वाढती नशाखोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 03:56 PM2018-08-27T15:56:59+5:302018-08-27T15:58:12+5:30
२६ वर्षांचा सागर एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतोय. व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून त्याची धडपड सुरू आहे. पण अजूनही आत्मविश्वास वाटत नाहीये.
सविता देव हरकरे
नागपूर: २६ वर्षांचा सागर एका व्यसनमुक्ती केंद्रात उपचार घेतोय. व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून त्याची धडपड सुरू आहे. पण अजूनही आत्मविश्वास वाटत नाहीये. व्यसनमुक्ती केंद्रातून बाहेर पडल्यावर पुन्हा अमलीपदार्थांना हात लावणार नाही याची खात्री ना त्याला आहे ना त्याच्या घरच्यांना. आर्थिकदृष्ट्या संपन्न घरचा मुलगा. वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी पहिले दारू प्याला. पुढे मग गांजा, चरसची चटक लागली. रस्त्यावर लोळत पडू लागला. स्थिती हाताबाहेर गेल्यावर व्यसनमुक्ती केंद्रात आला.
२६ वर्षांच्या तुषारचेही तसेच. चांगला शिकला. इंजिनिअर झाला. बड्या खासगी कंपनीत नोकरी लागली. प्रेमात विश्वासघात झाला म्हणून दु:ख विसरायला नशेत डुबू लागला. संपूर्ण आयुष्य नशेत डुबल्यावर त्यातून सुटकेसाठी प्रयत्न करतोय.
एकीकडे सागर आणि तुषारसारखी काही मुले नशेच्या घट्ट मगरमिठीतून बाहेर पडून आपले आयुष्य पूर्वपदावर कसे येईल याची धडपड करीत असताना त्यांच्यासारखी हजारो लाखो मुलेमुली नशेखोरीत एवढी मस्त आहेत की आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलय याचे यत्किंचितही भान त्यांना नाही. कुणी ब्रेकअप झाला म्हणून तर कुणी आयुष्य एन्जॉय करायचेय म्हणून वेगवेगळ्या नशा करतोय. एका धुंदीत जगतोय. विशेष म्हणजे इतर सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या, वेळप्रसंगी त्यांना मागे टाकणाऱ्या महिला सुद्धा या नशेखोरीत मागे नाहीत. कॉलेजच्या मुलींसाठी तर सिगारेट आणि हुक्का हे फार ‘कॉमन’ झाले आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये फोफावलेल्या हुक्का पार्लरचा फटका मारला की हे भीषण वास्तव समोर येतं. आजकाल तर असं झालयं की मुलंमुली हुक्क्याचा पाईप आपल्या रुममध्येच ठेवतात.जेणेकरुन त्यांना पाहिजे तेव्हा नशा करणं सोपं जातं. मध्यंतरी एका चर्चेत हा विषय मांडला तेव्हा एका मैत्रिणीनं त्यावर आक्षेप घेत मुलं नशा करतात तेव्हा चालतं मात्र मुलींनी व्यसन केलं की लगेच नावं ठेवली जातात असं का? हा प्रश्न उपस्थित केला तेव्हा मन हादरुन गेलं. इथे मतभेदाचा प्रश्नच कुठे येतो? व्यसनाच्या आहारी जाणारी आपली ही तरुणपिढी मग ते मुलगे असोत वा मुली स्वत: उद्ध्वस्त होणारच.सोबत आपले कुटुंब आणि देशालाही देशोधडीला लावणार हे वास्तव नाही का?
राष्ट्रीय गुन्हे विभागाने अलिकडेच संसदेत जी आकडेवारी सादर केली ती चिंता वाढविणारी आहे. या देशात अमलीपदार्थांच्या सेवनाने दररोज सरासरी १० लोकांचा मृत्यू होतोआणि त्यात सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत. त्या खालोखाल पंजाब, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि केरळचा क्रमांक लागतो. ड्रग्ज म्हटले की पंजाब असे समिकरण आजवर मांडले जात होते. पण तसे काही नाहीये. देशाच्या अन्य राज्यातही अमलीपदार्थांचा व्यापार मागील ३ वर्षात ४५५ टक्क्यांनी वाढलाय. आणि पंजाबसारखी स्थिती महाराष्ट्र, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचलप्रदेश तसेच राजस्थानची झालीये. मुलं अगदी कोवळ्या वयात व्यसनाच्या आहारी जाताहेत. असे का घडावे? नेमकी कुठली कारणं याला कारणीभूत आहेत? या मुलांना नशाखोरीपासून कसे रोखता येईल? आणि जी व्यसनाधिन आहेत त्यांना या गर्तेतून कसे सुखरुप बाहेर काढता येईल? असे अनेक गंभीर प्रश्न आज आपल्यापुढे उभे आहेत.
देशात मुलांच्या विकासासाठी वेळोवेळी अनेक धोरणे जाहीर केली जातात. असे असतानाही समाज आणि सरकारकडून मुलांच्या या बदलत्या मानसिकतेकडे लक्ष पुरवून त्यावर योग्य तोडगा निघू शकलेला नाही. सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला याबाबत विचारणा करताना मुलांमधील वाढत्या नशेखोरीवर नियंत्रणाकरिता दिशानिर्देश जारी केले होते. राष्ट्रीय कृती योजना तयार करण्यास सांगितले होते. त्याचं पुढे काय झालं कुणास ठावूक? राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार देशात १५ ते १८ वर्षे वयोगटातील जवळपास ५ कोटी मुलं तंबाखू, दारुसह इतर अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत.
देशाची भावी पिढी सुदृढ व्हावी, त्यांची जीवनशैली चांगली असावी, वाईट सवयींपासून ती दूर असावी अशी या देशातील प्रत्येक व्यक्तीची, समाजाची आणि सरकारचीही इच्छा असेल याबद्दल शंका नाही. पण असे घडण्यासाठी आपण काही करतोय का? याबाबत प्रत्येकाने आत्मचिंतन करावे. इंटरनेट, सोशल मिडियाच्या या युगात मुलांची दिनचर्या आणि त्यांच्या आरोग्याकडे आपण गांभीर्याने लक्ष देत नाही. आपण एकतर ‘आजची पिढी समजदार आहे,त्यांना काही सांगण्याची गरज नाही’असे म्हणून आपली जबाबदारी झटकतो किंवा मग आपल्याकडे मुलींचे प्रश्न समजून घ्यायला वेळच नसतो. परिणामी आज मोठ्या संख्येत मुलं नशेच्या आहारी गेली आहेत. त्यांच्या या नशेखोरीचा थेट परिणाम समाज आणि देशावर होतोय. हे आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. अजूनही वेळ गेलेली नाही. आपल्यापैकी प्रत्येकानंच प्रयत्न केल्यास व्यसनाधिनतेपासून समाज मुक्त होऊ शकतो.