विशेषत्वाच्या वेदनांवर फुंकर हवीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 10:44 AM2018-01-10T10:44:35+5:302018-01-10T10:46:06+5:30
विशेष मुलांच्या विकासासाठी मागील ३० वर्षांपासून अविरत परिश्रम घेणाऱ्या ‘स्वीकार’ या संस्थेनं नुकताच आपला ‘जागृती’ नामक विशेषांक प्रकाशित केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य अन् त्याच्यासारखी आणखी काही विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांना भेटण्याची संधी मिळाली.
सविता देव हरकरे
आदित्य खूप उत्साहात, जोशात बोलत होता. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास झळकत होता. डोळ्यामध्ये एक वेगळीच चमक होती. स्वत:बद्दल, स्वत:च्या कामाबद्दल, स्वत:च्या क्षमतेबद्दल त्याला बरंच काही सांगायचं होतं. ‘आमचं वर्कशॉप आहे. तिथं आम्ही सर्व जण वेगवेगळ्या वस्तू बनवत असतो. पाकिटे, पिशव्या, पुष्पगुच्छ, शुभेच्छा पत्रे, उदबत्त्या आणि बरेच काही. नंतर हे सर्व सामान आम्ही विकतो. फार छान वाटतं. मला तर पाकिटं बनवायला अतिशय आवडतं.’ आदित्यचं सांगणं सुरूच होतं.
आदित्य एक विशेष मुलगा. दहावीपर्यंत शिक्षण झालेला. वय २८ वर्षे. बोलण्यावागण्यात अतिशय समजदार. विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला मुद्देसूद आणि व्यवस्थित उत्तर देणारा. त्याच्याशी बोलताना तो विशेष मुलगा आहे, याचा विसरच पडतो. बहुदा आदित्यलाही तेच सांगायचं असावं. आम्हाला विशेष समजून तुमच्यापासून वेगळं करू नका. आम्हालाही तुमच्यासारखं सामान्य समजा. सामान्यांप्रमाणं वागणूक द्या.
विशेष मुलांच्या विकासासाठी मागील ३० वर्षांपासून अविरत परिश्रम घेणाऱ्या ‘स्वीकार’ या संस्थेनं नुकताच आपला ‘जागृती’ नामक विशेषांक प्रकाशित केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदित्य अन् त्याच्यासारखी आणखी काही विशेष मुलं आणि त्यांच्या पालकांना भेटण्याची संधी मिळाली. याठिकाणी विशेष मुलांच्या समस्या, त्यांना सांभाळताना कुटुंबात निर्माण होणारे प्रश्न, कायमस्वरुपी वसतिगृहांची गरज, असे अनेक मुद्दे चर्चिल्या गेले. त्यांचे प्रश्न जाणून घेत असताना त्यांच्यात चांगलं जीवन जगण्याबद्दल असलेली सकारात्मकता आणि विश्वास या दोन गोष्टी प्रकर्षानं जाणवल्या. परंतु दु:खं हेच की ही मुलं सामान्य जीवन जगण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना समाज अन् बरेचदा कुटुंबीय सुद्धा त्यांना सामान्यांप्रमाणं आपल्यात सहभागी करून घेत नाहीत. सामान्यांना असलेले अधिकार त्यांना मिळत नाहीत. त्यांच्या हक्कांपासून त्यांना वंचित ठेवलं जातं. गतिमंद, मतिमंद किंवा यांच्यासारख्या इतर मुलांचा त्यांच्यातील उणिवांसह स्वीकार करण्याचे प्रमाण अजूनही कमीच आहे. एकतर बहुतांश पालक आपला मुलगा विशेष आहे हे स्वीकारायलाच तयार नसतात किंवा हे स्वीकारायला त्यांना इतका वेळ लागतो की तोवर परिस्थिती आणखी बिघडलेली असते. अर्थात याचा अर्थ संपूर्ण नकारात्मकताच आहे असाही नव्हे. परिस्थितीत निश्चितच बदलते आहे. पण कासवाच्या गतीने असेच म्हणावे लागेल.
