Blog : कोण खरं, कोण खोटं? जगासमोर भारताचं नाव होतंय छोटं!
By स्वदेश घाणेकर | Published: May 31, 2023 06:16 PM2023-05-31T18:16:20+5:302023-05-31T19:40:52+5:30
दिल्ली पोलिसांनी अटक केल्यानंतर विनेश फोगाटने गाडीच्या खिडकीतून नया देश मुबारक हो... केलेलं विधान क्रीडा प्रेमी म्हणून मनाला चटका लावणारे आहे.
भारतात सध्या क्रीडा क्षेत्रात नेमकं काय सुरूय, हेच अनेकांना कळेनासे झालेय... एकीकडे इंडियन प्रीमिअर लीग धुमधडाक्यात पार पडली, दुसरीकडे भारताला ऑलिम्पिक 'सुवर्ण' काळ दाखवणारे कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहेत. जानेवारीतही ते आंदोलनाला बसले होते, परंतु भारतीय ऑलिम्पिक समितीने त्यांना आश्वासन दिले अन् सर्व प्रकरण मिटले असे वाटले... पण, दोन महिने वाट पाहिल्यानंतर काहीच न झाल्याने कुस्तीपटूंनी पुन्हा आंदोलनाचा शड्डू ठोकला अन् आता वेगळीच 'दंगल' सुरू आहे...
भारतीय कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं हे आंदोलन असल्याचे समोर दिसतंय, पण यामागे बरंच काही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करून कुस्तीपटू आंदोलनाला बसले. पण, काही तज्ज्ञांच्या मते ब्रिजभूषण यांच्याकडून हरयाणाच्या कुस्तीतील वर्चस्वाला धक्का पोहोचत असल्याने हे सर्व प्रकरण सुरू आहे. या आंदोलनात हरयाणाचे कुस्तीपटू वगळता अन्य कोणत्याच राज्याचे खेळाडू नाहीत, असा दावाही केला जातोय... कुस्तीपटूंच्या आंदोलनाची दखल न्यायालयाने घेतली अन् दिल्ली पोलिसांनी FIR दाखल करूनही घेतली.. पण, पुढे काय?
हाच प्रश्न कुस्तीपटूंसह सामान्यांनाही पडला आहे.. काही माध्यमांच्या वृत्तानुसार ब्रिजभूषण यांच्याविरोधातील पुराव्यांच्या अभावामुळे गाडी पुढे सरकत नाही, तर दिल्ली पोलिस म्हणते आमचं काम सुरू आहे. ब्रिजभूषण हे सत्ताधारी भाजपाचे खासदार आहेत आणि त्यांना वाचवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावल्याचाही आता आरोप होतोय. लैंगिक अत्याचाराचे आरोप होऊनही यंत्रणेचा वेग पाहून ही शंका चुकीचीही वाटत नाही. जानेवारीमध्ये जेव्हा कुस्तीपटू उपोषणाला बसलेले तेव्हा त्यांनी अन्य पक्षांना आंदोलन ठिकाणावरून हिस्कावून लावले होते, परंतु आता परिस्थिती वेगळी दिसेतय.. आता कुस्तीपटूंचं आंदोलन राजकीय पक्षांनी हायजॅक केलेले दिसतंय..
Wrestlers’ protest: ही नौटंकी करू नका, याने काहीच साध्य होणार नाही - ब्रीजभूषण सिंग
२०१६ऑलिम्पिक स्पर्धेतील कांस्यपदक विजेती साक्षी मलिक, राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेती विनेश फोगट आणि टोक्यो २०२० कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया यांसारखे भारतातील काही नामवंत कुस्तीपटू लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात एका महिन्यापासून जंतरमंतरवर निदर्शने करत आहेत. सिंग यांच्यावर सात महिला कुस्तीपटूंचा छळ करण्याचा ( त्यापैकी एक अल्पवयीन आहे) आरोप आहे. त्यात सरकार ऐकत नसल्याने काल कुस्तीपटूंनी पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला होता. पण, तिथेही नाट्यमय वळण पाहायला मिळाले... शेतकरी नेते राकेश टिकैत, नरेश टिकैत तिथे पोहोचले अन् त्यांनी पदकं स्वतःकडे घेतली अन् कुस्तीपटूंची समजूत काढली. हे पाहणाऱ्यांना थोडं नाटकीय वाटणं साहजिकच आहे..
पण, या सर्व प्रकरणाचे पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटताना दिसू लागले आहेत. काल जागतिक कुस्ती महासंघाने आणि आज आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं या प्रकरणावर केलेले भाष्य गंभीर आहे. या दोन्ही संघटनांनी तपासावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आणि भारतीय कुस्ती महासंघावर निलंबनाचा इशारा दिला आहे. ज्या खेळाडूंनी देशाला आंतरराष्ट्रीय पदकं जिंकून दिली, त्यांची ही अवस्था सामान्यांना नक्की पाहावत नसेल. ब्रिजभूषण यांची समर्थक आर्मीही कामाला लागली आहे आणि फोट मॉर्फिंग करून ते कुस्तीपटूंची खिल्ली उडवत आहेत.. आतापर्यंत त्यांच्यावर सरकारने केलेल्या खर्चाचा हिशोब मांडताना ते दिसत आहेत.. पण, या मुर्खाना हे कळत नाही, खेळाडूंनी या पैशाचं चीज केलं आणि म्हणून देशाला ऑलिम्पिक, राष्ट्रकुल, आशियाई स्पर्धेत पदकं जिंकता आली आहे.
... तर भारतीय कुस्तीपटूंना 'तिरंग्या'खाली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळता नाही येणार!
काही लोकं तर हे प्रकरण ७ वर्षांपूर्वीचं आहे, तेव्हा झोपा काढत होता का असा सवाल करत आहेत. पण, या लोकांना रोज त्यांचा बॉस मानसिक त्रास देत असेल, पण नोकरी टीकावी म्हणून ते गपगुमान सहन करत असतील. खेळाडूंना पोलिसांकडून दिली जाणारी वागणूक, त्यांच्यावर सोशल मीडियावर केले जाणारे खालच्या स्थरावरील आरोप निंदनीय आहेत. पण, त्याचवेळी खेळाडूंचंही अती होतंय... हे प्रकरण न्यायालयात, पोलिसांत असताना हातघाईला येणं चुकीचं आहे. ते म्हणतात म्हणून ब्रिजभूषण सिंहला लगेच अटक करून कारवाई होईल, असं नसतं.. तुम्ही पुरावे सादर करा अन् रस्त्यावर ताकद वाया घालवण्यापेक्षा न्यायालयासमोर पुरावे सादर करा अन् तिथे ताकदीने लढा... त्यानंतरही न्याय न मिळाल्यास पुढची दिशा ठरवा..
कुस्तीपटूंचं आंदोलन, ब्रिजभूषण यांच्या समर्थनात सुरू असलेला सोशल मीडियावरील प्रकार यातून कोण चुक, कोण बरोबर हे सांगणं अवघड आहे. पण, या सर्व गोष्टींमुळे देशाची इभ्रत जातेय याची जाण खेळाडूंनी व ब्रिजभूषण सिंह यांनीही राखायला हवी.