आधुनिक भारताचे शिल्पकार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 02:55 AM2018-09-15T02:55:51+5:302018-09-15T02:56:28+5:30
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या. १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
- प्रा. अरुण ब. मैड
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या. १५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. अभियांत्रिकीची पदवी घेतलेले विश्वेश्वरैय्या यांनी सरकारदरबारी, हैदराबाद आणि म्हैसूर संस्थानांत काम केले. म्हैसूरमधील कृष्णराज सागर धरण संपूर्ण चुन्यात बांधून स्वदेशी तंत्रावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरला, हे धरण अद्याप अभेद्य आहे. हैदराबादमधील उपद्रवी नद्यांवर त्यांनी धरणे बांधून ते पाणी उपयोगात आणले. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी औद्योगिक स्वप्ने पाहिली आणि अपार कष्टाने ती सत्यात उतरवली. १४ एप्रिल १९६२ रोजी त्यांचे निधन झाले. आज देशाला शेकडो विश्वेश्वरैय्यांची गरज आहे.
सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी झाला. हा दिवस भारत सरकारने अभियंता दिन म्हणून जाहीर केला आहे. भारत सरकारने विश्वेश्वरैय्या यांनी केलेल्या कार्याचा गौरव त्यांना ‘भारतरत्न’ ही पदवी प्रदान करून त्यांच्या प्रतिमेला मानाचा मुजरा केला आहे. त्यांच्या अफाट बुद्धिमत्तेने प्रभावित होऊन ब्रिटिश सरकारने त्यांना सर ही मानाची पदवी दिली. ‘चरैवेतीऽऽ चरैवेती... चालत राहा... चालत राहा’ या सततच्या कार्यतत्परतेमुळे शेवटच्या श्वासापर्यंत कर्तव्यदक्ष राहण्यामुळे निसर्गानेही त्यांना १०१ वर्षांचे दीर्घ आयुर्मान देऊन त्यांचा मोठाच सन्मान केला, असे म्हणावे लागेल.
कर्नाटकातील चिक्क बल्लारपूर या कोलाट जिल्ह्यातल्या मुद्देन हल्ली या खेडेगावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या पूर्वजांचे गाव आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम हे होय. तेच गावाचे नाव या कुटुंबाने आपल्या नावापुढे कायम स्वरूपात वापरले. मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या इतके प्रदीर्घ नाव उच्चारण्यास कठीण म्हणून लोक त्यांना एम.व्ही. या संक्षिप्त नावाने हाक मारीत असत. एम.व्ही. यांचा जन्म एका संस्कारसंपन्न कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री असे होते. ते संस्कृतचे गाढे विद्वान होते. त्यांच्या आईचे नाव व्यंकचम्मा असे होते. विश्वेश्वरैय्या यांचे प्राथमिक शिक्षण चिक्कबल्लापूर येथेच झाले. घरची परिस्थिती अत्यंत सामान्य होती. मॅट्रिकच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी त्यांना थेट मद्रासपर्यंत चालत जावे लागले होते. मॅट्रिकची परीक्षा चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्यानंतर बंगळुरू येथील सेंट्रल कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला व बी.ए. परीक्षा विशेष गुणवत्ता मिळवून ते उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना म्हैसूर सरकारची शिष्यवृत्ती मिळाली. पुढील अभियांत्रिकी शिक्षणासाठी ते पुण्यास आले. १८८३ मध्ये ते मुंबई विद्यापीठाची अभियांत्रिकी पदवी प्रथम श्रेणीत झाले. मुंबई प्रांतात या परीक्षेत सर्वप्रथम आले, त्यामुळे त्यांच्या ज्ञानाचा लौकिक सर्वदूर पसरला.
त्याकाळात आपल्या देशावर इंग्रजांचे राज्य होते. सरकारने त्यांची गुणवत्ता ओळखून त्यांना सार्वजनिक बांधकाम खात्यात सहायक अभियंता म्हणून नियुक्त केले. नियुक्तीनंतर त्यांना नाशिक जिल्ह्याचे अभियंता म्हणून नियुक्त करण्यात आले. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. पुणे येथील खडकवासला या दगडी धरणाला त्यांनी भारतात प्रथमच स्वयंचलित दरवाजांची योजना केली. १९०४ साली त्यांना शासनाने आरोग्यअभियंता या पदावर बढती दिली. इ.स. १९०६ मध्ये अरबी समुद्र व तांबडा समुद्र यांच्या परिसरातील एडन या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या ठिकाणी सहायक बंदर अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. तेथे त्यांनी लष्करासाठी उत्तम वसाहती उभारल्या. त्यांनी १९०७ साली मुंबई सरकारची नोकरी सोडली. त्यानंतर त्यांना हैदराबाद संस्थानात निमंत्रित करण्यात आले. हैदराबाद शहराची पुनर्रचना इसा व मुसा या नद्यांच्या पुरापासून शहराची सुटका करून शहररचनेचे व पूरनियंत्रण कसे करावे, याचा आदर्शच त्यांनी घालून दिला. या उपद्रवकारी दोन्ही नद्यांना धरणे बांधून ते पाणी शेतीसाठी व शहरासाठी वळवले.
