अ‍ॅनिमेशनची आभासी दुनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 12:04 AM2017-10-29T00:04:38+5:302017-10-29T00:04:58+5:30

घरच्याघरी बसून अ‍ॅनिमेशनचे काम करण्याचा नवा ट्रेण्ड आला आहे. हे काम यू ट्युब, फेसबुकवर पोस्ट केले आणि त्या कामाची भरपूर प्रसिद्धी झाली; तर तुम्हाला घरच्याघरी काम मिळू शकते आणि एक इन्कम सोर्स उपलब्ध होऊ शकतो.

 Animation's Virtual World | अ‍ॅनिमेशनची आभासी दुनिया

अ‍ॅनिमेशनची आभासी दुनिया

- वैभव घरत, बदलापूर
घरच्याघरी बसून अ‍ॅनिमेशनचे काम करण्याचा नवा ट्रेण्ड आला आहे. हे काम यू ट्युब, फेसबुकवर पोस्ट केले आणि त्या कामाची भरपूर प्रसिद्धी झाली; तर तुम्हाला घरच्याघरी काम मिळू शकते आणि एक इन्कम सोर्स उपलब्ध होऊ शकतो. जागा घेऊन क्लासेस घेण्यापेक्षा आता तुम्ही आॅनलाइन शिकवू शकता किंवा शिकू शकता.
अ‍ॅनिमेशनमध्ये टूडी, थ्रीडी हे दोन मुख्य प्रकार आहेत. यातही लायटिंग, कॅरॅक्टर मॉडेल, स्ट्रक्चरिंग, सेट डिझायनिंग, ले-आउट डिझायनिंग हे प्रकार आहेत. ज्या प्रकारात तुम्हाला आवड आहे किंवा निर्माण झाली आहे, त्यात करिअर करता येऊ शकते.
चित्रपट म्हणून अ‍ॅनिमेशनचा विचार करायला गेलो, तर त्या क्षेत्रात ‘रिअल लाइव्ह अ‍ॅक्शन अ‍ॅनिमेशन’ जास्त चालते. यात खºया कॅरेक्टरबरोबर (कलाकारासोबत) अ‍ॅनिमेटेड कॅरॅक्टर मॅच केले जाते. इंग्लिश फिल्ममध्ये थ्रीडी अ‍ॅनिमेशन उच्च दर्जाचे वापरले जाते. उदाहरणार्थ, हॅरी पॉटर या चित्रपटात हे अ‍ॅनिमेशन वापरले गेले आहे. आपल्याकडे इतक्या उच्च दर्जाची टेक्नॉलॉजी सर्व कंपन्यांकडे अद्याप आलेली नाही.
अ‍ॅनिमेशन हे क्षेत्र इलेक्ट्रॉनिक मीडियाशी संबंधित आहे. त्यामुळे या क्षेत्रात येणाºयांना सर्व टेक्नॉलॉजीचे ज्ञान असेल; तर त्याचा फायदा मिळू शकतो. आॅगमेंट रिअ‍ॅलिटी (एआर) व व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी (व्हीआर) या टेक्नॉलॉजीचा सध्या ट्रेण्ड आहे. भारतात ही टेक्नॉलॉजी काही कंपन्यांनी सुरू केली असली, तरी ती इनोव्हेशन लेव्हलला- प्रयोग करण्याच्या पातळीवर आहे. कार्टुन फिल्ममध्ये ही टेक्नॉलॉजी आलेली नाही. मुळात या टेक्नॉलॉजीबद्दल लोकांना फार माहिती नाही. अ‍ॅनिमेशन क्षेत्रात जलद गतीने बदल होत असतो. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाºयांनी खूप मेहनत करण्याची तयारी ठेवावी. यातील अनेक प्रोजेक्ट उशिरापर्यंत चालतात, सॉफ्टवेअर शिकण्यासही बराच कालावधी जातो. त्यामुळे तुमच्यात संयम असणे आवश्यक आहे.
आपल्याकडच्या मालिकांमध्ये अ‍ॅनिमेशनचा फार शिरकाव झालेला नाही. पौराणिक कथांवर आधारित मालिकांमध्ये चमत्कार, युद्ध अशा प्रसंगांत अ‍ॅनिमेशन सर्रासपणे वापरले जाते. पण, ते मर्यादित स्वरूपात.
लहान मुलांच्या आवडीचा भाग म्हणून पाहिल्या जाणाºया कार्टुनमधील अ‍ॅनिमेशन फार बदलले नसले, तरी त्यातील कॅरेक्टर मात्र बदलली आहेत. त्यांचे अ‍ॅपिअरन्सदेखील बदलले आहे. आताच्या मुलांच्या हातात जसे गॅझेट असते तसेच कार्टुन्स कॅरॅक्टरही गॅझेट्स वापरतात, असे दाखवले जाते. त्यातही भरपूर प्रयोग होऊ लागले आहेत. या मालिकांचेही भारतीयीकरण होऊ लागले आहे. मुलांमध्ये वाढणारी कार्टुनची क्रेझ पाहता हे क्षेत्र दिवसेंदिवस विस्तारत जाणार, हे नक्की.
‘बाहुबली’सारख्या चित्रपटात रिअल लाइव्ह अ‍ॅक्शन अ‍ॅनिमेशनचे तंत्र वापरले गेले आहे. यात टूडी आणि थ्रीडी हे दोन्ही प्रकार वापरण्यात आले आहेत. सुरुवातीला कॅरॅक्टरला (कलाकारांना) घेऊन शूटिंग केले जाते. अ‍ॅक्शन, फायटिंगसारखे प्रसंग शूट केले जातात. पण, ते प्रसंग शूट करताना पाठीमागे एकाच रंगाची स्क्रीन वापरली जाते. शूटिंग पूर्ण झाल्यावर सॉफ्टवेअरमध्ये ही स्क्रीन काढून त्यात थ्रीडीचा वापर करून मागच्या बाजूला आपल्याला हव्या प्रसंगाला साजेशी दृश्ये टाकून त्यांची सरमिसळ केली जाते. जो प्रसंग हवा आहे, तो सॉफ्टवेअरमध्ये कम्पोझ केला जातो. चित्रपटात युद्ध, लढाईमध्ये दाखवलेल्या प्रसंगांतील सर्वच कॅरेक्टर्स खरे असतात, असे नाही. ते कॅरेक्टर अनेकदा थ्रीडीमध्ये काल्पनिकरीत्या बनवले जातात. मोठमोठ्या पौराणिक, ऐतिहासिक चित्रपटांत दाखवण्यात येणाºया युद्धांत हजारोंचे-लाखोंचे मनुष्यबळ दाखवायचे असेल; तर एक अ‍ॅनिमेटर इतके मनुष्यबळ थ्रीडीमध्ये सहजपणे दाखवू शकतो.
बदलत्या तंत्रानुसार मोबाइलवरही अ‍ॅनिमेशन पाहता येते. काही मोबाइलच्या कॅमेºयांमध्ये एआर आणि व्हीआर ही टेक्नॉलॉजी आली आहे. त्यामुळे हे तंत्र मोठ्या पडद्यावरून हातात आले आहे. पुढच्या १० वर्षांत अ‍ॅनिमेशनच्या क्षेत्रात प्रचंड प्रमाणात बदल घडू शकतात. स्क्रीन ही संकल्पनाच बदलू शकते. मोबाइल, टीव्ही, कॉम्प्युटर, प्रोजेक्टर ही सध्या असलेली स्क्रीन बदललेली असेल. एक छोटेसे गॅझेट हातात असेल, ते जिथे लावाल तिथे तुम्ही स्क्रीन उभी करू शकाल आणि व्हर्च्युअली समोरच्या व्यक्तीशी आपण कनेक्ट होऊ शकू.
त्यामुळे हे क्षेत्र दिवसेंदिवस आव्हानात्मक बनते आहे. त्यात झपाट्याने बदल घडताहेत. त्याचबरोबर या क्षेत्रात तुम्हाला प्रयोग करायला भरपूर संधी आहेत. तुम्ही जितका कल्पनाविस्तार कराल, तेवढे हे क्षेत्र अधिक प्रगल्भ, रंजक होत जाईल. हेच त्याचे वैशिष्ट्य आहे.

