‘हव्याशा’ मुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 11:55 PM2018-05-11T23:55:49+5:302018-05-11T23:56:05+5:30

मुलाला वंशाचा दिवा मानणाऱ्या, त्याच्या प्राप्तीसाठी कुठलेही टोक गाठणाऱ्या या देशात मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्यास अधिक पसंती असल्याचे शुभवर्तमान अलीकडेच समोर आले आहे. समाजाची बदलती आणि सुधारती मानसिकता हेच याचे द्योतक आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.

'wants' daughters | ‘हव्याशा’ मुली

‘हव्याशा’ मुली

ठळक मुद्देमुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर

सविता देव हरकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुलाला वंशाचा दिवा मानणाऱ्या, त्याच्या प्राप्तीसाठी कुठलेही टोक गाठणाऱ्या या देशात मुलांपेक्षा मुलींना दत्तक घेण्यास अधिक पसंती असल्याचे शुभवर्तमान अलीकडेच समोर आले आहे. समाजाची बदलती आणि सुधारती मानसिकता हेच याचे द्योतक आहे, असे म्हणण्यास हरकत नाही. फार विलंबाने का होईना तिळातिळाने का होईना मुलींप्रति येथे असलेली ‘नकोशी’ भावना बदलते आहे, हे समाधानाचे. २०१७-१८ या वर्षात देशात एकूण ३,२६७ मुलांना दत्तक घेण्यात आले. त्यामध्ये ६० टक्के मुली आहेत. विशेष म्हणजे मुलींना दत्तक घेण्यात महाराष्ट्र आघाडीवर राहिला. राज्यात एकूण ६४२ मुले दत्तक घेतली गेली त्यात ३५३ मुली होत्या. देशभरातील दत्तक व्यवहारांचे नियमन करणाऱ्या चाईल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटीने ही माहिती दिली आहे. आनंदाची गोष्ट अशी की, ज्या राज्यांमध्ये मुलींचा जन्मदर कमी आहे अशा हरियाणा व उत्तर प्रदेशसारख्या राज्यांमध्येही मुली दत्तक घेण्याकडे लोकांचा कल दिसून आला. मुलांपेक्षा मुलींना वाढविणे सोपे असल्याने मुली अधिक प्रमाणात दत्तक जात असाव्यात असा निष्कर्ष अ‍ॅथॉरिटीने काढला आहे. तो पूर्ण सत्य मानता येणारा नसला तरी अर्थसत्य जरूर आहे. दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांमध्ये मुलींची ओढ वाढण्यामागे आणखीही काही कारणे आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींबद्दल कौटुंबिक आणि सामाजिक दृष्टिकोन बदलण्यासाठी निरनिराळ्या पद्धतीने आणि स्तरावर सुरू असलेले प्रयत्न. बेटी पढाव, बेटी बचाव यासारख्या उपक्रमांमुळे मुंगीच्या पावलाने का होईना समाजात जागरुकता निर्माण होत आहे. त्यातूनच मग पालक एक मुलगा असला तर दुसरी मुलगी दत्तक घेण्याचा विचार करताना दिसतात. मुलबाळ नसलेले काही पालकसुद्धा मुलगीच दत्तक घेण्यास इच्छुक असल्याचेही लक्षात आले आहे. अर्थात हे चित्र समाधानकारक असले तरी या देशाची लोकसंख्या बघता अनाथांना दत्तक घेण्याचे प्रमाण मात्र तुलनेत अजूनही फारच कमी आहे. १३० कोटींच्या या देशात वर्षाला केवळ तीन-साडेतीन हजार मुले दत्तक जावी म्हणजे काही फार मोठा आकडा नाही. त्या अनुषंगाने जास्तीत जास्त अनाथ मुलांना पालक कसे मिळतील या दिशेने आणखी प्रयत्न होणे गरजेचे वाटते. या अहवालानुसार मूल दत्तक घेण्यासाठीच्या सर्वाधिक म्हणजे ६० संस्था महाराष्ट्र त आहेत आणि देशभरात अशा संस्थांची सरासरी संख्या फक्त २० आहे. ती वाढवावी लागेल. कारण मूल दत्तक घेण्याबाबत जनमानसात जागरुकता वाढविणे, अनाथांना दाखल करून घेणे हे महत्त्वाचे कार्य याच संस्थांद्वारे होत असते. इच्छुक पालक आणि अनाथ मुलांदरम्यानचा त्या महत्त्वाचा दुवा असतात. दत्तक घेण्याचे प्रमाण कमी असण्यामागील आणखी एक कारण असे की बहुतांश लोकांना नवजात बाळच हवे असते. चार वर्षावरील मुलास दत्तक घेण्यास पालक अनिच्छुक असतात. त्यामुळे अशा मुलांना मग अनाथालयातच आयुष्य काढावे लागते. याशिवाय दत्तक प्रक्रियेतील अडचणींचाही परिणाम होतोच.
चाईल्ड अ‍ॅडॉप्शन रिसोर्स अ‍ॅथॉरिटीने जी पाच-सहा वर्षांची आकडेवारी दिली ती बघता देशात मूल दत्तक घेण्याचे प्रमाण कमी झाले असल्याचे स्पष्ट दिसून येते. २०१२-१३ मध्ये ५००२ मुले दत्तक गेली होती. २०१३-१४ मध्ये हे प्रमाण ४,३५४ वर आले. २०१६-१७ सालात आणखी कमी होत ३२१० होते. हे प्रमाण वाढले पाहिजे. अर्थात एकूण दत्तक जाणाºयांची संख्या कमी असली तरी त्यात मुलींना पसंती अधिक मिळतेय हे फार चांगले. कारण आजही या देशात मुलगी नकोशीच आहे. खरे तर भारतीय समाजात आज स्त्रियांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या अस्तित्वाचा ठसा उमटवला आहे. अगदी सीमेच्या रक्षणापासून तर कुटुंबांच्या संरक्षणापर्यंत सर्वच आघाड्या त्या यशस्वीपणे सांभाळत आहेत. याची अनेक उदाहरणे आपल्या नजरेसमोर आहेत. तरीही स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन मात्र पूर्णपणे बदललेला नाही. वंश चालवायला मुलगाच हवा असा हट्ट धरणाऱ्या आणि गर्भातील स्त्रीभ्रूण निर्दयीपणे चिरडून टाकणाऱ्या लोकांची संख्या अजूनही फार मोठी आहे.
मुलगा हवा या मानसिकतेपोटी मागील १५ वर्षात किमान दोन कोटी नकुशा मुली जन्माला आल्या असाव्यात असा अंदाज मध्यंतरी सरकारच्या अधिकृत आकडेवारीतून व्यक्त करण्यात आला होता. २०१७-१८ च्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात अशा नकुशा मुलींची प्रथमच गणना झाली होती. मुलगा होईल या मानसिकतेतून अपत्ये जन्माला घातली जातात आणि मग यातून झालेल्या मुली नकोशा असतात, हे वास्तव आहे. १९९४ साली गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायदा केल्यापासून स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण कमी झाले असले तरी मुलगा हवा ही मानसिकता कायम आहे. पण आता या नव्या निरीक्षणात त्या ‘हव्याशा’ असल्याचे कळल्याने आनंद वाटला.

Web Title: 'wants' daughters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.