‘स्पेशल फोर्स हाच धर्म’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 08:04 PM2018-02-15T20:04:31+5:302018-02-15T20:05:37+5:30
‘स्पेशल फोर्स हाच माझा धर्म आणि जात आहे.’
सविता हरकरे
देशात सध्या एक व्हिडिओ फार चर्चेत आहे. कर्नल सौरभसिंह शेखावत यांचा हा एका मिनिटाचा व्हिडिओ बघितल्यावर जाती धर्माच्या नावावर मनामनात विष पेरणाऱ्यांना लाज वाटावी. यात सौरभसिंह आपला एक अनुभव सांगताहेत. ते म्हणतात, ‘स्पेशल फोर्समध्ये रुजू झालो तेव्हा वरिष्ठांनी मला माझा धर्म आणि जात विचारली. तेव्हा मी हिंदू, राजपूत असे उत्तर दिले. त्यावर वरिष्ठ चिडले आणि त्यांनी मला पाण्यात डुबकी मारून येण्याची सूचना केली. मी त्यांची आज्ञा पाळली आणि डुबकी मारून आलो. त्यावेळी आपण काहीतरी चुकीचे सांगितल्याची जाणीव मला झाली. नंतर पुन्हा तोच प्रश्न त्यांनी मला विचारला तेव्हा माझे उत्तर होते, ‘स्पेशल फोर्स हाच माझा धर्म आणि जात आहे.’
सर्व भारतीयांनी असाच विचार केल्यास देशातील बहुतांश समस्या सुटतील, असे शेखावत शेवटी सांगतात. विशेष म्हणजे कर्नल सौरभ शेखावत हे कीर्तीचक्र, शौर्यचक्र आणि सेनापदकाने गौरविण्यात आलेले भारतीय लष्करातील ज्येष्ठ अधिकारी आहेत. त्यांचा हा व्हिडीओ अनेकांना आवडला असून त्यासाठी त्यांना अनेक लाईक्सही मिळत आहेत. अर्थात हे लाईक्स क्षणिक असतात, लोक लाईक करून विसरूनही जातात. पण खरंच या देशातील प्रत्येक नागरिकाने त्यातील भावना समजून घेतल्या आणि जात धर्माच्या पलीकडे जाऊन जगणे शिकले तर परिस्थिती फार वेगळी अन् सौहार्दपूर्ण असणार नाही का? विशेषत: अलीकडच्या काळात जाती धर्मावरून विविध समाजांमध्ये तेढ वाढत असताना, असहिष्णुतेने साऱ्या मर्यादा ओलांडल्या असताना या देशातील सद्भाव कायम राखण्यास अशा विचारांची अतिशय गरज वाटते. गेल्या काही वर्षांपासून काही वावदूक नेत्यांनी तर जणू माणसामाणसात विष पेरण्याचा चंगच बांधला आहे. उचलली जीभ आणि लावली टाळूला असला प्रकार सुरू आहे.
लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अम्बू यांनी कालच एका खासदाराला हुतात्म्यांना जातीय रंग देऊ नका, अशा शब्दात फटकारले होते. लष्करातील हुतात्म्यांना आम्ही कधीही जातीय रंग देत नाही. याची कल्पना बहुदा असली विधाने करणाऱ्यांना नसावी, असाही टोला त्यांनी लगावला आहे.
आजकाल सामाजिक आणि राजकीय स्तरावर बेजबाबदार, विखारी आणि अभद्र भाषेचा वापर प्रचंड वाढला आहे. बरेचदा त्यांच्या या वाचाळपणामुळे राष्ट्रीय पदांची प्रतिष्ठाही धुळीस मिळते. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीसह प्रत्येकच पक्षाकडे अशा वाचाळवीरांची फार मोठी फौज आहे. ‘हम करे सो कायदा’ या जोमात हे नेते बरगळत असतात. पद आणि पदाची प्रतिष्ठा याच्याशी त्यांचे कुठलेही सोयरसुतक नसते. एकंदरीतच आरोप-प्रत्यारोपांच्या या वातावरणात भारतातील राजकारण फारच चिखलमय झाले आहे. दुर्दैव हे की देशाच्या लष्कराचा सुद्धा त्यांनी आपल्या या किळसवाण्या राजकारणासाठी वापर करून घेणे आता आरंभले आहे आणि असे करून आपण किती मोठी घोडचूक करीत आहोत, याचे भानही त्यांना नसते. राजकारणाने अत्यंत खालची पातळी गाठली आहे. दुसरीकडे लोकांची सहनशीलताही कमी होत चालली आहे. दुसऱ्यांवर टीका करताना कुठलीही मर्यादा पाळायची नाही अन् स्वत:वर केलेली टीका खिलाडूवृत्तीने स्वीकारायची नाही, असला प्रकार बघायला मिळतो. कधीकधी तर राजकारण्यांच्या भाषेचा स्तर एवढ्या खालच्या पातळीवरचा असतो की आश्चर्यच वाटते. यासंदर्भातील अनेक उदाहरणे देता येतील. या राजकारण्यांना एवढ्या गलिच्छ भाषेचा वापर करण्याची गरज का पडावी? असा प्रश्न पडतो. हा सवंग लोकप्रियतेसाठीचा प्रयत्न आहे की स्वत:ची अकार्यक्षमता लपवून ठेवण्यामागची संकुचित मानसिकता? अथवा नैराश्यातून त्यांची जीभ अशी घसरत असावी. कुणाला सत्तेचा माज आहे तर कुणाला सत्तेत नसल्याचे वैफल्य. म्हणूनच मग त्यांचा तोल जातो. कुणीही कुणापेक्षा कमी नाही. परंतु त्यांच्या या वाचाळपणामुळे देशाची आणि राज्यघटनेची प्रतिष्ठा धुळीस मिळते. या अभद्रतेने एवढे उच्च शिखर गाठलेय की आदर्शवादाच्या गोष्टीही आता हास्यास्पद वाटू लागल्या आहेत. कुठले पद आणि कुठल्या पदाची प्रतिष्ठा? या अभद्र आणि अत्यंत विखारी वाक्बाणांनी सर्वच घायाळ होत आहेत पण कुणीही आत्मपरीक्षण करण्यास तयार नाहीत. त्यामुळे चिखलफेकीच्या या राजकारणातून भारतीय राजकारण मुक्त होण्याची शक्यता फारच धुसर वाटते. कारण कुठेनाकुठे निवडणुकीच्या दंगली होतच राहणार आणि मग त्या निमित्ताने एकमेकांवर प्रहारही केले जाणार.
सध्या पाकिस्तानकडून होत असलेल्या हल्ल्यांच्या संदर्भात विविध पक्षांच्या नेत्यांकडून अशीच वेगवेगळी आणि अविचारी वक्तव्ये केली जात आहेत, या मुद्यावरून केली जाणारी राजकीय वक्तव्ये संताप निर्माण करणारी असतात. राजकारण्यांसकट समस्त देशवासीयांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, भारतीय सैन्य हे राजकारणापलीकडचे आहे. त्यामुळे कुणीही लष्कराला राजकारणात ओढण्याचा नाहक प्रयत्न करू नये.