आमचे जवान असेच शहीद होत राहणार काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 03:53 PM2017-12-26T15:53:36+5:302017-12-26T15:55:10+5:30
काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय जवानांवर केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह चार जवानांना वीरमरण आल्याचे वृत्त घेऊन धडकताच समस्त भारतवासीयांत संताप पसरला आहे.
सविता देव हरकरे
काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातील केरी क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करुन भारतीय जवानांवर केलेल्या गोळीबारात महाराष्ट्रातील मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्यासह चार जवानांना वीरमरण आल्याचे वृत्त घेऊन धडकताच समस्त भारतवासीयांत संताप पसरला आहे.
ही घटना घडली त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकी सैन्याने पुन्हा आगळीक करीत गोळीबार केला. पाककडून वारंवार होण्याऱ्या या शस्त्रसंधी उल्लंघनामुळे भारतीय जवानांचा नाहक बळी जात असून हे असेच चालत राहणार काय? आमचे जवान असेच शहीद होणार काय? असा सवाल उपस्थित झाला आहे. पाकने यावर्षी आतापर्यंत जम्मू- काश्मीरमध्ये नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमा रेषेवर ८८१ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंंघन केले असून मागील सात वर्षातील हा उच्चांक आहे. यामध्ये भारतीय चौक्या आणि नागरी वसाहतींना प्रामुख्याने लक्ष्य करण्यात आले. गेल्या वर्षी पाककडून शस्त्रसंधी उल्लंंघनाच्या ४४९ घटना घडल्या होत्या. २०१५ साली ४०५, २०१४ ला ५८३, २०१३ साली ३४७ वेळा पाकने सीमेवर आगळीक केली होती. शस्त्रसंधीच्या घटनांना तुलनात्मक अभ्यास केल्यास गेल्या सहा सात वर्षात त्यात वाढच झालेली दिसते. २०१० साली शेजारील देशाकडून शस्त्रसंधी उल्लंघनाच्या ७० घटना घडल्या होत्या. २०११ साली ही संख्या ६२ होती तर २०१२ साली ११४. गेल्या ३ वर्षात देशांतर्गत आणि बाहेर भारतीय सशस्त्र दलाचे ४२५ जवान शहीद झाले आहेत. हे असे कुठवर चालत राहणार हा प्रश्न आहे. पाकसोबत कुठलेही प्रत्यक्ष युद्ध सुरु नसताना दररोज आमचे जवान शहीद का होत आहेत? सर्जिकल स्ट्राईकने आम्ही काय साध्य केले? असे एक ना अनेक प्रश्न आता या देशातील नागरिकांच्या मनात निर्माण होत आहेत. आणि ते स्वाभाविकही आहे.
जवान लष्करात शहीद होण्यासाठीच जातो,असे म्हणणे राजकीय नेत्यांसाठी फार सोपे आहे. पण प्रत्यक्ष त्या शहीदाच्या कुटुंबीयांवर काय बितते,याची जाणीव इतर कुणालाही होऊ शकणार नाही. आमचा एखादा जवान शहीद होतो तेव्हा तो केवळ त्या एकट्याचा मृत्यू नसतो. त्याच्यासोबत त्याचे संपूर्ण कुटुंबच शहीद होत असते. आईवडील संपूर्ण आयुष्य आपल्या मुलासाठी तडफडतात. पत्नीचा जीवनाचा आधारच कोलमडतो. भाऊबहीण आपला भाऊ गमावतात. जवानाच्या मुलांची छत्रछाया हरपते. शहीदाचे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त होते.
भारत आणि पाकिस्तानदरम्यान २००३ साली शस्त्रसंधी झाली होती. पण बोलायचे एक आणि वागायचे एक ही या देशाची खोड आहे. त्यामुळे शस्त्रसंधीचे या देशाकडून अशा पद्धतीने वारंवार उल्लंघन होणे अपेक्षितच आहे. विशेषत: गेल्या काही महिन्यांपासून अतिरेक्यांचा घुसखोरीचा प्रत्येक प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे. त्यामुळे अतिरेकी आणि पाकी लष्कर दोघांना वैफल्य आले आहे. पण भारताने आता यासंदर्भात कठोर पावले उचलण्याची गरज आहे.जशास तसे धोरण अवलंबण्याची वेळ आली आहे. पाकिस्तान आणि चीनकडून वारंवार सीमा ओलांडून भारतीय हद्दीत घुसण्याचे प्रकार सुरु आहेत. येथील शांतता भंग करणे हा त्यामागील दुष्ट हेतू आहे.
भारताला २००४ पासून पाकपुरस्कृत दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. त्याच्या या कुरापती किती वेळ खपवून घ्यायच्या याचाही विचार झाला पाहिजे. क्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने दोन्ही देशात शांतता नांदणे महत्वाचे आहे; हे खरे असले तरी पाकच्या या वर्तणुकीमुळे शांतता प्रक्रियेत दिवसेंदिवस अधिक अडथळे येत आहेत. शिवाय सीमेवर अहोरात्र पहारा देणाऱ्या आमच्या जवानांच्या प्राणांचे रक्षण सुद्धा महत्वाचे आहे.