टिळक आणि आझादांचे आदर्श अनुसरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 01:40 AM2018-07-23T01:40:13+5:302018-07-23T01:41:25+5:30

सर्व भारतीयांनी महान देशभक्तांकडून प्रेरणा घ्यायला हवी.

Follow the ideal of Tilak and Azad | टिळक आणि आझादांचे आदर्श अनुसरावे

टिळक आणि आझादांचे आदर्श अनुसरावे

Next

- व्यंकय्या नायडू (उपराष्ट्रपती)

आपली मातृभूमी या महान सुपुत्रांप्रति आभारी आहे. त्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी अतूट कटिबद्धता दर्शविली. दोघेही स्वातंत्र्यलढ्याचे नायक असून स्वांतत्र्यसंग्रामाच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णअक्षरांनी कोरले गेले आहे. सर्व भारतीयांनी या महान देशभक्तांकडून प्रेरणा घ्यायला हवी. आजच्या युवकांनी त्यांच्याकडून स्वदेशभक्तीची शिकवण घ्यावी. नव्या भारताच्या निर्मितीसाठी युवकांनी त्यांचे आदर्श अवलंबत अनुसरण करायला हवे.
टिळक हे ओजस्वी देशभक्त होते. त्यांनी भाषण, लेखन आणि कार्याच्या माध्यमातून राष्टÑीय चेतना जागविली. ऐक्य आणि राष्टÑीय स्वाभिमानाच्या अभावी देश विदेशी शक्तींच्या अधीन झाला, असा त्यांचा दृढ विश्वास होता. चंद्रशेखर आझाद यांचे जीवन देशाच्या स्वातंत्र्याची महागाथा असून देशासाठी सर्वोच्च बलिदानाची भावना प्रकट करते. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यावर नजर टाकली तर थोरांनी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी वेगवेगळा दृष्टिकोन ठेवल्याचे दिसून येते, मात्र देशाप्रति दुर्दम्य कटिबद्धता, राष्टÑीय स्वाभिमान निर्माण करण्याची भावना ही त्यांच्यातील समान बाब होती. त्यामुळेच देश यशस्वी स्वतंत्र राष्ट्र म्हणून विकसित होऊ शकले. देशाच्या सातत्यपूर्ण विकासासाठी ही बाब महत्त्वपूर्ण ठरते. प्रत्येक भारतीयाने विशेषत: आपल्या लोकसंख्येत महत्त्वपूर्ण वाटा असलेल्या युवकांनी आझादांप्रमाणे निडर क्रांतिकारीचा जोश अंगिकारत देशाच्या विविध आघाड्यांवरील आव्हानांचा सामना करण्याची तसेच टिळकांप्रमाणे कटिबद्धता दर्शवत राष्टÑवादाचा अवलंब करण्याची वेळ आली आहे.
गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य प्रत्येक नागरिकाला लाभावे. शेतकऱ्यांच्या जीवनातून तणाव दूर व्हावा, झोपडपट्टीवासीयांचा त्रास कमी व्हावा, प्रत्येक ठिकाणी मूलभूत गरजा प्रदान केल्या जाव्या. तसेच धर्म, क्षेत्र आणि जाती- समुदायाच्या आधारावर होणारा भेदभाव दूर करण्यासाठी ते आवश्यक आहे.
लाखो भारतीयांनी नि:स्वार्थ भावनेने स्वातंत्र्यलढ्याच्या संघर्षात भाग घेतला. चंद्रशेखर आझादांसारख्या साहसी आणि टिळकांसारख्या राष्टÑवादी नेत्यांनी त्यांचे नेतृत्व केले. आझाद हे दुर्दम्य साहसाचे प्रतीक होते. त्यांनी तरुण वयातच स्वातंत्र्यलढ्याच्या लढाईत उडी घेतली होती. अन्य युवकांसोबत त्यांना अटक झाली तेव्हा बनारसच्या दंडाधिकाºयांसमोर हजर करण्यात आले. त्यांनी स्वत:चे नाव आझाद, वडिलांचे नाव स्वातंत्र्य तर ‘जेल’ हाच आपला पत्ता असल्याचे बेधडकपणे सांगितले होते. त्यानंतर त्यांना १५ कोडे मारण्याची कठोर शिक्षा ठोठावण्यात आली होती. मातृभूमीचे स्वातंत्र्य हेच आझाद यांचे एकमेव ध्येय होते. ते गरीब कुटुंबातील होते. त्यांच्या जीवनात अन्य कोणतीही बाब महत्त्वाची नव्हती. क्रांतिकारी विचारांचे आझाद एक शिस्तबद्ध जीवन जगले. ते आपली तत्त्वे आणि मूल्यांप्रति निर्विवादपणे प्रामाणिक राहिले होते.
