केवळ सोशल मीडियाच जबाबदार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 10:44 AM2018-07-14T10:44:57+5:302018-07-14T10:45:35+5:30
एवढी वेळ का यावी? आम्ही आमचे भान का हरपून बसतो? कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करायचा असतो हे सुद्धा आता आम्हाला नव्याने शिकवावे लागणार आहे काय?
सविता देव हरकरे
नागपूर: घरोघरी तंत्रज्ञान पोहोचले आहे. वयाची बंधने ओलांडून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात. त्याचे फायदे कुणालाही नाकारता येणार नाहीत. एखादी माहिती क्षणभरात पाहिजे तिथे पोहोचविणे निव्वळ सोशल मीडियामुळेच शक्य झाले आहे. हे जरी खरे असले तरी त्याच्या गैरवापरामुळे होणारे धोकेही आता समोर येऊ लागले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमाने माहितीची देवाणघेवाण सकारात्मक आणि लोकशिक्षण देणारी असते तोवर ठीक पण त्यात जेव्हा नकारात्मकता, द्वेष, हिंसा येते तेव्हा ते समाजविघातक ठरते. एखाद्याची बदनामी करणे, चारित्र्यहनन करणे, आर्थिक घोटाळे, अश्लील व्हिडीओ, समाजस्वास्थ्य बिघडविणारे साहित्य असले प्रकारच या समाजमाध्यमांवर अधिक घडतात असे म्हणायला हरकत नाही. जगभरातील अनेक देशांनी हा धोका लक्षात घेऊन सोशल मीडियासंदर्भात आपले कायदे अधिक कठोर करण्यास सुरुवात केली आहे. विलंबाने का होईना भारतातही ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे. सर्वांना वेड लावणाऱ्या व्हॉेटस्अॅपनेही दबावाखाली का असेना जनजागृतीचे काम हाती घेतले आहे. हे चांगलेच आहे. व्हॉटस्अॅपच्या माध्यमाने अफवा पसरविल्या जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे. त्यानुसार आवश्यक ते बदलही लवकरच केले जातील.
व्हॉटस्अॅप आणि फेसबुकसारखी माध्यमे खोटे आणि चिथावणीखोर संदेश परसविणारे व्यासपीठ झाले आहे. त्यामुळे या अफवांची जबाबदारी त्यांना टाळता येणार नाही. पण वाढती झुंडशाही आणि तिच्याकडून होणाºया हिंसाचारासाठी केवळ समाज माध्यमांना जबाबदार धरून आम्ही आपले हात वर करणे योग्य ठरेल काय? याचा सारासार विचार ही माध्यमे वापरणाºया प्रत्येक व्यक्तीने केला पाहिजे. आज माणूस माणसापेक्षा अफवांवर जास्त विश्वास ठेवू लागला आहे. व्हॉटस्अॅपवर येणाऱ्या अशा संदेशांची शहानिशा करण्याचीही सद्सद्विवेकबुद्धी त्याच्यात राहिलेली नाही. यावरील प्रत्येक संदेश खराच असतो, असे त्याला वाटू लागले आहे. विशेष म्हणजे या देशातील कायद्यावरही लोकांचा विश्वास राहिलेला नाही काय? असा प्रश्न पडावा. कारण लोक या अफवांना बळी पडून कायदा हातात घेत असल्याच्या अनेक घटना अलीकडच्या काळात घडत आहेत. या भीषण घटनांनी देश अक्षरश: हादरला आहे. गेल्या काही दिवसात लहान मुलांना पळविण्यात सामील असल्याच्या संशयावरून महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये संतप्त जमावाद्वारे निर्दोषांच्या हत्या करण्यात आल्या. चोरीचा संशय किंवा जनावरांच्या वाहतुकीच्या संशयावरून गोरक्षकांवर हल्ले होताहेत. ताज्या घटनेत गेल्या १ जुलैला धुळ्यातील राईनपाडा परिसरात पाच जणांना मुले पळविणारी टोळी समजून लोकांनी एवढी बेदम मारहाण केली की त्यात त्या सर्वांचा मृत्यू झाला. या घटनांचे गांभीर्य एवढे वाढले की सर्वोच्च न्यायालयाला याची दखल घ्यावी लागली. त्यानंतर लगेच केंद्र सरकारने सर्व राज्यांना वेळीच योग्य पावले उचलण्यास तसेच सोशल मीडियावर पसरविण्यात येणाऱ्या अफवांवर बारकाईने नजर ठेवण्यास सांगितले आहे.
एवढी वेळ का यावी? आम्ही आमचे भान का हरपून बसतो? कुठल्याही तंत्रज्ञानाचा वापर जबाबदारीने करायचा असतो हे सुद्धा आता आम्हाला नव्याने शिकवावे लागणार आहे काय? केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने मध्यंतरी एक सर्वेक्षण केले होते. त्यात असे लक्षात आले की, इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढू लागले आहे. ५० टक्के तरुणांना नैराश्याने ग्रासले आहे. अनेक तरुणतरुणींना दिवसातून कित्येकदा सेल्फी काढून त्या सोशल साईटस्वर पोस्ट करण्याचा जणू नादच लागला आहे. हा नाद किंवा सवय म्हणजे सेल्फायटीस या मनोविकाराची लक्षणे असू शकतात. याशिवाय आॅनलाईन गेम, सायबर बुलिंग, फेसबुक डिप्रेशन, बॉडी इमेज इश्यू, सायकोसिस, बायपोलर डिसआॅर्डर, डिमेन्शिया असे नवनवीन आजार वाढू लागले आहेत. सोशल मीडियावर होणारे ट्रोलिंग आणि नकारात्मक प्रतिक्रियांमुळे लोकांच्या मानसिकतेवर आघात होऊ लागले आहेत. फेसबुकवर एखादा फोटो टाकला की दिवसभर त्याला किती लाईक्स मिळाले हे बघण्यातच सारा वेळ घालविणारे आणि अपेक्षेप्रमाणे लाईक्स मिळाले नाही की अस्वस्थ होणारेही अनेक लोक आहेत. थोडक्यात काय तर नातेसंबंधांची परीक्षा म्हणा किंवा पारख आता या सोशल मीडियावरूनच व्हायला लागली आहे. फेसबुकवर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाही तर तुम्ही त्यांच्या ब्लॅकलिस्टमध्येही जाऊ शकता. याशिवाय तुम्ही किती सोशल आहात हे पण तुमच्या सोशल मीडियावरील वावरातूनच ठरविले जाते. एखादी व्यक्ती सोशल मीडियाचा जास्त वापर करीत नसेल तर ती ‘सोशल’ नाही असा अर्थ काढला जातो.
जगण्यातील सहजता आम्ही गमावून बसलो आहोत. परस्पर अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. नकारात्मकता वाढली असून असहिष्णुतेने कळस गाठला आहे. ही बिघडती परिस्थिती बघता विकासाच्या शर्यतीत घोडदौड करणाऱ्या या देशात समाजाच्या आणि प्रामुख्याने तरुण पिढीच्या मानसिक स्वास्थ्याचीही तेवढीच काळजी घेण्याची नितांत आवश्यकता आहे. पर्यावरणातील प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पण हे सामाजिक आणि मानसिक प्रदूषण कसे थोपवायचे, याचाही विचार आता तातडीने करावा लागणार आहे.