अधिवेशन गेले वाहून...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2018 12:32 PM2018-07-07T12:32:32+5:302018-07-07T12:33:26+5:30
उष्मा, घाम यामुळे गुरुवारपर्यंत सारेच हैराण झाले होते. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या नावानं नाकं मुरडत होते अन बोटं मोडत होते. शुक्रवारी पहाटेपासून तुफान वृष्टी सुरू झाली. सुरुवातीला सारेच सुखावले.
संदीप प्रधान
नागपूर: उष्मा, घाम यामुळे गुरुवारपर्यंत सारेच हैराण झाले होते. पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याच्या नावानं नाकं मुरडत होते अन बोटं मोडत होते. शुक्रवारी पहाटेपासून तुफान वृष्टी सुरू झाली. सुरुवातीला सारेच सुखावले. पावसाळी पाण्याचे तुषार आनंदानं झेलले. अंगणात साचलेल्या पाण्यात पाय बुडवून त्याच्या थंडगार सुखद स्पर्शाचा अनुभव घेतला. पाऊस कोसळत होता. ढग गडगडत होते आणि पोटात भीतीचा खड्डा पडेल, असा विजांचा कडकडाट सुरू होता. आता रांगणाऱ्या बाळासारखं पाणी पायऱ्यांवर चढलं. मग धावपळ सुरू झाली. विधिमंडळ अधिवेशनाला निघालेल्या आमदारांनी लेंगे दुमडले. बाह्या सरसावल्या. वाऱ्यावर छत्र्या डोलू लागल्या. पाण्याखाली गेलेल्या रस्त्यांवरून फिरणाऱ्या मोटारी होड्यांसारख्या भासू लागल्या. वाहनांमुळे पाण्याच्या उठणाऱ्या लाटा चुकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत वाहतूक पोलीस शिट्या फुंकत वाहतूक नियंत्रण करीत होते. विधानभवनात पाऊल ठेवले तर मिट्ट काळोख. बॅगांची तपासणी करणारी यंत्रे निष्प्राण पडलेली. अंधूक प्रकाशात चेहरेपट्टी पाहून लोकांची बळेबळे अंगझडती घेतल्यासारखे करून पोलीस त्यांना सोडत होते. विधानसभेत मोबाईलमधील फ्लॅश लाईटची जत्रा भरलेली. त्याच प्रकाशात सदस्य घोळक्यानं कुजबुजत होते. त्यांच्या सूरात नाराजीचा नाद होता. तेवढ्या अध्यक्ष दाखल झाले आणि मोबाईलच्या प्रकाशात सभागृह तहकुबीची घोषणा झाली. विधानभवनाला विद्युत पुरवठा करणाऱ्या स्विचिंग सेंटरमध्ये पाणी असल्याने वीजपुरवठा सुरू केला तर मोठ्ठा अपघात होण्याची शक्यता असल्याने ते बंद ठेवले होते. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यासह सारेच तिकडे गेले. पंप लावून पाणी उपसणे सुरू होते. सफाई कामगारांना गटारात उतरवून चोकअप काढण्याचे प्रयत्न सुुरू होते. त्यांच्या पायात ना गमबूट, ना हातात ग्लोव्हज. तेवढ्यात सर्वांची नजर एका बंद गटारावर गेली. त्याचे झाकण काढायचे आदेश होताच कर्मचाऱ्यांनी हुकूमाची तामील केली. लागलीच बीअरच्या पन्नासेक बाटल्यांचा खच पाण्यावर तरंगू लागला. मीडियाचे कॅमेरेरुपी डोळे सताड उघडे होतेच, त्यांना घबाड हाती लागल्याचा हर्षवायू झाला. ‘लोकशाहीच्या मंदिरात बाटल्या’ या बातमीची नशा त्यांना विरोधकांकडे घेऊन गेली. विधानभवनातील अंधार, दारूच्या बाटल्या यावर बाईट देण्याची अहमहमिका सुुरू झाली.
उशिरा पोहोचलेले विरोधी पक्षाचे सदस्य माहिती मिळताच प्रत्यक्षदर्शी असल्याच्या थाटात बोलत होते. कोपऱ्या कोपऱ्यात कॅमेराच्या फ्लॅशलाईटच्या प्रकाशात नेते पावसाळ्यात अधिवेशन घेण्यावरून सरकारविरोधात गडगडाट, कडकडाट करीत होते. धो धो पाऊस सुरूच होता. आतील मंत्र्यांची दालने रिती होती. पंखे स्वत:भोवती भिरभिरत होते. दालनांमधील फरशी आल्यापावली फिरलेल्या असंख्य चिखलाच्या पावलांच्या ठशांनी चिंब भिजली होती. मंत्र्यांच्या बंगल्यात गुडघाभर पाणी घुसल्याने त्यांनी सुबाल्या केल्या होत्या. काही आमदारांच्या खोल्यात साप निघाल्याच्या कहाण्या सरपटत सर्वदूर पसरल्या होत्या. मंत्र्यांचे मोजकेच पीए अभ्यासू विद्यार्थ्यांसारखे फायलींत तोंड खुपसून बसले होते किंवा कामाचा निपटारा करीत होते. चहाचे घुटके घेत घोळक्यांनी काही सदस्य, कार्यकर्ते, पत्रकार उभे होते. तेथेही चर्चा मुंबईची ‘तुंबई’ होते तर नागपूरचे ‘तुंबापूर’ का होऊ शकत नाही, शिवसेनेनी करून दाखवले तर भाजपानेही करून दाखवले, अशीच हास्याचे फवारे उडवणारी चर्चा सुरू होती. कामानिमित्त आलेली काही मोजकीच मंडळी थंडगार भजी किंवा जळजळीत रश्श्याच्या मिसळी बकाबका खाऊन परतीच्या विवंचनेत दिसत होती. अनेकांना तर दिवाबत्ती नसल्याने प्रवेशद्वारापाशी रोखून धरले होते. तेवढ्यात कुणीतरी छातीठोकपणे सांगितले की, यापूर्वी जेव्हा पावसाळ्यात नागपुरात अधिवेशन भरले होते तेव्हाही असाच विजेचा घोळ झाला होता. विधिमंडळ सचिवालयाकडे याबाबत विचारणा केली असता तपासून पाहतो, असे मोघम उत्तर मिळाले. कारण १९६१, १९६६ आणि १९७१ साली पावसाळ्यात नागपुरात अधिवेशन झाले होते. आता पुलाखालून इतके पाणी वाहून गेलेय की, त्याचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार कुठून आणायचा आणि लागलीच खातरजमा तरी कशी करायची? विधानभवनाच्या प्रवेशद्वारापाशी अंथरलेले रेड कार्पेट पाण्यावर तरंगत होते. त्यावर उभ्या राहिलेल्या भिजलेल्या पोषाखी आमदार साहेबाला निरोपाचा सॅल्यूट मात्र खाडकन दिला गेला...