Navratri :तृप्ती पुजारे- मी दुर्गा : ती लढली... जिंकलीही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 05:52 PM2020-10-19T17:52:29+5:302020-10-19T17:53:29+5:30
coronavirus, navratri, sindhudurg, hospital कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांना सेवा दिली अशा शासकीय वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारक, अधिपरिचारिका व कर्मचाऱ्यांना सलामच आहे.
गिरीश परब
कोरोना महामारीच्या काळात ज्यांनी आपल्या जीवाची बाजी लावून रुग्णांना सेवा दिली अशा शासकीय वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारक, अधिपरिचारिका व कर्मचाऱ्यांना सलामच आहे.
सेवा देताना बारा बारा तास पीपीई किट घालून स्वतःला कोरोना होणार नाही याची काळजी घेतली खरी, परंतु यातील बऱ्याच योद्ध्यांना कोरोनाची लागण झाली आणि या वैश्विक महामारीतून ते सुखरूपपणे बाहेरदेखील पडले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्या योद्ध्याला कोरोना होऊन अवघ्या १५ दिवसांत त्यावर मात देत पुन्हा कोरोना कक्षातच सेवा देण्यासाठी उतरलेल्या तृप्ती संतोष पुजारे या अधिपरिचारिका खऱ्या अर्थाने दुर्गा ठरल्या आहेत.
तृप्ती यांना महाविद्यालयात असल्यापासूनच आरोग्य सेवेत जाऊन रुग्णांची सेवा करण्याची इच्छा होती. त्या दृष्टीने दिवस-रात्र अभ्यास करून त्या चांगल्या गुणांनी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झाल्या. लगेचच त्यांनी नर्सिंग महाविद्यालयात प्रवेश घेतला. नर्सिंगच्या अंतिम परीक्षेत चांगले गुण मिळवून तृप्ती पुजारे राज्यात दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. मुलाखतीत पात्र ठरून लागलीच जिल्हा रुग्णालय ओरोस येथे सेवा देण्यास सुरुवात केली. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानअंतर्गत रुग्णालयात अतिशय प्रामाणिक काम करीत रुग्णांची सेवा केली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मार्चमध्ये हळूहळू कोरोनाचा फैलाव होण्यास सुरुवात झाली. सुरुवातीला कोरोना रुग्णसंख्या कमी होती. त्यानंतर मात्र ओरोस येथील कोविड-१९ सेंटरमधील खाटा रुग्णांनी भरू लागल्या. या कक्षात सलग १२ तास व वेळप्रसंगी १५ तास अंगावर पीपीई किट घालून तृप्ती यांनी रुग्णांना सेवा दिली. रुग्णांना वेळेवर औषध देणे, सलाईन लावणे अगदी आपल्या घरच्या माणसाप्रमाणे रुग्णांची शुश्रूषा केली.
दरम्यान, ११ मे रोजी तृप्ती पुजारे यांना कोरोनाची लागण झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाले. आपण कोरोना बाधित असल्याचे त्यांना समजताच त्यांनी स्वतःला सावरले व मनाशी पक्का निर्धार केला की आपण या महामारीतून पूर्ण बरे व्हायचे.
गोळ्यांचा डोस व पोषक आहार घेऊन त्यांनी १५ दिवस जिल्हा रुग्णालयात कोविड-१९ सेंटरमध्ये उपचार घेऊन कोरोनावर यशस्वीपणे मात केली. ९ दिवस अलगीकरणात राहिल्या आणि १० व्या दिवशी जिल्हा रुग्णालयात कोविड कक्षात पुन्हा रुग्णांच्या सेवेसाठी रुजू झाल्या. त्यांच्या या धैर्याबद्दल प्रशंसा करावी तेवढी थोडीच आहे.
जिल्हा रुग्णालयातील एनआरएचएम अंतर्गत करण्यात आलेला करार संपल्याने अधिपरिचारिका तृप्ती पुजारे मुंबई येथील शासकीय रुग्णायलात कोविड सेंटरमध्ये रुग्णांना सेवा देत आहेत. मालवण तालुक्यातील हेदूळ येथील कन्या कोविड-१९ काळात बजावत असलेल्या आरोग्य सेवेबद्दल तृप्ती यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शैक्षणिक पात्रतेनुसार विविध क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध होती. परंतु लहानपणापासून च घरातील मंडळींनी आरोग्य क्षेत्रात काम करण्याचा सल्ला दिला होता. त्यादृष्टीने प्रयत्न केले व आज अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहे. आई-वडिलांची इच्छा पूर्ण झाली आहे. कोरोनाच्या कठीण काळात रुग्णांची सेवा करीत असल्याचे आत्मिक समाधान मिळत आहे.
- तृप्ती पुजारे
अधिपरिचारिका
(९४२१९३७३५९)