होलिकोत्सवात रंगाचा बेरंग नको ..... !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2019 03:14 PM2019-03-21T15:14:06+5:302019-03-21T15:16:28+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी किंवा होलीकोत्सवाला फार महत्व आहे. फाल्गुन पौर्णिमा या दिवशी होलिकोत्सवाला प्रारंभ होतो.या कालावधीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मुंबई तसेच इतर भागातुन अनेक व्यक्ति आपल्या मूळ गावी दाखल होत असतात. मात्र, अलीकडे होलिकोत्सवात काही गैरप्रकार शिरले असून त्याला आळा घालणे आवश्यक आहे.
सुधीर राणे
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी किंवा होलीकोत्सवाला फार महत्व आहे. फाल्गुन पौर्णिमा या दिवशी होलिकोत्सवाला प्रारंभ होतो.या कालावधीत सर्वत्र उत्साहाचे वातावरण असते. मुंबई तसेच इतर भागातुन अनेक व्यक्ति आपल्या मूळ गावी दाखल होत असतात. मात्र, अलीकडे होलिकोत्सवात काही गैरप्रकार शिरले असून त्याला आळा घालणे आवश्यक आहे.
रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी सजग नागरीकानी दक्ष राहणे गरजेचे बनले आहे. दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सतप्रवृत्तीचा मार्ग दाखवणारा होळी हा उत्सव आहे. काही ठिकाणी त्याला शिमगा असेही म्हटले जाते.
वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धि करणे, हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे. मात्र, दुर्दैवाने सध्या या उत्सवात अनेक अपप्रकारांचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे या उत्सवातून आनंदा पेक्षा दुःखच जास्त मिळत असते. त्यामुळे 'भिक नको कुत्रा आवर' या म्हणी प्रमाणे हा सण नको, मात्र त्यातून होणारे त्रास आवर अशी म्हणायची वेळ काही प्रसंगांमुळे अनेकदा येत असते.
होळी उत्सव विविध ठिकाणी फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यंत साजरा केला जातो. विविध ठिकाणच्या प्रथा परंपरांमध्ये बदल असलेला आपल्याला दिसून येतो. उत्सव साजरा करण्याच्या विविध पद्धती ही विविध ठिकाणी पहायला मिळतात.
कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस हा उत्सव साजरा केला जातो.तर काही ठिकाणी पंधरा दिवसांपर्यंत हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात रंग पंचमीला जास्त महत्व असते. धूलिवंदन अथवा धुळवड असे ही रंगपंचमीच्या दिवसाला म्हटले जाते. देवळा समोर किंवा सोयीच्या ठिकाणी पौर्णिमेच्या सायंकाळी होळी पेटवायची असते. तशी पद्धत सर्वत्र आढळते. होळीचा मांड असे ही त्याला म्हटले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंब्याच्या अथवा अन्य झाडांचा होळीसाठी उपयोग केला जातो.बहुधा ग्रामदेवतेसमोर होळी उभी केली जाते.काही ठिकाणी होळी पेटविल्यानंतर त्यातून निर्माण होणारी राख,शेण, चिखल यासारखे पदार्थ अंगाला माखुन नृत्य, गायन केले जाते. होळी साठी लोकांची लाकडे तसेच इतर साहित्य चोरणे असे प्रकार सऱ्हास केले जातात. लाकडे चोरताना तर ती नेमकी कसली आहेत, त्यांचा दर्जा याचा विचार केला जात नाही.
अनेकवेळा तर सागवानासारख्या चांगल्या प्रतीच्या लाकड़ाना आगीच्या भक्ष्यस्थानी घातले जाते. या कृतितुन दुसऱ्याना केवळ त्रास देण्याचा प्रयत्न केला जात असतो. तर काही गावात मानपानावरुन होळी कोणी साजरी करायची यावरून वाद उद्भवतात.
तहसील कार्यालयापर्यंत हे वाद आल्यावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून दोन्ही गटाना होळी साजरी करण्यास बंदी घातली जाते. जमाव बंदीचे कलम ही लावले जाते. त्यामुळे काही लोकांच्या आडमुठेपणामुळे गावातील इतर लोकांना आनंदापासून मुकावे लागते.
या कालावधीत अनेक तरुणांकडून तर मद्यपान करून दुसऱ्याना अर्वाच्य शिव्या दिल्या जातात. पत्र्याचे फुटके डबे वाजवून कर्ण कर्कश आवाजात जोरदार आरडाओरड केली जाते. रात्रभर असे प्रकार सुरु असतात. त्यामुळे होलीकोत्सवाचा मूळ हेतु बाजूला पडून त्याला विकृत स्वरूप येत आहे.
होळीचे निमित्त करून 'शबय' च्या नावाखाली रस्त्याने ये जा करणारी वाहने रोखून पैसे उकळणे. असे प्रकार सऱ्हास सुरु असल्याचे अलीकडे आपल्याला दिसून येते. अनेकवेळा पैशासाठी वाहने अडविताना अपघाताच्या घटना घड़तात. काहीजणाना आपल्या प्राणाना मुकावे लागते. काहीजण कायमचे जायबंदी होतात. तरीही वर्षातून एक दिवस होळीची मज्जा असे म्हणून अनेकजण या प्रकारांकडे डोळे झाक करतात. त्यामुळे गैरप्रकार करणाऱ्यांचे आणखिनच फावत असते. त्यांना त्यामुळे जास्त बळ मिळते. आणखिन हुरुप येतो. आणि अनकवेळा दुर्दैवी घटना घड़तात. होलीकोत्सवातील रंगपंचमीच्या दिवसाला फार महत्व असते. त्यासाठी फार पूर्वी पासून तयारी केली जाते. विविध रंग बनविले जातात.
या काळात पाण्याचाही अपव्यय मोठ्या प्रमाणात होतो. कृत्रिम रंगामुळे शरीराला अपाय होण्याची शक्यता असते. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. रंगपंचमी खेळताना अनेकवेळा उत्साहाच्या भरात केलेल्या कृत्यांमुळे आनंदाच्या क्षणाना गालबोट लागते. पोलिस स्थानका पर्यंत हे वाद जातात. हे सर्व थांबविणे गरजेचे आहे.
होळीच्या या आनंदोत्सवाला गालबोट लागू नये यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील राहिले पाहिजे. तसेच या सणातील रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी सुजान नागरिकांनी कायमच सतर्क असणे ही तितकेच गरजेचे आहे.तरच हा सण साजरा करण्यामागचा उद्देश खऱ्या अर्थाने सफल होईल.