खजुरीया, हजुरीया, मजुरीया

By अोंकार करंबेळकर | Published: August 7, 2017 01:13 PM2017-08-07T13:13:55+5:302017-08-07T13:43:27+5:30

बंगळुरुमध्ये काही दिवस राहिल्यावर मंगळवारी कॉंग्रेसचे आमदार नक्की कोणाला मतदान करणार?, त्यांची मतं फुटणार का? अहमद पटेल राज्यसभेत जाणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. पण गुजरातमधील आमदारांच्या बाबतीत असा रिसॉर्टमध्ये राहण्याचा प्रकार पहिल्यांदाच झालेला नाही. 

history of MLA coup in Gujrat | खजुरीया, हजुरीया, मजुरीया

खजुरीया, हजुरीया, मजुरीया

Next
ठळक मुद्दे22 वर्षांपुर्वी भाजपामध्ये असताना शंकरसिंह वाघेलांनी मुख्यमंत्री केशुभाई पटेलांविरोधात दंड थोपटले होते.आपल्या समर्थक आमदारांना त्यांनी मध्य प्रदेशात खजुराहोला सुरक्षित ठेवले होते.

कॉंग्रेसचे चाणक्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अहमदभाई पटेल यांना राज्यसभेत जाता येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टी जंग जंग पछाडत आहे. कॉंग्रेसच्या अंतर्गत वादाला कंटाळून शंकरसिंह वाघेला यांनी दोन आठवड्यांपुर्वी पक्षाला रामराम केला. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर आणखी पाच आमदारांनी राजीनामा दिला, त्यातील काहींनी भाजपामध्येही प्रवेश केला. अहमद पटेल यांना राज्यसभेत जाण्यासाठी 44 आमदारांचे पाठबळ आवश्यक आहे मात्र अशा प्रकारे पक्षाला गळती लागली तर त्यांचा राज्यसभा प्रवेश धोक्यात येऊ शकतो हे कॉंग्रेसने जाणलं. भाजपा आपल्या आमदारांना फोडण्याचे प्रयत्न करत असल्याचा आरोप करून कॉंग्रेसने आपल्या आमदारांना बंगळुरुला रिसॉर्टमध्ये सुरक्षित ठेवलं. त्यानंतर आज सोमवारी त्यांना पुन्हा गुजरातमध्ये आणलं आहे. उद्या मंगळवारी हे आमदार नक्की कोणाला मतदान करणार?, त्यांची मतं फुटणार का? अहमद पटेल राज्यसभेत जाणार का ? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळतील. पण गुजरातमधील आमदारांच्या बाबतीत असा रिसॉर्टमध्ये राहण्याचा प्रकार पहिल्यांदाच झालेला नाही. 


22 वर्षांपुर्वी असाच प्रकार भाजपाच्या आमदारांसोबत झालेला होता. केशुभाई पटेलांविरोधात शंकरसिंह वाघेला यांनी दंड थोपटले होते. 1995 साली झालेल्या निवडणुकीमध्ये भाजपाला गुजरात विधानसभेत 182 पैकी 121 जागा जिंकता आल्या होत्या. या विजयानंतर शंकरसिंह वाघेला आणि त्यांच्या समर्थकांना वाघेलाच मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. मात्र तसे झाले नाही. मुख्यमंत्री पदासाठी केशुभाई पटेल यांचे नाव जाहीर करण्यात आले. तेव्हा गुजरातमध्ये पक्षाच्या सरचिटणीस पदावरती असणाऱ्या नरेंद्र मोदी यांनीही आपले वजन केशुभाईंच्या पारड्यात टाकले. या सर्व प्रकारामुळे वाघेला आणि समर्थक चांगलेच दुखावले होते, त्यातून मंत्रिमंडळातही पटेल आणि मोदी यांच्या जवळच्या लोकांनाच स्थान मिळाले अशी वाघेला समर्थक आमदारांची भावना तयार झाली होती. याच वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये केशुभाई पटेल अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले.

त्यामुळे वाघेला यांना बंड करण्यासाठी पटेल भारताबाहेर असण्याची नामी वेळ साधता आली. आपल्या समर्थक आमदारांना घेऊन ते अहमदाबाद जवळच्या एका खेड्यात गेले. हे 55 समर्थक आमदार होते. परंतु तेथे पुरेसे संरक्षण नसल्याचे जाणवल्यावर त्यांनी या आमदारांना गुजरातबाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु केला. एकीकडे महाराष्ट्रात शिवसेना- भाजपा युतीचे सरकार आणि राजस्थानमध्ये भैरोसिंह शेखावत यांचे भाजपा सरकार असल्यामुळे कोठे जायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर होताच. म्हणून त्यांनी शेजारच्या कॉंग्रेसशासित मध्यप्रदेशमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा दिग्विजय सिंह मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते. रात्रीच्या वेळेस दमानिया एअरवेजचे विमान या 55 आमदारांना घेऊन हवेत झेपावले तेव्हा कोठे या आमदारांना आपण मध्य प्रदेशात खजुराहोला चाललो असल्याचं समजलं. खजुराहोला एका उत्तम हॉटेलमध्ये सोय करण्यात आली.

