प्रबळ सत्ताधारी आणि बदलती राज्यसभा
By अोंकार करंबेळकर | Published: August 12, 2017 01:18 PM2017-08-12T13:18:57+5:302017-08-12T13:57:26+5:30
काल राज्यसभेत सर्वच सदस्यांनी नायडू यांचे अभिनंदन करत कौतुक केले. नायडू यांनीही "इफ यू कोऑपरेट देन आय कॅन ऑपरेट " असं म्हणत आपल्या जोडाक्षर, यमक वापरण्याच्या सवयीनुसार सर्वांना हसतखेळत सूचनाही केली.
2014 साली केंद्रामध्ये नवे सरकार आल्यानंतर सुरुवातीचा काळ राज्यसभेत या सरकारसाठी चांगलाच खडतर होता. कम्युनिस्ट पक्षाचे केरळमधील खासदार पी. राजीव, कॉंग्रेसचे आनंद शर्मा, विरोधीपक्षनेते गुलाम नबी आझाद, जयराम रमेश, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी, बसपाच्या मायावती, जदयुचे शरद यादव, तृणमूलचे डेरेक ओ ब्रायन यांनी सत्ताधारी भाजपाला धारेवर धरण्याची एकही संधी सोडली नाही. काहीवेळेस संख्याबळाच्या जोरावर सरकारला दुरुस्त्याही स्वीकारायला लावल्या.
आता राज्यसभेचे चित्र बदलत आहे. पी. राजीव यांना पुन्हा राज्यसभेची संधी नाकारुन पक्षाने त्यांना पक्षकार्याला लावले. बंगाल, त्रिपुरा विरुद्ध केरळ अशा पॉलिट ब्युरोतील भेदामध्ये सीताराम येचुरींनाही पुन्हा राज्यसभा मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. राज्यसभेत विरोधकांना बसलेला हा सर्वात मोठा धक्का होता. त्यांच्या पक्षाने आपल्या घटनेत बदल करुन त्यांना पुन्हा राज्यसभेत पाठवावे अशी मागणी इतर खासदारांनी येचुरींच्या निरोप समारंभाच्या भाषणावेळी केला.
तिकडे आपल्याला बोलू दिले जात नाही असा दावा करत मायावतींनी तडकाफडकी सदस्यत्वाचा राजीनामा दिला. महागठबंधन सोडून नितिशकुमार बिहारमध्ये भाजपाबरोबर सत्तेत एकत्र आल्यामुळे आता शरद यादवांना आपला आवाज किती मोठा ठेवायचा याचा विचार करावा लागणार आहे. किंवा आता पक्षात राहायचं की दुसरं काही करायचं हे ते ठरवत आहे. नितिशकुमारांच्या निर्णयावर टीका करणाऱ्या राज्यसभेतील खासदार अली अन्वर यांना जदयूने बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
उपराष्ट्रपती पदी हमिद अन्सारी यांच्या जागी व्यंकय्या नायडू यांची निवड झाल्यामुळे राज्यसभेला ते शिस्त लावतील अशी अपेक्षा सत्ताधाऱ्यांना आहे. राज्यसभेत विनाकारण गोंधळ करतात त्यांना गप्प बसवण्याचं काम नायडू करतील असे थेट विधान शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री हरसिम्रत कौर यांनी नायडू यांच्या भाषणांवर आधारित पुस्तक प्रकाशनाच्यावेळेस केले. काल राज्यसभेत सर्वच सदस्यांनी नायडू यांचे अभिनंदन करत कौतुक केले. नायडू यांनीही "इफ यू कोऑपरेट देन आय कॅन ऑपरेट " असं म्हणत आपल्या जोडाक्षर, यमक वापरण्याच्या सवयीनुसार सर्वांना हसतखेळत सूचनाही केली.
भाजपाला सर्वात मोठा फायदा या काल झालेल्या पावसाळी अधिवेशनापासून होणार आहे तो वाढलेल्या संख्याबळाचा. भाजपाने आजवरच्या इतिहासात प्रथमच राज्यसभेत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला. आता भाजपाचे राज्यसभेत स्वतःचे 59 खासदार आहेत. तसेच जदयूसारखा भक्कम पक्ष रालोआमध्ये सामिल झाल्यामुळेही सत्ताधाऱी आघाडीला फायदाच झाला.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा स्वतः राज्यसभेत निवडून आल्यामुळे त्याचे आता पक्षातील खासदारांवर विशेष लक्ष असेल. या अधिवेशनात ओबीसी संदर्भातील घटनादुरुस्ती विधेयकावेळेस भाजपाचे 30 खासदार गैरहजर होते. या संधीचा फायदा घेत विरोधकांनी आपण सुचवलेल्या दुरुस्त्या संख्याबळावर स्वीकारायला लावल्या आणि महत्त्वाच्या विधेयकावेळेस भाजपा सदस्य गैरहजर होते यावरुन ते किती गंभीर आहेत ते समजतं अशी टीकाही सभागृहाबाहेर केली. या प्रकाराची पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी दखल घेऊन तातडीची बैठक घेतली. सदस्य गैरहजर का राहिले हे विचारण्यासाठी एक गटच स्थापन केला. खासदारांनी आपल्या अनुपस्थितीचं उत्तर त्या गटाकडे द्यावं अशी सुचना केली. संसदीय कामकाज मंत्री अनंत कुमार यांनीही जेव्हा पक्षादेश (व्हीप) काढला जातो तेव्हा सर्व सदस्यांनी उपस्थित राहणं आवश्यक असतं, या गैरहजेरीची दखल पक्षाध्यक्षांनी अत्यंत गांभिर्याने घेतली आहे, पुन्हा असा प्रकार होता कामा नये अशी कडक समज दिली आहे. या कडक शब्दांच्या भाषेचा आणखी एक अनुभव उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशीही आला. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी पसंत उमेदवारासमोर फक्त एक उभी रेष काढायची होती मात्र त्यातही चूका केल्याचे मतदानाच्या रंगित तालमीत दिसून आले. सात सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याचे अमित शाह यांनी जाहीरपणे आपल्या भाषणात सांगितले. या सदस्यांची नावेही जाहीर करता येतील पण तसं केल्यास अपमान होईल म्हणून फक्त असं उद्या खऱ्या मतदानाच्या वेळेस न करण्याची 'विनंती' त्यांनी केली. विशेष म्हणजे या कार्यक्रमात रालोआचे इतर सदस्यही उपस्थित होते. त्यामुळे राज्यसभेत आता सत्ताधारी भाजपाचे सदस्य अधिक संख्येने उपस्थित राहतील यात शंका नाही.