अंधश्रद्धेचे बळी कुठवर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 07:41 PM2018-07-06T19:41:42+5:302018-07-06T19:42:43+5:30
देशाची राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील ११ लोकांच्या सामूहिक मृत्यूचे रहस्य हळूहळू उलगडायला लागले आहे. हे हत्येचे प्रकरण आहे की आत्महत्येचे? असा प्रश्न सुरुवातीला निर्माण झाला होता. पण आता या मृत्यूमागील चित्र स्पष्ट होत चाललेय.
सविता देव हरकरे
नागपूर: देशाची राजधानी दिल्लीत एकाच कुटुंबातील ११ लोकांच्या सामूहिक मृत्यूचे रहस्य हळूहळू उलगडायला लागले आहे. हे हत्येचे प्रकरण आहे की आत्महत्येचे? असा प्रश्न सुरुवातीला निर्माण झाला होता. पण आता या मृत्यूमागील चित्र स्पष्ट होत चाललेय. हा सामूहिक आत्महत्येचाच प्रकार असल्याचे आणि मोक्षप्राप्तीसाठी ती करण्यात आल्याचेही लक्षात येत आहे. अंधविश्वास माणसाला किती दाट काळोखात नेते याचे याहून मोठे उदाहरण दुसरे कोणते असावे. अगदी ७० वर्षांच्या वृद्धेपासून १२-१५ वर्षाच्या मुलांनी सुद्धा मृत्यूला कवटाळावे, हे केवढे दुर्दैव म्हणायचे. या कुटुंबाची पार्श्वभूमी जसजशी पुढे येतेय तसतसे त्यांच्या अशा मृत्यूचे गूढ अधिक गडद होत असतानाच या देशातील लोकांवर अंधश्रद्धेचा किती भीषण पगडा आहे, त्याची कल्पना यावी. एक कुटुंबवत्सल आणि सामाजिक भान असलेले कुटुंब एका क्षणात संपले. या कुटुंबातील एका मुलीने तर विज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतले होते आणि ती एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी करीत होती, हे विशेष. एवढ्या सुशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध कुटुंबाने आत्महत्या हा मोक्षप्राप्तीचा मार्ग असल्याचे मानलेच कसे? तेच कळत नाही आणि हे काही अचानक घडले नाही. अनेक दिवसांपासून त्याची पूर्वतयारी सुरू होती. या कुटुंबातील लहान मुलाच्या स्वप्नात त्याचे वडील नेहमी येत असत, असे म्हणतात. त्यासंदर्भातील नोंदीही त्याने लिहून ठेवल्या आहेत. घरातील सर्व लोकांवर त्याचा पगडा होता आणि तो म्हणेल तसेच व्हायचे. कदाचित त्यामुळेही त्याला कुणी विरोध केला नसल्याची शक्यता आहे किंवा हे सर्वजण एकाच मानसिकतेचे असावेत.
अशीच एक हादरवून टाकणारी आणि संतापजनक घटना विदर्भातील अमरावतीत उघडकीस आली आहे. पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या सुनेने तिच्या अंगात दुर्गादेवी संचारत असल्याचे ढोंग रचावे, सासूचा अंधश्रद्धेचा वारसा पुढे चालवावा यासाठी तिच्या सासरच्यांकडून तिचा अतोनात छळ होत होता. तिचा नवराही त्यात सामील होता. देवीचा अवतार धारण केला नाहीतर नग्नावस्थेत खोलीत डांबून ठेवण्याची, जाळून मारण्याची धमकी तो तिला देत असे. लग्नानंतर दीड वर्ष तिने हा त्रास सहन केला. घरच्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीही परिणाम न झाल्याने अखेर तिला तक्रार करावी लागली.
