पुरुषांच्या टेनिसमध्ये नवे विजेते कधी दिसतील?; फेडरर, नदाल, मरे, जोकोविच याच्या साम्राज्याला आव्हान कोण देईल?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 03:35 PM2017-09-11T15:35:56+5:302017-09-11T15:37:16+5:30
आंतरराष्ट्रीय टेनिस जगताला यंदासुध्दा ग्रँड स्लॅम विजेत्याच्या रुपात नवा चेहरा मिळालेला नाही.
- ललित झांबरे
आंतरराष्ट्रीय टेनिस जगताला यंदासुध्दा ग्रँड स्लॅम विजेत्याच्या रुपात नवा चेहरा मिळालेला नाही. यंदाची चार विजेतेपदं रॉजर फेडरर आणि राफेल नदाल या जुन्याच विजेत्यांनी विभागून घेतली. यंदा फेडररने ऑस्ट्रेलियन ओपन व विम्बल्डन जिंकले तर नदालने फ्रेंच व युएस ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केला. 2014 च्या युएस ओपनमध्ये विजेता ठरलेला क्रोएशियन मारिन सिलिच हा गेल्या तीन वर्षातला एकमेव अनपेक्षित ग्रँड स्लॅम विजेता म्हणता येईल. नाही तर 2005 पासून ग्रँड स्लॅम विजेतेपदांवर रॉजर फेडरर, राफेल नदाल, नोव्हाक जोकोविचं, अँडी मरे आणि स्टॅन वावरिंका या टॉप फाईव्हचाच कब्जा राहिला आहे. तब्बल 10-12 वर्षे एखाद्या खेळावर मोजक्याच खेळाडूंचे वर्चस्व राहणे हे त्या खेळाच्या भविष्यासाठी फारशी चांगली गोष्ट नाही असे क्रीडातज्ज्ञ मानतात. नवे चेहरे विजेते म्हणून समोर येणार नसतील तर अधिकाधिक युवकांना त्या खेळाकडे तुम्ही कसे आकर्षित करणार हा प्रश्न आहे. पुरुषांच्या टेनिसचा नेमका हाच प्रश्न आहे.
याउलट महिलांच्या टेनिसमध्ये तरी यंदा स्लोएन स्टिफन्स व जस्टीन ओस्टापेंको या अगदी वेगळ्या खेळाडू विजेत्या बनून समोर आल्या. सेरेनाचे बाळंतपण हे त्याचे कारण का असेना पण त्यानिमित्ताने नव्या दमाच्या खेळाडूंना महिला टेनिसमध्ये यश चाखण्याची संधी मिळाली आहे. याशिवाय मॅडिसन किज, कोको वांदेवेघे, योहान कोंटा, रिबारिकोव्हा यांनी महिला टेनिसमधील स्पर्धा विस्तारत असल्याची चिन्हे दाखवली आहेत. पुरुषांचे टेनिस मात्र टॉप फाईव्हच्या पलीकडे विस्तारतांना दिसत नाही ही चिंतेची बाब आहे.
2005 ते 2014 अशी सलग नऊ वर्षे फेडरर, जोकोविच, मरे आणि नदाल यांच्याशिवाय एकही ग्रँड स्लॅम फायनल खेळली गेली नाही यावरुन पुरुषांचे टेनिस किती एककल्ली झालेय याची कल्पना येते. ही मालिका खंडीत झाली ती 2014 च्या युएस ओपन फायनलमध्ये ज्यात मारिन सिलीचने जपानी केई निशिकोरीला हरवून विजेतेपद पटकावले आणि 2008 च्या ऑस्ट्रेलियन ओपननंतर (जोकोविच) पुरुषांच्या टेनिसमध्ये कुणी नवा चेहरा ग्रँड स्लॅम विजेता म्हणून दिसला. दक्षिण आफ्रिकेच्या केव्हिन अँडरसनला युएस ओपनमध्ये ती संधी होती पण नदालपुढे त्याची काही एक मात्रा चालली नाही.
खरं तर अँडरसन नशिबवान म्हणायला हवा कारण अँडी मरे, जोकोवीच, वावरिंका, निशिकोरी आणि राओनिक यांनी युएस ओपनमधून माघार घेतली नसती तर तो अंतिम फेरीत पोहचला असता का? आणि दुसरी बाब म्हणजे अँडी मरेने ड्रॉ पडण्याआधी माघार घेतली असती तर अँडरसनला एवढा ओपन ड्रॉ मिळला असता का? कारण मरेने जर ड्रॉ जाहीर होण्याआधी माघार घेतली असती तर सिडिंग बदलले असते. फेडररला दुसरे सिडिंग (मानांकन) मिळाले असते आणि नदाल व फेडरर हे ड्रॉच्या टॉप आणि बॉटम हाफमध्ये गेल्याने केवळ अंतिम फेरीतच त्यांची लढत झाली असती आणि अँडरसन व फेडरर एकाच गटात आले असते अशा स्थितीत अँडरसन अंतिम फेरी गाठू शकला असता का?
एकप्रकारे मरेची ऐनवेळी माघार आणि आघाडीच्या पाच खेळाडूंची माघार ही पुरुषांच्या टेनिसच्या पथ्यावरच पडली असे म्हणता येईल कारण त्यामुळेच युएस ओपन 2017 चा बॉटम हाफ नवख्या खेळाडूंसाठी संधी देणार ठरला आणि तिकडून अँडरसन, पाब्लो बुस्टा, सॕम क्वेरी, दिएगो श्वार्त्झमन यांना आगेकूच करण्याची संधी मिळाली. निदान त्याच्याने तरी नवे चेहरे चमकले. नदाल, फेडरर अजून खेळताहेत. जोकोवीच, मरे, वावरिंका दुखापतीतून सावरतील. त्यामुळे पुन्हा 2018 मध्ये नव्या चेहऱ्यांना कितपत यशाची संधी मिळेल याची शंकाच आहे.
यंदाचे ग्रँड स्लॅम विजेते
स्पर्धा पुरुष महिला
ऑस्ट्रेलियन फेडरर सेरेना
फ्रेंच नदाल ओस्टापेंको
विम्बल्डन फेडरर मुगुरुझा
युएस ओपन नदाल स्टिफन्स