Navratri : मी दुर्गा : डॉ. विशाखा पाटील, रुग्ण सेवेचा धर्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2020 06:25 PM2020-10-20T18:25:22+5:302020-10-20T18:26:20+5:30
coronavirus, navratri, shindudurg, hospital रुग्ण सेवा हाच खरा स्वधर्म व त्यातच खरा आनंद असे मानून गेली अनेक वर्षे रुग्णांना विशेषत: महिला रुग्णांना कुडाळ येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विशाखा पाटील दिवस-रात्र अविरतपणे सेवा देत आहेत. त्यांनी कोरोना काळातही अनेक संकटांवर मात करीत कोरोना योद्धा बनून रुग्णसेवा दिली. हे त्यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. कुडाळ येथील डॉ. विशाखा पाटील व डॉ. श्रीपाद पाटील हे पती-पत्नी गेली १७ वर्षे जिल्ह्यातील रुग्णांना सेवा देत आहेत.
रजनीकांत कदम
रुग्ण सेवा हाच खरा स्वधर्म व त्यातच खरा आनंद असे मानून गेली अनेक वर्षे रुग्णांना विशेषत: महिला रुग्णांना कुडाळ येथील स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. विशाखा पाटील दिवस-रात्र अविरतपणे सेवा देत आहेत. त्यांनी कोरोना काळातही अनेक संकटांवर मात करीत कोरोना योद्धा बनून रुग्णसेवा दिली. हे त्यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. कुडाळ येथील डॉ. विशाखा पाटील व डॉ. श्रीपाद पाटील हे पती-पत्नी गेली १७ वर्षे जिल्ह्यातील रुग्णांना सेवा देत आहेत.
जिल्हा रुग्णालय येथे २००३ मध्ये तर कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे २००४ ते २००८ या कालावधीत स्त्री रोग तज्ज्ञ या वैद्यकीय अधिकारीपदी डॉ. विशाखा पाटील कार्यरत होत्या. दिवस असो वा रात्र त्या रुग्णांना सेवा देण्यासाठी रुग्णालयात हजर असत. तसेच महिला समुपदेशन, किशोरवयीन मुला-मुलींना मार्गदर्शन, जनजागृती अशा अनेक उपक्रमातही त्या नेहमीच सहभागी झाल्या.
डॉ. विशाखा पाटील यांनी कुडाळ येथे श्रीराम मॅटर्निटी रुग्णालय सुरू केले आहे. तर डॉ. श्रीपाद पाटील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीपदी कार्यरत आहेत. कोरोना कालावधीत डॉ. श्रीपाद पाटील यांची नियुक्ती जिल्हा रुग्णालय कोरोना प्रभारी अधिकारी पदी करण्यात आली. त्यामुळे कोरोनाच्या प्रादुर्भावापासून कुडाळ येथील रुग्णालयातील रुग्ण, त्यांची मुले, सासू-सासरे व घरातील वडीलधारी मंडळी या सर्वांची तसेच डॉ. पाटील यांची विशेष काळजी घेण्याची दुहेरी जबाबदारी डॉ. विशाखा पाटील यांच्यावर आली. या सर्वांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी त्यांनी समर्थपणे ही जबाबदारी पेलली.
अशातच डॉ. श्रीपाद पाटील व विशाखा पाटील हे दोघेही कोरोना बाधित झाल्यानंतर त्यांना शारीरिक व मानसिक त्रास काही काळ भोगावा लागला. मात्र, कोरोनावर मात करीत ते पुन्हा एकदा आनंदाने रुग्णसेवेस हजर झाले. आज जगात कोरोनाचे थैमान सुरू असताना प्रत्येक जण त्यापासून बचाव व्हावा याकरिता आवश्यक ती खबरदारी घेत आहे. तर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका तसेच इतर कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा बनून सदैव कार्यरत रहावे लागत आहे. अशातच डॉ. विशाखा पाटील यांनीही महिला रुग्णांना अविरतपणे वैद्यकीय सेवा दिली हे त्यांचे कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे.
कोरोना असला तरी घाबरून न जाता आम्ही आमच्या स्वधर्माचे पालन केले. वेगळे असे काही केले नाही. रुग्णांना चांगली सेवा मिळाली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न असतो. रुग्णसेवा हाच खरा धर्म. त्यातच खरा आनंद असतो. त्यामुळे आलेल्या सर्व संकटांना तोंड देत आम्ही सतत कार्यरत राहिलो.
- डॉ. विशाखा पाटील,
स्त्री रोग तज्ज्ञ
(७७९८८८४६९६)