आज आपण विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या जगात जगत असलो तरी लोकांची मने मात्र बदलायला तयार नाहीत. अंधश्रद्धेचा जीवघेणा आजार बरा होण्याचे नाव नाही. या आजाराने देशातील एका मोठ्या समूहाला मानसिकरीत्या पूर्णत: कमजोर करून टाकले आहे. सद्सद्विवेक बुद्धी, बऱ्यावाईटाचे भानही त्यांना राहिलेले नाही. चंद्रवारी करणाºया या देशात अजूनही अंधश्रद्धा आणि जादूटोण्याच्या संशयावरून लोकांचे जीव घेतले जातात. पैसा आणि अघोरी शक्ती प्राप्त करण्याच्या लालसेने नरबळी दिले जातात; यापेक्षा निंदनीय दुसरे काय असावे.
काही लोकांना कर्मकांड म्हणजे आस्तिकता वाटते आणि मग ते या कर्मकांडात इतके खोलवर अडकतात की त्यातून बाहेर निघणे त्यांना अशक्य होऊन बसते. कालांतराने हेच कर्मकांड त्यांना अंधश्रेद्धेकडे घेऊन जाते. खरे तर माणसाने माणसावर विश्वास ठेवणे ही खरी आस्तिकता आहे. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या पसायदानात आस्तिकतेचा भावार्थ अगदी स्पष्टपणे व्यक्त केला आहे. माणसूजातीने आपला स्वार्थी, मत्सरी आणि क्रूर स्वभाव त्यागून एक विश्वकुटुंब स्थापन करण्याच्या हेतूने केलेले आचरण म्हणजे आस्तिकता असे ते म्हणतात. स्वामी विवेकानंदांच्या मते स्वत:वर विश्वास असणे म्हणजे आस्तिकता आणि विश्वास नसणे म्हणजे नास्तिकता. स्वत:वर विश्वास नसलेला माणूसच कर्मकांडात गुंततो, असे ते सांगत.
परलोक वगैरे या निव्वळ कल्पना आहेत. त्याच्या अस्तित्वाचे कुठलेही पुरावे नाहीत. त्यामुळे ते मानवी जीवनाचे साध्य असू शकत नाही. अशात मोक्षप्राप्तीसाठी आत्महत्येचा विचार करणे अनाकलनीय आहे. याने मोक्षप्राप्ती मिळत नाही उलट कुटुंब उद्ध्वस्त होते, हे या लोकांना केव्हा उमगेल?
अंधश्रद्धा निर्मूलनासाठीच्या कठोर कायद्यानंतरही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर झारखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, ओडिशा, कर्नाटक आदी राज्यांमध्ये सुद्धा हे अघोरी प्रकार सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी झारखंडमध्ये एकाच वेळी पाच महिलांना संतप्त जमावाने चेटकीण ठरवून जिवंत मारले होते. यासंदर्भातील आकडेवारी धक्कादायक तेवढीच मन विचलित करणारी आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे बºयाचदा अशा प्रकारांना स्थानिक लोकांची साथ असतेच पण पोलीसही मानवहत्या म्हणून या गुन्ह्याकडे बघत नाहीत. महाराष्ट्रात २०१३ साली अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात आला. अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा यांचे समूळ उच्चाटन हा या कायद्यामागील मुख्य हेतू आहे. या कायद्यानुसार चेटूक केल्याच्या संशयावरून मारहाण करणे, नग्न धिंड काढणे, बहिष्कार घालणे अथवा व्यक्तीला सैतान ठरविणे गुन्हा आहे. या गुन्ह्यासाठी ५ ते ५० हजार रुपये दंड आणि सहा महिने ते सात वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे. इतर राज्यांमध्येही असे कायदे आहेत. पण ते प्रभावी ठरत नसल्याचेच चित्र आहे.
मुख्य प्रश्न या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा आहे. बहुतांश प्रकरणांमध्ये आरोपींची ओळख पटली नसल्याचे कारण पोलीस पुढे करीत असतात. अंधश्रद्धेसंदर्भात समाजात जागरुकतेचा अभाव हा सुद्धा महत्त्वाचा पैलू आहे. शासनाने विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमाने तळागाळातील या क्षेत्रात अंधश्रद्धेविरुद्ध लोकजागरच सुरू केला पाहिजे. लोकांमधील जागरुकता आणि संघटित विरोधानेच या विळख्यातून समाजाची सुटका होईल.