मार्गदर्शक तत्त्वांनीच घेतला त्याचा जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 11:52 AM2018-02-28T11:52:01+5:302018-02-28T11:52:08+5:30

एकीकडे वाघ वाचविण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार वेगवेगळे उपक्रम राबवतात तर दुसरीकडे केवळ उपचाराअभावी एका वाघाला त्याच्याच प्रदेशात जीव गमवावा लागतो.

He died due to guidelines of saving life | मार्गदर्शक तत्त्वांनीच घेतला त्याचा जीव

मार्गदर्शक तत्त्वांनीच घेतला त्याचा जीव

googlenewsNext

गजानन चोपडे
नागपूर: घायाळ वाघ सतत पाच दिवस उपाशी निपचित पडून राहतो अन् वन्यजीव खात्याचे अधिकारी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर बोट ठेवून त्यावरील उपचाराचा कार्यक्रम आखतात. सामान्य माणसांना २१ फेब्रुवारी रोजी दिसणारा हा वाघ अधिकाऱ्यांना २२ तारखेला दिसतो. दुसऱ्या दिवशी मुख्य वनसंरक्षक स्वत: जाऊन पाहणी करतात. त्याला खरंच उपचाराची गरज आहे काय, याची खातरजमा केल्यानंतर अहवाल पाठवतात. २४ तारखेला समितीचे गठन केले जाते आणि मग २५ ला येते समिती. समितीच्या अहवालानुसार नऊ तज्ज्ञांची चमू वाघापर्यंत पोहोचते खरी; पण तोपर्यंत वाघ मृत्यूमुखी पडलेला असतो.
चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर वनपरिक्षेत्रात एका ढाण्या वाघाचा मृत्यू वन्यजीवप्रेमी संस्थांच्या मनाला चटका लावून गेला असेही म्हणता येणार नाही; कारण या पाच दिवसाच्या कालावधीत एकाही वन्यजीवप्रेमीने त्या वाघाला वाचविण्यासाठी धडपड केल्याचे जाणवले नाही. मार्गदर्शक तत्त्वांवर बोट ठेवण्याऐवजी त्यावर उपचार केला असता तर हा वाघ नक्कीच वाचला असता. कॅपिटल आॅफ टायगर म्हणून विदर्भाची ओळख आहे. गेल्या आठ महिन्यात देशात ८३ वाघ नाहीसे झाल्याच्या वृत्ताला खुद्द एनटीसीए दुजोरा देते, पैकी १० वाघ एकट्या महाराष्ट्रातून संपले आहेत. एकीकडे वाघ वाचविण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार वेगवेगळे उपक्रम राबवतात तर दुसरीकडे केवळ उपचाराअभावी एका वाघाला त्याच्याच प्रदेशात जीव गमवावा लागतो. एरवी क्षुल्लक मुद्यांवर वन अधिकाऱ्यांना फैलावर घेण्याची कुठलीही संधी न गमावणारे आपले वन्यजीवप्रेमी मित्र यंदा मात्र तोंडावर बोट ठेवून होते. कुणीही समोर आला नाही. त्या वाघावर तातडीने उपचार व्हावा, असे कुणालाही वाटले नाही. सतत पाच दिवस कागदीघोडे नाचविणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्याची तसदी कुणी घेतली नाही. शेवटी तो तसाच विव्हळत, तहानलेला, भुकेने व्याकूळ होऊन मरण पावला. आता चौकशी लावण्यात आली आहे. ती निष्पक्ष झाली तर अनेकांवर कारवाईचा बडगा उगारला जाऊ शकतो.
आपण फक्त वाघ नाही गमावला तर वाघ वाचावा यासाठी आजवर आपण करीत असलेली धडपड कशी थोतांड होती, हेदेखील सिद्ध केले आहे. कालपर्यंत वाघाला शिकाऱ्यांची भीती होती. आता तर तीही नाही. तरी वाघ मरताहेत. कधी भुकेने तर कधी झुंजीत. आपण फक्त अहवाल सादर करून मोकळे व्यायचे, हा एकसूत्री कार्यक्रम सध्या वनखात्यात इमानेइतबारे राबविला जात आहे. तर काही वन्यजीवप्रेमी शासकीय पदावर झालेल्या नियुक्तीवरच आनंदी आहेत.
खरं तर रविवारी एक नाही दोन वाघ मरण पावले. तळोधी वनपरिक्षेत्रातील गट गंगासागर हेटीमध्ये वाघाचा एक बछडा उपाशी व अशक्त अवस्थेत मंगळवारी आढळला. दोन दिवस बछड्याला तिथेच ठेवून त्याच्या आईची वाट बघण्यात आली. तिसऱ्या दिवशी त्या बछड्याला चंद्रपूर येथील वन्यजीव उपचार केंद्रात आणण्यात आले. उशीर झाल्यामुळे त्याने उपचाराला प्रतिसाद दिला नाही आणि दोन महिन्याचा हा बछडाही दगावला. उपचारासाठी दोन दिवस वाट का पाहावी लागली, याचीही सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.

Web Title: He died due to guidelines of saving life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.