लग्न जमविण्यापूर्वी विवेकी जोडीदाराची निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 01:42 PM2019-01-12T13:42:34+5:302019-01-12T13:43:58+5:30
आपल्या जोडीदाराची निवड डोळसपणे व पूर्ण विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे.
- आनंद बिरादार
मागील वर्षी महाराष्ट्रात ५ लक्ष पेक्षा जास्त, तर भारतात १ करोड पेक्षा जास्त लग्न झालेली आहेत. भारतात विवाहितांच्या घटस्फोटांचे पूर्वी हजारात १ असे असलेले प्रमाण आता हजारात १३ एवढे जास्त झालेले आहे. २७ टक्के विवाहित महिलांना नवऱ्याच्या अत्याचाराला सामोरे जावे लागते. यापैकी कौटुंबिक हिंसाचाराचे तक्रार दाखल होण्याचे प्रमाण हे अगदी नगण्य आहे. उर्वरीत महिला या आयुष्यभर पतीचा अत्याचार सहन करीत असतात. पति पेक्षा पत्नीचा पगार जास्त असणे, पति-पत्नीत संवादाचा अभाव, एकमेकांसाठी अपुरा वेळ, कुटुंबातील इतर व्यक्ती सोबत वाद, एखाद्या व्यक्तीच्या मनाविरूद्ध त्याचे लग्न कुटुंबियांनी जबरदस्तीने लावून देणे अश्या अनेक विविध कारणांमुळे घटस्फोट होत असतात.
लग्न ही दोन व्यक्तींच्या जीवनातील सर्वात सुंदर आणि महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न म्हणजे सर्वांना काव्य सुचते, जसे दोन जीवांचे मधुर मिलन, दो हंसो का जोडा इत्यादी इत्यादी. पण, प्रत्यक्षात भिन्न संस्कार, भिन्न परिस्थिती आणि भिन्न कल्पनेत वाढलेली दोन माणसे यात कायमची एकमेकासोबत जोडली जातात. यामुळे दोघांचेही जीवन बदलते. ज्यांना सोबत संसार थाटायचा आहे. त्या दोघांची एकमेकांना संमती असणे आवश्यक आहे. नसता त्यांना आयुष्यभर दडपणाखाली जगावे लागते. काही वेळेस लग्नापूर्वी जोडीदाराकडून अवाजवी अपेक्षा ठेवले जातात व लग्नानंतर ते पूर्ण होत नसल्याचे दिसून आल्यानंतर मनात असंतुष्टता राहते. त्यातून राग, चिडचिडपणा, भांडण उद्भवतात. यावर उपाय म्हणजे अवाजवी अपेक्षा न करणे व जोडीदाराची निवड करतानाच ती विवेकी पद्धतीने करणे.
जोडीदाराची निवड हा लग्नसंस्कारातला सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. ही निवड जर योग्य झाली तर विवाहातून एक उत्तम सहजीवन फुलते आणि एक यशस्वी व आदर्श संस्कार उभा राहतो. परंतु, अनेकजण हे फक्त कुंडली, रास, बाह्यसौंदर्य, पगार आणि जात पोटजात याच गोष्टी पाहून लग्न ठरवतात. पण यातली कुठलीच गोष्ट भविष्यात तुमच्या वैवाहिक आयुष्यात घुसमट होणार नाही याची हमी देऊ शकत नाहीत. विशेषत: गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबात मुलगी वयाने फक्त थोडी मोठी झाली की लगेच जेथे जमेल तेथे लग्न उरकून टाकतात. इतर वर्गात देखील बहुतांश जण जोडीदार निवडताना पुरेसे गंभीर नसतात.
आपल्या जोडीदाराची निवड डोळसपणे व पूर्ण विचारपूर्वक करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रथम स्वत:ला ओळखता यायला हवे. आणि आपल्या स्वभावाप्रमाणे जोडीदार निवडताना अवास्तव अपेक्षा वा भ्रामक समजूती टाळायला हव्यात. अनेक पालकांचा असा गैरसमज असतो की एकदा लग्न झालं की पुढच्या गोष्टी आपोआप चांगल्या होतील. पण त्यामुळे लग्न झालेल्या व्यक्तींना आयुष्यभर त्रास सहन करावा लागू शकतो.
जोडीदार निवडताना नाईलाजाने निवड करू नये. जोडीदाराबद्दल अवास्तव अपेक्षा करू नयेत. लग्नासाठी अतिरेकी तडजोडी करू नयेत. आंतरीक गुणांची पारख करायला हवी. वास्तविक जिवनाची व भविष्याची रूपरेषा स्पष्ट करायला हवी. जोडीदारांनी एकमेकात मोकळेपणाने व प्रामाणिकपणे संवाद साधायला हवा. घाईने, उताविळपणे व भावनेच्या भरात निर्णय घेऊ नये. एकमेकांच्या छंदांची व आवडी निवडींची माहिती घ्यायला हवी. लग्नानंतर कराव्या लागणाऱ्या तडजोडीची व्याप्ती स्पष्ट असावी. सवयी, मित्र-मैत्रिणी याबद्दल माहिती घ्यायला हवी. विवाह जमवताना कोणतीही गोष्ट दोन्ही बाजूच्या लोकांनी खूप प्रतिष्ठेची न करता व कुठलीही गोष्ट जास्त न ताणता पारदर्शकपणे स्विकारल्या तरच विवाहितांचे सहजीवन सुंदरपणे फुलते.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी जोडीदाराच्या विवेकी निवडीसाठी पंचसुत्रे सांगितलेली आहेत. प्रत्येक लग्नेच्छुक तरूण- तरूणीने जोडीदाराची निवड करताना व्यसनाला शंभर टक्के नकार द्यायला हवा. कुंडलीला शंभर टक्के विरोध करायला हवा. रंग-रूप- उंची यापेक्षा भावनिक, बौद्धिक आणि मुल्यात्मक अनुरूपता तपासायला हवे. प्रेम व आकर्षण यातील फरक समजून घ्यायला हवा. आणि लग्न साध्या पद्धतीने किमान कर्ज न काढता तरी करायला हवे.
लव्ह मॅरेज व अरेंज मॅरेज या दोन्हींना एकत्र आणून, पालक व मुलांचा दोघांचाही सहभाग घेऊन अंनिस ने जोडीदाराची विवेकी निवड हा उत्तम उपक्रम सुरू केला आहे. यात प्रेम व आकर्षणातील फरक, संसार व सहजिवनातील फरक, स्वत:ची ओळख, एकमेकांची संमती, जबाबदारी पेलण्याची क्षमता, हुंडा विरोध, सवयी, व्यसने, आवडी-निवडी, स्वभाव, भविष्यातील आव्हाने, वैद्यकीय तपासणी, आनुवंशिक रोग हे सर्व मुद्दे प्रत्यक्ष कार्यशाळेतून व व्हॉटस्अॅपद्वारे समजाऊन दिले जातात. अशा सर्व मुद्यांवर चर्चा करून जोडीदाराचा परीपुर्ण परिचय करवून विवाह घडविला जातो. या उपक्रमाचा उद्देश विवाह जुळवणे हा नसून, योग्य जोडीदाराची निवड कशी करावी याचे डोळस प्रशिक्षण देणे असे आहे.