प्रेमाचा फॉर्म्युला शक्य आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2018 03:39 PM2018-08-17T15:39:42+5:302018-08-17T15:40:17+5:30
संत कबीर सांगून गेलेत प्रेमाच्या अडीच अक्षरांचं सार. प्रेम हेच खरं ज्ञान आहे. किंबहुना ज्ञानातील श्रेष्ठतम ज्ञान आहे, हेच कबीरांनी आपल्या प्रेमाच्या संदेशातून सांगितलंयं.
सविता देव हरकरे
नागपूर:
पोथी पढपढ जग मुवा, पंडित भया ना कोय
ढाई अक्षर प्रेम का पढे से पंडित होय
संत कबीर सांगून गेलेत प्रेमाच्या अडीच अक्षरांचं सार.
प्रेम हेच खरं ज्ञान आहे. किंबहुना ज्ञानातील श्रेष्ठतम ज्ञान आहे, हेच कबीरांनी आपल्या प्रेमाच्या संदेशातून सांगितलंयं.
जिथे अहंकाराचा शेवट होतो तिथेच प्रेमाचे सृजन सुरू होते. हा त्यांच्या प्रेम तत्वाचा अर्थ आहे. प्रेम करणं फारच अवघड काम आहे. प्रेम समजणं फारच कठीण आणि प्रेम समजाविणे हे तर त्याहूनही कठीण आयुष्यात सर्वांना या प्रेमाचे महत्व समजाविणे म्हणजे तारेवरची कसरतच. कबीरांनी ती केली होती. प्रेमाच्या या अडीच अक्षरांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी सर्वांना प्रेरित केले. ‘प्रेम’ हेच खरे ज्ञान हा संदेश जगाला दिला. पण माणसाचं दुर्दैव असं की एवढी वर्षं लोटून गेल्यावरही माणसामाणसात एकमेकांप्रती जी प्रेम भावना निर्माण व्हायला हवी होती ती झाली नाही. त्यामुळे आजही प्रेमाचा खरा अर्थ समजून घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मध्यंतरी उत्तर प्रदेशात स्वत:ला लव्हगुरू म्हणवून घेणाऱ्या एका प्राध्यापकाने ‘प्रेमाची शाळा’ उघडण्याचा विचार मांडला होता. तेव्हा त्यांची खूप खिल्ली उडविण्यात आली होती. प्रेम हे काही ठरवून शिकायचं नसतं. तेव्हा यासाठी शाळांची गरज काय? ते तर आपोआप होत असतं, असं सर्वसाधारण मत असल्यानं स्वाभाविकच प्रेमाच्या अशा शाळेला आपल्या इथे विरोध झाला होता. पण चीनमध्ये एका विद्यापीठात आता प्रेमावर स्वतंत्र अभ्यासक्रमच सुरू झालायं. चायना युनिव्हर्सिटी आॅफ मायनिंग अॅण्ड टेक्नॉलॉजीने प्रेम आणि नात्याचे मानसशास्त्र (सायकॉलॉजी आॅफ लव्ह अॅण्ड रिलेशनशिप) या विषयावर एक आॅनलाईन अभ्यासक्रम सुरू केलायं आणि तो शिकण्याकरिता विद्यार्थ्यांच्या अक्षरश: उड्या पडताहेत असं कळलं. या अभ्यासक्रमाला मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद लोकांच्या मनात या अडीच अक्षराबद्दल असलेल्या उत्सुकतेचे प्रमाण आहे. या विद्यापीठाचे समाजशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रो. त्वान शिनशिंग यांनी दोन वर्ष कठोर मेहनत घेऊन हा अभ्यासक्रम तयार केलाय. विशेष म्हणजे हा अभ्यासक्रम सुरू करण्यामागील कारणही तेवढच महत्वाचं आहे. नाती जपण्यात येणाऱ्या अपयशाचा विद्यार्थ्यांचा जीवनावर विपरित परिणाम होत असल्याचं त्यांना जाणवलं आणि मग विद्यार्थ्यांना नातेसंबंधातील बारकावे सांगितले गेले पाहिजेत असं त्यांना वाटलं. या भावनेतूनच मग त्यांनी हा अभ्यासक्रम तयार केला. या अभ्यासक्रमात नात्यांमध्ये निर्माण होणारी आव्हानं आणि ती सोडविण्याचा तंत्र शिकविल्या जातं. इतिहासात होऊन गेलेल्या मोठमोठ्या व्यक्तींचे प्रेमाबद्दलचे विचार त्यात आहेत. यासंदर्भातील अनेक पुस्तकं आणि ५० व्हिडिओ सुद्धा तयार करण्यात आले आहेत.
विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संवाद कसा साधायचा, आपल्या वागणुकीचं मूल्यमापन कसं करायचं हा तर अभ्यासक्रमाचा भाग आहेच. याशिवाय पहिल्या नजरेतील प्रेम, एकतर्फी प्रेम, एकमेकांपासून दूर राहणाऱ्या व्यक्तींमधील प्रेम, सेक्स असे मानवी जीवनातील अत्यंत संवेदनशिल विषयही हाताळण्यात आले आहेत.
हा अभ्यासक्रम खरंच किती यशस्वी ठरतो हे भविष्यात कळेलच. पण त्याची शाश्वती फारशी वाटत नाही. याचं कारण असं की गणित, विज्ञानात जसे वेगवेगळे फॉर्म्युले असतात. त्यानुसार गेलं की निश्चित उत्तराची खात्री असते. तशी ती प्रेमात मिळतील याची खात्री कोणी देऊ शकतं का? अशा एखाद्या अभ्यासक्रमात सांगण्यात आलेले प्रेमाचे फॉर्म्युले खरंच यशस्वी ठरतील काय? कारण मानवी स्वभाव जसा कमालीचा गुंतागुंतीचा आहे तसंच नातेसंबंधांचंही आहे. त्यामुळं यशस्वी प्रेमाचा फॉर्म्युला तयार करणं अवघडच. पण आजच्या या असहिष्णुतेच्या वातावरणात असे अभ्यासक्रम अप्रासंगिकही नाहीत. आपण सर्वत्र बघतो, माणसामाणसात अविश्वास कटूता,द्वेषभाव वाढत चाललायं. आनंदाचे क्षण कमी अनुभवास येतात. सामाजिक आरोग्य बिघडत चाललयं. अशात प्रेमाचा हा अभ्यासक्रम मानवी स्वभाव ओळखण्यास मदतशीर ठरू शकतो. तो माणसाला अधिक संवेदनशील बनवू शकतो. अलिकडे भारतासह अनेक देशांमध्ये आनंददायी अभ्यासक्रम सुरू झाले आहेत. ते सुद्धा याच कारणाने. चांगला,संवेदनशील माणूस कसे बनवता येईल,हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.
खरं तर प्रेम हा प्रत्येक व्यक्तीचाच आवडीचा विषय. त्याला कसली बंधनं नाहीत. पण आज या प्रेमाची व्याख्या बदलली आहे. ‘प्रेम’या शब्दाची महती सर्वच देशांनी सांगितली आहे. एकमेकांना नातेसंबंधात जोडून ठेवणारी ती ‘प्रेम’ भावनाच आहे. पण मानवी आयुष्यात कुठेतरी तीच मिसिंग असल्याचं जाणवतं. प्रेमामुळं माणसाचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होतो. त्यामुळे प्रेमाची भावना व्यापक असायला हवी. परस्पर प्रेम असेल तर सौहार्द राहील. धर्म,जाती द्वेष संपुष्टात येईल. प्रेमाचं अवकाश अमर्याद, अफाट आहे. प्रत्येक नात्यात ते असतं. तसंच देशावर, भाषेवर, संस्कृती आणि इतिहासावरही असते. प्रेम भावनेचा परिसस्पर्श ज्याच्या मनाला झाला त्याला अवघं विश्व आपलं वाटतं.