जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य द्वार बंद, २५ वर्षांतील पहिलीच घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2020 04:58 PM2020-06-24T16:58:15+5:302020-06-24T17:01:23+5:30
सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करताना अचानक जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दरवाजासह सर्व दरवाजे बंद केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर एकच धावपळ उडाली. जिल्हा मुख्यालयाच्या २५ वर्षांच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य द्वार बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ओरोस : सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करताना अचानक जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य दरवाजासह सर्व दरवाजे बंद केल्याने जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची सायंकाळी कार्यालये सुटल्यानंतर एकच धावपळ उडाली. जिल्हा मुख्यालयाच्या २५ वर्षांच्या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य द्वार बंद करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
यासर्व प्रकारात जिल्हाधिकारी कार्यालयाचा कारभार मागच्या दराने सुरु आहे. मात्र, मागच्या दरवाजाने प्रवेश असल्याने येथे येणाऱ्या कर्मचारी आणि लोकांची गैरसोय निर्माण झाली. तसेच कोरोनामुक्तीकडे जिल्हा असताना ही उपाययोजना म्हणजे प्रशासनाला उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे बोलले जात आहे.
सिंधुदुर्गनगरी येथील मुख्य प्रशासकीय इमारत म्हणजेच जिल्हाधिकारी कार्यालय. जिल्हाधिकारी कार्यालयासह या ठिकाणी येथे अनेक मुख्य कार्यालये असल्याने या ठिकाणी अनेक कर्मचारी नागरिक कामानिमित्त येत असतात. या इमारतीमध्ये प्रवेश करण्यासाठी पाच ते सहा दरवाजे आहेत.
या इमारतीचे मुख्य प्रवेशद्वार हे ध्वजस्तंभासमोर आहे. मात्र, आज अचानक निवासी उपजिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन सिंधुदुर्गच्या मुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी साठे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे मागील दार वगळून अन्य सर्व दरवाजे बंद करण्याचे आदेश काढले आहेत. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील प्रवेश द्वारातूनच प्रत्येकाला प्रवेश देण्यात यावा अशा सूचना केल्या आहेत.
त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने सायंकाळी मुख्य प्रवेश द्वारासह या इमारतीचे अन्य द्वार लोखंडी साखळ्या, दरवाजाना लाकडी पट्टी मारून अचानक बंद करण्यात आले. यामुळे सायंकाळी कार्यालये सुटल्यावर घरी जाणाºया कर्मचाºयांनी धावपळ उडाली. तसेच या कर्मचाऱ्यांना बाहेर जाण्यासाठी मार्ग शोधवा लागला.
जिल्हा प्रशासनाचे वरातीमागून घोडे
सिंधुदुर्ग जिल्हा कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत असतानाच आज अचानक जिल्हा प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासह अन्य प्रवेशद्वारे बंद करीत एकच प्रवेशद्वार खुले ठेवले. यात कर्मचारी व नागरिकांना त्रास सहन करवा लागत आहे. जिल्हा कोरोनामुक्तीकडे असताना हा उपाय म्हणजे वरातीमागून घोडे असल्याची प्रतिक्रिया कर्मचाऱ्यांतून उमटत आहे.