corona virus-युद्ध जिंकायचे, कोरोनाला हरवायचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2020 12:46 PM2020-07-17T12:46:10+5:302020-07-17T15:30:00+5:30
अदृश्य कोरोनाला आहे त्याठिकाणी थांबविण्यासाठी भारतीय संस्कृतीचा अवलंब केला आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तर या महाभयंकर कोरोनाला आपण रोखू शकतो.
कोरोना (कोविड-19) विषाणूने आज जगभरात थैमान घातले आहे. त्याची लागण आपल्या देशात, राज्यात आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही झालेली आहे. मानव जातीच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण करण्यााऱ्या या अदृश्य शत्रुचा समूळ नाश करण्यासाठी सद्यातरी वैद्यकीय विश्वात त्याच्यावर औषध नाही. पण या अदृश्य कोरोनाला आहे त्याठिकाणी थांबविण्यासाठी भारतीय संस्कृतीचा अवलंब केला आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन केले तर या महाभयंकर कोरोनाला आपण रोखू शकतो.
जग आज नोवेल कोरोना विषाणूच्या संक्रमनामुळे त्रस्त आहे. जगातील जवळजवळ सर्वच देशामध्ये या विषाणूपासून होणाऱ्या कोविड झ्र 19 या आजाराचा फैलाव झाला आहे. त्यामुळे फक्त सामाजिकच नाही तर आर्थिक,शैक्षणिक, राजकीय अशा मानवी जीनवाच्या सर्वच अंगांवर आपला प्रभाव टाकला आहे. अनेक देश लॉकडाऊन आहेत. त्यास आपला भारतही अपवाद नाही. सद्याच्या या संकटावर मात करण्यासाठी खचून न जाता त्याचा खंबीरपणे सामना करायचा आहे. कोरोना (कोविड-19) विषाणूवर मात करण्यासाठी आपला देश अहोरात्र झटत आहे. राज्यचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे राज्यस्तरावर प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. त्यांच्याच साथीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सावंत जिल्ह्यासाठी तत्परतेने रात्र दिवस काम करीत आहे. जिल्हा प्रशासन प्रमुख जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी, पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी. हेमंत वसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे हे जिल्ह्यात कोरोना (कोविड-19) विषाणूची साथ पसरु नये त्यावर अंकुश लावून जिल्हा कोरोना मुक्त कसा करता येईल यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करीत आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 24 जण कोरोना बाधीत आढळले आहेत. तर जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत एक हजार पेक्षा जास्त नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. रोज सुमारे 60 नमुने तपासणीसाठी कोल्हापूर येथे पाठविण्यात येत आहेत. जिल्ह्या बाहेरून येणाऱ्यांना गृह अलगीकरणात ठेवण्यात येत आहे. तसेच काही व्यक्तींना संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात येते. त्यांची सोय व्हावी यासाठी ग्राम पातळीवर अलगीकरणासाठी ग्राम समिती, नागरी भागात वॉर्ड समिती स्थापन करण्यात आली असून त्यांनी गावातील अलगीकरणात लोकांना ठेवता येतील अशा जागा निश्चित केल्या आहेत.
जिल्ह्यात सापडणाऱ्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचेही नमुने तपासणीसाठी पाठविले जात आहेत. तसेच जिल्ह्यात रुग्ण सापडलेल्या ठिकाणी बाधीत क्षेत्र घोषीत करुन या क्षेत्रातील व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. जिल्ह्यात सध्या 94 फिवर क्लिनीक कार्यरत असून त्यासोबतच 17 संस्थांमधअये कोविड केअर सेंटर, 4 डेडिकेटेड कोवीड हेल्थ सेंटर व 1 डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल कार्यरत आहेत.
जिल्हा प्रशासन कोरोनाचा सामना करण्यासाठी सदैव कार्यरत आहे. प्रशासनाच्या या कोरोना विरोधातील लढाईमध्ये सर्व नागरिकांनी सक्रिय सहभागी होणे ही आजची गरज आहे. कारण ही लढाई तुम्हा झ्र आम्हा सर्वांनी फक्त एकत्र लढायची नाही तर जिंकायची सुद्धा आहे. जसे एखादे युद्ध जिंकण्यासाठी नियोजनबद्ध पणे योजना आखली जाते तसेच या लढाईमध्ये सुद्धा आहे. केंद्र, राज्य शासनाने याविषयीचे नियोजन केले आहे. ते सर्वांसमोर मांडले ही आहे. कशा पद्धतीने लढायचे हे सर्वांना माहिती आहे. आता हा लढाईचा कृती अराखडा म्हणजेच ॲक्शन प्लान तुम्ही झ्र आम्ही सर्वांनी मिळून राबवायचा आहे.
कृती आराखडा अर्थात ॲक्शन प्लान राबवायचा म्हणजे काय करायचे, तर त्यासाठी सर्व प्रथम तुम्ही घरात रहायचे आहे. अत्यावश्यक गरज नसल्यास घरा बाहेर पडायचे नाही, गर्दीच्या ठिकाणी जायचे नाही , मुळात गर्दी करायचीच नाही. तसेच भारतीय संस्कृतीमध्ये हात मिळविणी न करता रामराम करण्याची पध्दत आहे. सैनिक युध्दाला निघाला की तो आपले तोंड, नाक कपड्याने झाकुन जात असे, बाहेरुन आलेला माणूस थेट घरात न जाता हातपाय अथवा अंघोळ करुनच घरात प्रवेश करीत असे आजच्या स्थितीला हेच करणे अत्यावश्यक बनले आहे. यासाठी प्रत्येकांनी, सामाजिक अंतर पाळणे, तोंडाला मास्क लावणे, हातांची स्वच्छता ठेवणे त्यासाठी सॅनिटायझर, साबण याचा वापर करायला हवा.
प्रत्येकाने स्वत:ची वैद्यकीय तपासणी करुन घेणे त्याच बरोबर शासनाच्या लॉकडाऊनचे तंतोतंत पालन करणे आता अनिवार्य झाले आहे. केवळ प्रशासनाने आपल्यावर निर्बध घातले आहेत. ही भावना न बाळगता शासनाने आपल्यासाठी केलेल्या उपाय योजनांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद देणे हे आपले कर्त्यव्य आहे. अशा पद्धतीने या लढाईमध्ये आपण सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावयाचा आहे. तरच आपण या महाभयंकर कोरोना (कोविड-19) विषाणूला थोपवून धरुन त्याचा नायनाट करु शकतो. त्यामुळे जनतेची साथ बहुमोल ठरणार आहे. लक्षात ठेवा हे जगाच्या इतिहासातील असे पहिले युद्ध आहे जे आपल्याला घरात राहून जिंकायचे आहे.
-रणजित पवार
माहिती सहायक,
जिल्हा माहिती कार्यालय, सिंधुदुर्ग