Navratri : मी दुर्गा - डॉ. सई लिंगवत, कर्तव्यदक्ष वैद्यकीय अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 07:44 PM2020-10-22T19:44:27+5:302020-10-22T19:49:57+5:30
CoronaVirus, mi durga, sindhudurg, navratri2020 कोरोना काळात समाजहित डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी केली. तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्यास वेळप्रसंगी आक्रमक होत संबंधितांवर कारवाईही त्यांनी केली. अशा या वेंगुर्लेच्या कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी सई लिंगवत या खऱ्या अर्थाने दुर्गाच आहेत.
सावळाराम भराडकर
कोरोना काळात समाजहित डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून त्याची अंमलबजावणी केली. तसेच नियमांचे उल्लंघन होत असल्यास वेळप्रसंगी आक्रमक होत संबंधितांवर कारवाईही त्यांनी केली. अशा या वेंगुर्लेच्या कर्तव्यदक्ष आरोग्य अधिकारी सई लिंगवत या खऱ्या अर्थाने दुर्गाच आहेत.
डॉ. सई लिंगवत यांचे वडील निवृत्त वनअधिकारी व महाराष्ट्र राज्यातील एकमेव असलेल्या वनअधिकारी प्रशिक्षण महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य असल्याने डॉ. सई यांना कुटुंबातून शैक्षणिक, सामाजिक सेवेचा वारसा लाभला. त्यांचा कल समाजसेवेकडे होता. त्यांनी वैद्यकीय क्षेत्राची निवड करून गोंदिया जिल्ह्यातील एम. एस. आयुर्वेदिक महाविद्यालय व संशोधन केंद्रातून पदवी अभ्यासक्रम तर पुणे येथील सिंबायोसिस इन्स्टिट्यूटमधून अत्यावश्यक सेवा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला.
प्राथमिक आरोग्य केंद्र, तुळस येथून २०१४ साली वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी आरोग्य सेवेला सुरुवात केली. कोरोना काळात तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत असलेल्या उभादांडा आरोग्यवर्धिनी केंद्रात त्यांची आरोग्य अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. वेंगुर्लेत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम हाती घेतली. प्रथम आशा व आरोग्यसेविकांना विश्वासात घेऊन ग्रामस्तरावर प्रत्येक कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची परिपूर्ण माहिती मिळविली.
कुटुंबात एकुलती एक मुलगी आणि तीही स्पेशल चाईल्ड असूनही कोविड काळातील आपल्या शासकीय सेवेत त्यांनी दिरंगाई केली नाही. कुटुंब व कर्तव्यदक्ष अधिकारी अशी दुहेरी जबाबदारी पेलताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी सामंत व जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष असलेले पती डॉ. संजीव लिंगवत यांचे महत्त्वाचे सहकार्य त्यांना मिळाले. डॉ. लिंगवत यांनी खारेपाटण, पत्रादेवी, आंबोली, रेडी या तपासणी नाक्यावर वैद्यकीय पथकाचे नेतृत्व केले आहे.
शासकीय सेवेत कार्यरत असताना आयुर्वेदिक औषध प्रणालीच्या माध्यमातून प्रभावी वंध्यत्व चिकित्सा करीत संतानप्राप्तीचे योग जुळवून आणले. पंचकर्म चिकित्सेच्या माध्यमातून वातव्याधी, त्वचारोग अशा समस्यांतून रुग्णांना मुक्ती मिळवून दिली. वैद्यकीय सेवा करताना कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषू कदाचन या सुभाषिताप्रमाणे फळाची अपेक्षा न ठेवता काम केल्यास कामाचा शारीरिक व मानसिक ताण सहज सोसू शकतो.
- डॉ. सई लिंगवत
वैद्यकीय अधिकारी
(९४०३५६०८०५)