क्रिएटिव्हिटीची गरज : अ‍ॅनिमेशनमध्ये माझ्या करिअरची सुरुवात १५ वर्षांपूर्वी झाली. तेव्हा अ‍ॅनिमेशन लोकांना फारसे माहीत नव्हते. त्या वेळी कार्टुन्स किंवा मालिकांच्या वाहिन्याही मोठ्या संख्येने नव्हत्या. चित्रपटांत अ‍ॅनिमेशन होत होते. पण, तेही मोजक्या प्रमाणात. थ्रीडी चित्रपटांतच प्रामुख्याने अ‍ॅनिमेशन पाहायला मिळत असे. मला स्केचिंगची आवड होती. त्यामुळे नोकरी करत असतानाच मी शिकत गेलो. जसे प्रोजेक्ट हाती आले, तसतसे यातून मला अनुभव मिळत गेला.

अ‍ॅनिमेशनचे तंत्र आपल्याकडे झपाट्याने विस्तारते आहे. मुलांच्या कार्टुन मालिका असोत की, थ्रीडी चित्रपट असोत... पौराणिक मालिका, चित्रपटांतील चमत्कार असोत, ऐतिहासिक चित्रपटांतील भव्य युद्धप्रसंग असोत किंवा बाहुबलीसारख्या चित्रपटातील अद््भुत दृश्ये असोत... एखाद्या दे मार सिनेमातील हाणामारीचा थरार असो... हे सारे साध्य होते ते अ‍ॅनिमेशन तंत्रामुळे. कसे आहे हे तंत्र? नुकत्याच पार पडलेल्या अ‍ॅनिमेशन दिवसानिमित्त त्यातील प्रयोग, आव्हाने आणि त्यातील संधी यावर दृष्टिक्षेप...


या क्षेत्रात येणाºया मुलांमध्ये लहानपणापासून क्रिएटिव्हिटी असली पाहिजे. हे शिकवून होत नाही. लहानपणीच चित्रकला, स्केचिंगची आवड असेल, तर या क्षेत्रात कोणीही येऊ शकते. त्या वेळी कॉम्प्युटर अ‍ॅनिमेशन फार मोठ्या प्रमाणात नव्हते. क्लासिकल अ‍ॅनिमेशनचा बोलबाला होता. आता या क्षेत्रात, तंत्रात भरपूर सुधारणा झाल्या आहेत. तंत्रातही बदल झाले आहेत. त्यामुळे तुमच्यात जर क्रिएटिव्हिटी असेल, तर तुमच्यासाठी हे क्षेत्र खूप चांगले आहे.

(लेखक डिजिटल कन्सल्टंट आहेत.)
- शब्दांकन : प्रज्ञा म्हात्रे

Web Title:  Animation's Virtual World

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.