इ.स. १९०९ मध्ये म्हैसूर संस्थानचे महाराज कृष्णराज वाडियार यांनी विश्वेश्वरैय्या यांची नियुक्ती संस्थानचे प्रमुख अभियंता म्हणून केली. त्यांचे संस्थानातील कार्य, सामाजिक कामातील तळमळ, वक्तशीरपणा हे सर्व गुण पाहून महाराजांनी त्यांना संस्थानचे दिवाण म्हणून नेमले. हातात भरपूर अधिकार येताच विश्वेश्वरैय्यांनी म्हैसूर संस्थानने शिक्षणासाठी दिलेला आर्थिक आधार स्मरणात ठेवून संस्थानासाठी अथक परिश्रम केले. म्हैसूर संस्थानातील शेतीत त्यांनी अनेक बदल घडवून आणले. म्हैसूर बँक, म्हैसूर विद्यापीठ, मुलींसाठी वसतिगृह, कृषी महाविद्यालय, कन्नड साहित्य अकादमी व विश्वेश्वरैय्या यांचे चिरंतन स्मारक व या त्यांच्या रसिकतेचा मानबिंदू म्हणजे कृष्णराज सागर डॅम’ हे कावेरी नदीवरील अद्वितीय धरण व धरणाच्या परिसरातील ‘वृंदावन गार्डन’ ही विश्वेश्वरैय्याची अपूर्व देणगी आहे. हे धरण बांधले तेव्हा भारतात सिमेंट तयार होत नव्हते. तेव्हा लाखो गोण्या सिमेंट परदेशातून मागवण्यापेक्षा विश्वेश्वरैय्यांनी कृष्णराज सागर हे धरण संपूर्ण चुन्यात बांधून काढले. विश्वेश्वरैय्यांचे हे देशप्रेम, म्हैसूर संस्थानसाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी पाहून महाराजांनी या धरणाचे नाव ‘मोक्षगुंडम विशेश्वरैय्या डॅम’ असे ठेवावे असा आग्रह धरला, परंतु या नि:स्पृह महात्म्याने महाराजांची इच्छा नम्रपणाने नाकारली. शंभर वर्षे उलटून गेली तरी स्वदेशी चुन्यात बांधलेला हा वास्तुपुरुष अभेद्य आहे.
दक्षिण गंगा कावेरी कर्नाटकच्या लेकरांना पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगधंद्यासाठी पाणीपुरवठा करते आहे. ‘कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये तू सरस्वती’ ही सारी विश्वेश्वरैय्यांच्या हातांची किमया होती. भारतीय मनुष्य फार आळशी आहे हे अनेक विचारवंतांप्रमाणेच विश्वेश्वरैय्यांचेही मत होते. त्यामुळे ते कार्यालयीन वेळेच्या व्यतिरिक्त काम करत असत. भ्रष्टाचाराबद्दल त्यांना अत्यंत घृणा होती. त्याकाळात विजेचे दिवे नव्हते. कार्यालयात मेणबत्त्या वापरत असत. सरकारी काम करताना ते संस्थानच्या मेणबत्त्या वापरत असत, घरचे काम सुरू होताच त्या विझवून स्वत:च्या मेणबत्त्या वापरत असत.
रिकन्स्ट्रक्टिंग इंडिया (१९२०) प्लांट इकॉनॉमी फॉर इंडिया (१९३४) प्रॉस्पेरिटी थ्रू इंडस्ट्री, मेम्बॉयर्स आॅफ माय वर्किंग लाइफ (१९६०) हे त्यांचे ग्रंथ. चंदनाची झाडे पिकविणाऱ्या म्हैसूरमध्ये त्यांनी चंदन सोप फॅक्टरी, चंदन आॅइल फॅक्टरी सुरू केली. आजचे कर्नाटक राज्य हे बाहेरून येणाºया प्रवाशांचे आवडते ठिकाण आहे. याचे कारण एम.व्ही. आहेत. ते दिवाण असताना त्यांनी प्रवाशांसाठी राज्यात उत्तम हॉटेल्स उभारण्यावर भर दिला. त्यामुळे कर्नाटकात जाणारे प्रवासी खाण्याच्या बाबतीत संतुष्ट असतात. इतकेच नव्हेतर कोणत्याही शहरात प्रवासी जातात. तेव्हा उडपी हॉटेल खाण्यासाठी निवडतात.
भारतातील उत्तम कार्य करणाºया अभियंत्याला त्यांच्या नावाचा पुरस्कार महाराष्टÑात दिला जातो. विश्वेश्वरैय्यांचे राष्टÑीय स्मारक त्यांच्या मुद्देनहळ्ळी या गावात आहे. आता देशात दररोज इमारती कोसळतात, धरणे फुटतात, रस्ते खड्ड्यांत गेले आहेत. अशावेळी त्यांचे स्मारक प्रत्येक अभियंत्याचे काशी ठरले पाहिजे.