इकडे या बंडाळीची बातमी फुटल्यावर भारतीय जनता पार्टीमध्ये चांगलीच गडबड उडाली. शेवटी अटलबिहारी वाजपेयी यांनी मुख्यमंत्रीपदी केशुभाई पटेलही नकोत आणि वाघेलाही नकोत असा फॉर्म्युला मांडला आणि सुरेश मेहता यांना मुख्यमंत्रीपदी नेमण्यात आले. त्यामुळे बंड शमले तरी वाघेला-पटेल गटातला वाद शमला नव्हता. खजुराहोला जाऊन राहणाऱ्या आमदारांना गुजरातमध्ये खजुरीया नावाने ओळखले जाते. तर केशुभाई समर्थकांना त्यांच्या प्रत्येक आदेशाला जी हुजुर म्हणण्याच्या वृत्तीमुळे हुजुरिया तर कोणत्याच गटात नसणाऱ्या आमदारांना मजुरीया असं ओळखलं जाई.

1996 साली लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये वाघेला गोध्रा मतदारसंघातून लढले मात्र त्यांचा तेथे पराभव झाला. त्यानंतर त्यांनी भाजपाच्या 48 आमदारांना घेऊन राष्ट्रीय जनता पार्टी नावाचा पक्ष काढला आणि कॉंग्रेसच्या मदतीने एकदाचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर त्यांनी थोड्या कालावधीसाठी दिलिप पारिख यांना मुख्यमंत्री केले आणि 1998 साली त्यांनी आपला पक्ष कॉंग्रेसमध्येच विलिन केला. त्यानंतर ते कॉंग्रेसच्या तिकिटावर आमदार, खासदारही झाले. संपुआच्या पहिल्या सरकारमध्ये त्यांना केंद्रामध्ये वस्रोद्योग खात्याची जबाबदारीही मिळाली. आता पुन्हा कॉंग्रेसमध्ये पटत नसल्यामुळे ते जुलै महिन्यात बाहेर पडले आहे. सध्या तरी कोणत्याही पक्षात प्रवेश केलेला नाही की स्वतःचा पक्ष काढलेला नाही. खजुराहो बंडाच्यावेळीस गुजरातच्या राजकारणातल्या पात्रांना पुढच्या आयुष्यात नव्या भूमिका करायला मिळाल्या. केशुभाई पटेल नंतर मुख्यमंत्री झाले, 2012 साली त्यांनी भाजपाही सोडला आणि गुजरात परिवर्तन पार्टीची स्थापना केली. तर नरेंद्र मोदी यांना सर्वाधीक काळ गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान मिळाला, 2014 साली ते भारताचे पंतप्रधान झाले. 

आमदार आणि रिसॉर्टचे जुने नाते
सरकार वाचवण्यासाठी, पाडण्यासाठी आमदारांना हॉटेल किंवा रिसॉर्टमध्ये ठेवण्याचे प्रकार भारतामध्ये आधीपासूनच होत आहेत. वृत्त वाहिन्या, वृत्तपत्रे यांचा त्यांच्याशी संपर्क होऊ नये यासाठीही प्रयत्न केले जातात. 1984 साली आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन.टी. रामाराव यांनी राज्यपालांनी सरकार बरखास्त केल्यानंतर हैदराबादमधील हॉटेलमध्ये आमदारांना एकत्र केलं होतं. 1988 साली तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.जी. रामचंद्रन यांचे निधन झाल्यानंतर त्यांची पत्नी जानकी आणि पक्षाच्या नेत्या जयललिता यांचे दोन गट तयार झाले. दोन्ही गटांनी आपले गट वाचवण्यासाठी समर्थक आमदारांना हॉटेलात ठेवलं होतं. 1998 साली कल्याणसिंह यांचं सरकार राज्यपालांनी बरखास्त केल्यानंतर फूट पडू नये म्हणून भाजपा खासदारांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं. अशा घटना बिहार, अरुणाचल, झारखंड, कर्नाटक, उत्तराखंड अशा राज्यांमध्ये अनेकदा घडल्या आहेत. जयललिता यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पश्चात अण्णाद्रमुक पक्षामध्ये शशिकला आणि ओ. पन्नीरसेल्वम असे दोन गट पडले. शशिकला गटाने आपले समर्थक फुटू नयेत म्हणून रिसॉर्टचाच आधार घेतला होता.

Web Title: history of MLA coup in Gujrat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.