टिळकांनी ‘स्वराज्य माझा जन्मसिद्ध अधिकार असून तो मी मिळवणारच’ हा नारा दिला होता. तो इतिहासात अजरामर ठरला. टिळक हे विद्वान आणि समाजसुधारक होते. त्यांनी हुंडापद्धती, बालविवाहाला कडाडून विरोध केला. त्यांनी स्वातंत्र्यलढ्याबाबत जनजागृतीसाठी गणेशोत्सवासारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा वापर केला. एक कटूसत्य आहे की, स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे उलटली असली तरी देशात गरिबी, निरक्षरता, पेयजल, वीज, घरांची कमतरता आहे. स्वच्छतेचा अभाव, तसेच लैंगिक भेदभाव आणि शहर-ग्रामीण विभाजनाच्या समस्येशी देश संघर्ष करतो आहे. ही खाई दूर न केल्यास देशाच्या प्रगतीत अडसर निर्माण होईल. देशविकासाच्या कहाणीत कोणताही पूर्णविराम खपवून घ्यायला नको. एकीकडे विज्ञान आणि तंत्रज्ञानाची प्रगती आपल्या जीवनात क्रांती आणत असून संपूर्ण जग एक वैश्विक गावात रूपांतरित होत असताना दुसरीकडे काही घटक आपला स्वार्थ जपण्यासाठी विविध क्षेत्रांमध्ये नवनव्या अडचणी आणत आहेत, ही या काळाची क्रूर थट्टाच म्हणावी लागेल. काही वर्षांपूर्वी गुरुदेव टागोर यांनी ‘जगाला संकुचित भिंती खंडित करीत आहेत आणि तार्किकतेची स्पष्टता मृत रेगिस्तानात विलीन होत आहे, या शब्दांत इशारा दिला होता. लोक जातीयवाद, सांप्रदायिकता, धार्मिक कट्टरता आणि भाऊबंदकीत विभाजित होताना आपण पाहात आहोत. भ्रष्टाचार आणि दहशतवाद भारताच्या विकासात सर्वात मोठा अडसर बनला आहे. गेल्या ७० वर्षांमध्ये भारताला म्हणावी तशी प्रगती करता आली नाही, याबाबत दुमत नाही. कुणाकडे अंगुलीनिर्देश करण्याचा माझा उद्देश नाही.
सामाजिक, सांप्रदायिक किंवा प्रादेशिक असंतोषामुळे देशाचे तुकडे पडू दिले जाऊ शकत नाही. भारताच्या शत्रूची तीच इच्छा आहे. कोणतीही जात किंवा पंथ असो, सर्व भारतीयांनी एकजुटीने धोकादायक प्रवृत्तीशी लढण्याची आवश्यकता नाही. आपण बेफिकीर बनून तमाशा बघू शकत नाही. मी विशेषत: देशातील युवकांना आवाहन करू इच्छितो की, त्यांनी ‘नवभारता’च्या निर्माणासाठी समोर यावे.आज जगातील सहावी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारत समोर आला असून विकसित देश बनण्याची आणि येत्या १५-२० वर्षांमध्ये अग्रणी अर्थव्यवस्था बनण्याची क्षमता ठेवतो. आपण सामूहिकपणे गरिबी, अशिक्षितपणा, शहरी- ग्रामीण विभाजनाला संपुष्टात आणत कृषी, शिक्षण, आरोग्य आणि उद्योगाला सर्वोच्च प्राधान्य दिले तसेच कमकुवत घटकांना सशक्त बनविले तर हे लक्ष्य गाठू शकतो. आपल्याकडे असलेल्या लोकसंख्येच्या लाभांशाचा आपण पूर्ण फायदा घ्यायला हवा.
सरकारला भ्रष्टाचारमुक्त बनविण्यासोबतच राजकारणापासून तर शिक्षणापर्यंत विविध क्षेत्रात सुधारणा करायला हव्यात. भारताला ज्ञान-केंद्रित नवाचार आणि उत्कृष्टतचे वैश्विक केंद्र बनविण्याची गरज आहे. जेथे सर्व वर्गातील लोक सौहार्द्रपूर्ण सहअस्तित्वाने राहू शकतील. टिळक आणि आझादांसारख्या थोर नेत्यांकडून आपण या सर्व प्रेरणा घेण्याची गरज आहे. आपल्या खांद्यावरून गुलामगिरीचे जोखड फेकण्यासाठी त्यांनी रक्त आणि घाम गाळला होता, हे तथ्य आपण विसरलो तर इतिहास आपल्याला कधीही माफ करणार नाही. देशातील जनतेने स्वातंत्र्य आणि समानतेचा मोकळा श्वास घ्यावा यासाठी त्यांनी बलिदान दिले. या थोर नेत्यांना ज्या भारताची निर्मिती करायची होती ते पाहता त्यांचा आदर्श अंगिकारण्यासाठी प्रयत्न करणे ही आपली नैतिक जबाबदारी ठरते. ‘स्वराज्य या जन्मसिद्ध अधिकाराकडून आपण सुराज्याकडे वळावे. जो आपला मूलभूत अधिकार आहे. हीच आपल्या महान स्वातंत्र्य सेनानींना खरीखुरी आदरांजली ठरेल.
 

Web Title: Follow the ideal of Tilak and Azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.