विशेष मुलांच्या जीवनात सहजता आणताना अथवा त्यांचे प्रश्न सोडविताना सर्वप्रथम पालकांनी संयमाने घेत अन् कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा न देता मतिमंदत्व ही एक मानसिक अवस्था आहे आणि प्रयत्नांनी त्यात बदल होऊ शकतो, हे सर्वप्रथम समजून घेतले पाहिजे. ही मुले सुद्धा आपल्या पायावर उभी राहून आपले आयुष्य आनंदात जगू शकतात. त्यांना गरज असते ती कुटुंब आणि समाजाच्या पाठिंब्याची. त्यामुळे पालकांनी एकदा का आपल्या विशेष पाल्यांचा स्वीकार केला की अर्धा प्रश्न तिथेच संपतो आणि मग पुढची वाटचाल सोपी जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या मुलांचे संगोपन करीत असताना त्यांचे पुनर्वसनही तेवढेच गरजेचे असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यातील क्षमता ओळखून त्यानुसार त्याला प्रशिक्षण दिल्यास त्यांचे पुनर्वसन होऊ शकते. मग आपोआपच अशा विशेष मुलांचा समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग सुकर होतो. येथे जमलेले जागरुक पालक आणि त्यांच्या उत्साही पाल्यांना बघितल्यावर आपले मूल विशेष आहे याचा न्यूनगंड बाळगत कुंठत जीवन जगणाºया पालकांनी त्यांच्याकडून काही शिकले पाहिजे, हे प्रकर्षाने जाणवले.
विशेष मुलांचे पुनर्वसन हे भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात फार मोठे आव्हान आहे. आपल्या देशात अशा प्रकारच्या मानसिक अपंगांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या जवळपास दोन टक्के एवढे आहे. याचाच अर्थ असा की दोन कोटीहून अधिक लोक या अवस्थेत आहेत. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीत अपंग व्यक्ती अगदी सहजपणे कुटुंबात सामावून घेतली जात होती. त्यांना सांभाळणे हा आज जसा फार मोठा प्रश्न निर्माण झाला आहे तसा तो त्यावेळी राहात नव्हता. परंतु आज कुटुंबातील परिस्थिती बदलली आहे. विभक्त कुटुंबाचे युग आले आहे. परिणामी विशेष मुलांचा सांभाळ कठीण होऊन बसला आहे. आपल्यानंतर आपल्या मुलांचे काय? ही भीषण समस्या आईवडिलांपुढे उभी ठाकली आहे. काही अगतिक पालक तर आपण हे जग सोडून जाण्यापूर्वीच आपल्या मुलाला उचलून घे, अशी प्रार्थना परमेश्वराकडे करीत असतात. कारण ही मुले पूर्णपणे आपल्या कुटुंबावर अवलंबून असतात. कुटुंबाच्या आधारावरच त्यांचे जीवन सुसह्य होत असते. विभक्त कुटुंबात त्याला तडा जातो. यावर दोन चांगले पर्याय याठिकाणी सुचविण्यात आले. एक म्हणजे जवळपास राहणारे पालक लहानलहान गट तयार करून एकमेकांना सहकार्य करू शकतात. यामुळे पालकांच्या दैनंदिन अडचणी सुटतील शिवाय त्यांच्या विशेष मुलांनाही मित्रांसमवेत राहता येईल. दुसरा पर्याय हा वसतिगृहांचा आहे. मुंबई, औरंगाबाद आदी शहरांमध्ये अशाप्रकारची वसतिगृहे पूर्वीपासूनच असून आता नागपुरातही विशेष मुलांसाठी वसतिगृह उभारण्याची योजना स्वीकारने आखली आहेत. कायद्यानेही अशा मुलांना संरक्षण, अधिकार आणि अनेक सोई सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण या कायद्याची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे कुटुंब आणि समाजात जास्तीतजास्त जागरुकता निर्माण व्हावी लागेल.