विलक्षण लेखिकेबाबत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 12:42 PM2017-07-24T12:42:51+5:302017-07-25T16:33:44+5:30
अमृता प्रितम हे काय रसायन आहे. त्यांच्या कितीतरी खुल्लमखुल्ला हकीकती आपल्या ‘रसिदी टिकट’ या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. (या पुस्तकाच्या मराठीत अनुवाद झालेला आहे)एकूण अमृता प्रितम हा विषय निघाला की काहीतरी विलक्षण हकीकत कळतेच.
- रविप्रकाश कुलकर्णी
अमृता प्रितम हे काय रसायन आहे. त्यांच्या कितीतरी खुल्लमखुल्ला हकीकती आपल्या ‘रसिदी टिकट’ या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. (या पुस्तकाच्या मराठीत अनुवाद झालेला आहे)एकूण अमृता प्रितम हा विषय निघाला की काहीतरी विलक्षण हकीकत कळतेच.
काही काही लेखकांचं आकर्षण न संपणारं असतं. क धी त्यांचं साहित्य मोह घालणारं असतं तर कधी व्यक्तीमत्त्व पण. या दोन्ही गोष्टी एकाच व्यक्तीमध्ये असणं हे तसं दुर्मिळ असतं. अशा लेखकांमध्ये एक नाव - अमृता प्रितम!
खरं तर ही लेखिका मूळ पंजाबी भाषेत लिहिणारी. पण हिंदी इंग्रजी अनुवादामुळे साऱ्या जगात पोचली. त्यात देखील आपल्याकडे ती गाजली ती तिच्या विवादास्पद आयुष्यामुळे.
आपण साहिर लुधयानवी या कवीवर मन:पूर्ण प्रेम करतो हे तीनं खुलेआम सांगितलंच. पण लिहिलं देखील. या गोष्टीचा किती ब्रभ्रा व्हावा?
राजेंद्रसिंग बेदीनं तर म्हटलं की, अमृता प्रितमला जो मुलगा आहे तो साहिरपासून झालेला आहे! यावर अमृता प्रितमने काय उत्तर द्यावे?
‘‘यह सच है लेकिन बेदीका कल्पनाका सच है!’’
असं उत्तर अमृता प्रितमलाच सुचू शकते. पण याचा परिणाम अमृता प्रितमच्या मुलावर किती व्हावं? अर्थात त्याच्या अंगात अमृता प्रितमचंच रक्त. त्याने आपल्या आईलाच विचारलं, ‘‘मी प्रितम सिंहचा मुलगा आहे की साहिर अंकलचा? अमृता प्रितमचं त्याला उत्तर - ‘‘तू आपल्या वडिलांचाच मुलगा आहेस.’’ खरं तर एवढ्या उत्तरावर मुलाच्या मनातील संदेह दूर झाला असतां. पण अमृता प्रितमच ती. पुढे ती म्हणाली, ‘‘तू जर खरंच साहिरचा मुलगा असतास तर मला जास्त आनंद झाला असता!’’
अमृता प्रितम हे काय रसायन आहे. त्याची ही केवळ झलक, अशा कितीतरी खुल्लमखुल्ला हकीकती तीनं आपल्या ‘रसिदी टिकट’ या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. (या पुस्तकाच्या मराठीत देखील अनुवाद झालेला आहे)
एकूण अमृता प्रितम हा विषय निघाला की काहीतरी विलक्षण हकीकत कळतेच. त्यामुळेच नेहरु सेंटरमध्ये डॉ. विनीता सहाय आणि डॉ. गीता चढ्ढा या अमृता प्रितम याचं साहित्य आणि जीवनासंदर्भात बोलणार आहेत. हे कळताच इतर सगळी कामधाम बाजूला सारून, नेहरू सेंटरसारखं लांबंचं ठिकाण असूनसुद्धा जायचं ठरवलंच. पण त्या दिवशी काय लोकलचा गोंधळ होता कुणास ठाऊक पण, त्यामुळे जाताच आलं नाही. त्या कार्यक्रमाला जाणं अत्यावश्यक होतं. त्यामुळे न गेल्याची चुटपूट लागलीच. असं का तर, यामागे एक कारण आहे.
खूप वर्षापूर्वी पुण्याला गेलो असता श्री विद्या प्रकाशनाच्या मधुकाका कुलकर्णी यांची भेटगाठ झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही अमृता प्रितमचे फॅन ना? मग तुम्हाला तीचं ताजं ताजं पुस्तक देतो. मात्र त्यावर लगेच काही लिहू नका?’’ ‘‘म्हणजे काय?’’ माझा प्रश्न मधुकाका सांगू लागले,’’ अहो, काहीतरी भागनड झाली आहे.
अमृता प्रितमने कळविले आहे की हे पुस्तक छापू नका! पण त्याआधीच माझी पुस्तक छापून तयार झाली आहेत. आता ही एवढी पुस्तकं ठेवून तरी काय करणार? त्यामुळे झटपट पुस्तकं वितरीत करून मी मोकळा होणार आहे. मग पुढचं पुढे बघू काही झालं तर....’’
अमृता प्रितमचं हे पुस्तक म्हणजे - ‘हरदतका जिन्दगीनामा’ क्रांतीकारक हरदत्तच्या आयुष्यावरील ही कादंबरी आहे. चांगली आहे.
मग अमृता प्रितमने ही कादंबरी छापू नये असं का कळवावं? त्याबद्दल फारसं काही कळलं नाही. सदर पुस्तक (अनुवाद) मधुकाकांनी वितरीत करून टाकलं. तरी सुद्धा त्या बाबत काहीच ऐकू आलं नाही हे आश्चर्यच!
नंतर चौकशी केल्यावर कळलं की त्या पुस्तकाबाबत लेखिका कृष्णा सोबती यांनी हरकत घेतली आणि कोर्टाकडे धाव घेतली आहे! सदर पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, असा त्यांचा दावा होता.
अर्थात खटला, कोर्ट, हायकोर्ट अशा टप्प्यातून गेला. मात्र कादंबरीवर बंदी आली नाही. पण खटला मात्र चालू राहिला - नावाबाबत, विशेषत: जिन्दगीनामा नावाबाबत. कृष्णा सोबती यांच्या आत्मचरित्राचं नाव जिन्दगीनामा आहे. दरम्यान अमृता प्रितमचं निधन झालं.
तरी पण खटला चालूच राहिला! कृष्णा सोबती अडून बसल्या असाव्यात.
पुढे या प्रकरणाचं काय झालं? हा प्रश्न खरं तर व्याख्यानाला जावून विचारायचा होता. पण ते राहिलाच. आता या प्रश्नावर कुणी प्रकाश टाकेल काय?