राज्यपाल भवनातून यादी गायब झाल्याबद्दल गुन्हा दाखल करा.पुणे शिवसेनेची पुणे पोलिसांकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 02:43 PM2021-05-25T14:43:56+5:302021-05-25T14:46:16+5:30
यादी गायब झाल्याचे आत्ता पर्यंत कसे सांगितले नाही ? सेना नेत्यांचा सवाल
राजभवनातून १२ आमदारांचा नावाची यादी गहाळ झाल्याबद्दल संबंधितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शिवसेनेने केली आहे. पुण्यातल्या शिवसेना शहर प्रमुखांच्या वतीने या मागणीसाठी पोलिस आयुक्तांना निवेदन देत त्यांनी कारवाई ची मागणी केली आहे.
सरकार चा वतीने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना ६ नोव्हेंबर २०२० ला विधानपरिषदेवर नियुक्ती करण्यासाठी सदस्यांची यादी सादर करण्यात आली होती. महाविकास आघाडीचा वतीने अनिल परब, नवाब मलिक आणि अमित देशमुख यांनी ही यादी सादर केली होती. यामध्ये शिवसेना , राष्ट्रवादी आणि काँग्रेस तर्फे प्रत्येकी ४ सदस्यांची नावे देण्यात आली होती. मात्र आता ती यादी राजभवनातून गहाळ झाली असे सांगण्यात आले.
राजभवन सारख्या अती महत्त्वाचा वास्तू मधून ही यादी गहाळ होणे हे अत्यंत दुर्दैवी, निंदनीय बाब असल्याचे सेनेचा वतीने दिलेल्या निवेदनात म्हणले आहे. सदर प्रकरणात राज्यपाल किंवा राजभवनातून पोलिसांना कोणती माहिती किंवा तक्रार मिळाली का असा सवाल सेना नेत्यांनी विचारला आहे. याबाबत कोणती कारवाई झाली का आणि नसेल तर ही बाब लपवण्यात का आली ? ही यादी परत का मागण्यात आली नाही? असा सवाल देखील सेना नेत्यांनी उपस्थित केला आहे.यादी सुपूर्द केली त्या दिवसापासून ते आत्ता पर्यंत राजभवनात कोण कोण आले याचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात यावे तसेच याची सखोल चौकशी करावी अशी मागणी सेनेने केली आहे. या संदर्भात संबंधितांवर गुन्हा दाखल करावा असेही या पत्रात म्हणले आहे.
सेनेचा वतीने शहर प्रमुख संजय मोरे , गजानन थरकुडे, आणि आनंद दवे यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन दिले.