्रश्न विचारावासा वाटतो, कठुआतील ती अवघ्या आठ वर्षांची चिमुकली किंवा पुरुषी वासनेच्या बळी पडलेल्या तिच्यासारख्या लहानलहान मुलींनी पुरुषांना आकर्षित करण्यासाठी यापैकी असे काय केले होते की तिला सुद्धा नराधमांनी सोडले नाही. उन्नावमधील त्या पीडित मुलीची तरी काय चूक होती? बलात्काराची एखादी घटना घडली की त्याचे खापर पीडितेच्याच डोक्यावर फोडून मोकळे व्हायचे, हेच आम्ही पिढ्यान्पिढ्या करत आलो आहोत. देशात फोफावत चाललेली ही विकृती, ही बलात्कारी संस्कृती थोपविण्याच्या दृष्टीने आम्हाला काहीच करावेसे वाटत नाही काय? की महिलांनाच आता स्वत:च्या संरक्षणासाठी शस्त्र हाती घ्यावे लागेल?
कठुआ येथील घटनेचे वास्तव तर क्रौर्याची परिसीमा गाठणारे आहे. तसेच बलात्कार हे केवळ लैंगिक विकृतीमुळेच होत नाहीतर धर्मांधता, जातीयवाद, गटवाद ही सुद्धा यामागील कारणे आहेत, हे सुद्धा या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. ही चिमुकली जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यातील रासना भागात वास्तव्याला असणाऱ्या एक अल्पसंख्याक भटक्या समाजातील आहे. हा समुदाय आपल्यातच जगणारा. पण हा देश म्हणजे स्वत:ची जहाँगीर समजणाऱ्या काही मस्तवालांना या समाजाचे तेथे राहणे खटकत होते. त्यांना हुसकावून लावण्यासाठी मग हा भीषण कट रचण्यात आला अन् ही चिमुरडी त्यांचे लक्ष्य ठरली. एखादा समुदाय, समाज अथवा कुटुंबावर सूड उगवायचा असला की स्त्रीच त्याची बळी ठरते, हे सभ्य म्हणविणाऱ्या आमच्या संस्कृतीसाठी नवीन नाही. स्त्रियांवर बलात्कार करून सूड उगविण्याच्या अनेक घटना वर्षानुवर्षे घडल्या आहेत. येथील पुरुषसत्ताक समाजात शारीरिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा अशक्त असलेली स्त्री नेहमीच सॉफ्ट टार्गेट राहिली. बलात्काराचे शस्त्र वापरून तिला शरीराने आणि मनानेही पार मारून टाकायचे. तिचा आत्मसन्मान चिरडून टाकायचा, हे आजवर घडत आलेय. दहशत माजविण्यासाठी एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार करून तिचा बळी घेताना त्यांचा आत्मा थोडाही विचलित झाला नसेल काय? त्यांना आपल्या घरातील आईबहिणी, मुलींची किंचितही आठवण झाली नसेल काय? या साऱ्या कटात पोलिसांनाही सामील करून घेण्यात आले. अपहरणानंतर आठवडाभर या निष्पाप बालिकेसोबत जे घडले ते सैतानालाही लाजविणारे होते.
या देशात कायद्याचा काहीच जरब राहिलेला नाही हे सुद्धा यानिमित्ताने उघड झाले. येथील पोलीस यंत्रणा भ्रष्टाचाराच्या वाळवीने पार पोखरली गेली आहे. पैशांचा लोभापायी आपले इमान विकण्याची आणि यासाठी कितीही मोठे पाप करण्याची जराही भीती वा शरम पोलिसांना राहिलेली नाही. उन्नाव प्रकरणात तर पोडितेला छळणारा एक आमदार आणि त्याचा भाऊच आहे. राजकीय पाठबळ आणि पैशाच्या बळावर आम्ही केव्हाही कुठल्याही स्त्रीवर अत्याचार करू शकतो. आम्हाला अडविण्याची ताकद कुणातच नाही अशा मस्तवालपणे हा आमदार वावरत होता. पण आपल्यावरील अन्यायाविरुद्ध लढा पुकारण्याचा निर्धार या मुलीने केल्यामुळे त्याचा स्वाभिमान आणखीनच डिवचला गेला आणि मग पीडिता आणि तिच्या कुटुंबीयांच्या छळवादाचे सत्रच सुरू झाले. त्यात तिच्या वडिलांचा जीव गेला. तरीही यंत्रणा केवळ मूकदर्शक बनून होती. माध्यमांनी प्रकरण उचलून धरल्यावर अखेर या मस्तवाल आमदारावर पोलिसांना कारवाई करावीच लागली. या दोन्ही प्रकरणांमुळे पोलीस यंत्रणेवरील लोकांचा होता नव्हता तो सर्व विश्वास उडाला आहे. पोलिसांसोबत आपण सुरक्षित आहोत, असा विश्वास महिलांना आता अजिबात वाटत नाही, हे कटू वास्तव आहे.
राष्ट्रपती, पंतप्रधानांनी या दोन्ही घटनांबद्दल उशिरा का होईना संताप व्यक्त केला. पण त्याने काय होणार? देशातील महिला सुरक्षित नाही, हे वास्तव थोडीच बदलणार आहे. शिवाय मुलींचे उद्ध्वस्त झालेले आयुष्यही सावरणार नाही. अशा घटनांमुळे मुलींच्या मनावर होणाऱ्या क्रौर्याच्या जखमा थोडीच मिटणार आहेत.
स्त्री मग ती कुठल्याही वयोगटातील असो प्रचंड असुरक्षित वातावरणात जगते आहे. सरकार केवळ ‘बेटी बचाव, बेटी पढाव’च्या दवंड्या पिटते. पण मुलींच्या संरक्षणाचे ठोस उपाय मात्र करीत नाही. निर्भया हत्याकांडानंतर स्त्री अत्याचारविरोधी कायद्यात काही सुधारणा झाल्या होत्या. पण त्याचा फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही. १२ वर्षांपेक्षा लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्यास आरोपीला थेट मृत्युदंड ठोठावण्यात यावा यासाठी बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यात (पॉस्को) सुधारणा करण्याचा प्रस्ताव असल्याचे केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी सांगितले आहे. त्याची कार्यवाही तातडीने झाली पाहिजे. देशात वाढत चाललेली ही बलात्कारी संस्कृती नियंत्रणात आणण्याकरिता कठोर कायदे करून त्याची योग्य अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. तसेच सामाजिक बदलही घडवावा लागेल आणि पुरुषांनी आपली मानसिकता बदलल्याशिवाय ते शक्य नाही. असे न झाल्यास भविष्यात महिला हातात शस्त्र घेऊन लढताना दिसतील.
माजी पंतप्रधान मा.अटलजींच्या
एका कवितेचे सद्य:स्थितीतील स्मरण...
उठो द्रौपदी वस्त्र सम्भालो
अब गोविन्द न आयेंगे।
कब तक आस लगाओगी तुम
बिके हुए अखबारों से।
कैसी रक्षा मांग रही हो
दु:शासन दरवारों से।
स्वंय जो लज्जाहीन पडे हैं
वे क्या लाज बचायेंगे।
उठो द्रौपदी वस्त्र सम्भालो
अब गोविन्द न आयेंगे।
कल तक केवल अंधा राजा
अब गूंगा बहरा भी है।
होंठ सिल दिये हैं जनता के
कानों पर पहरा भी है।
तुम्ही कहो ये अश्रु तुम्हारे
किसको क्या समझायेंगे।
उठो द्रौपदी वस्त्र सम्भालो
अब गोविन्द न आयेंगे।
छोडो मेंहदी भुजा सम्भालो
खुद ही अपना चीर बचा लो।
द्यूत बिठाये बैठे शकुनि
मस्तक सब बिक जायेंगे।
उठो द्रौपदी वस्त्र सम्भालो
अब गोविन्द न आयेंगे।