नगरसेवकांच्या वादात अर्थसंकल्पाचे गांभीर्य हरवले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 11:20 PM2019-01-27T23:20:30+5:302019-01-27T23:21:04+5:30
अंबरनाथ पालिकेत अर्थसंकल्पाच्यावेळी नगरसेवकांमधील वादावादी वाढल्याने अर्थसंकल्पाचे गांभीर्य हरवून गेले.
- पंकज पाटील, अंबरनाथ
अंबरनाथ पालिकेत अर्थसंकल्पाच्यावेळी नगरसेवकांमधील वादावादी वाढल्याने अर्थसंकल्पाचे गांभीर्य हरवून गेले. प्रशासनालाही नेमके तेच हवे होते. केवळ आपापल्या कामाकरिता तरतूद झाली किंवा कसे हे पाहण्यातच अनेक नगरसेवकांना रस होता.
शासकीय कामातील घोळ आणि सभागृहातील वादावादी ही अंबरनाथ पालिकेला काही नवीन नाही. प्रत्येक सर्वसाधारण सभेत दोन गटातील नगरसेवकांमध्ये वाद हा सर्वश्रूत आहे. मात्र वर्षभर वादावादी करणारे नगरसेवक किमान अर्थसंकल्पाच्या बैठकीला तरी गांभीर्याने वागतील, अशी अपेक्षा होती. मात्र या अर्थसंकल्पाच्या बैठकीलाही वादविवादाचे स्वरुप आले. वादावादी एवढी वाढली की मूळ अर्थसंकल्पावर मामूली चर्चा झाली.
वर्षभरातील विकास कामांना गती देण्याची जबाबदारी ही सभागृहातील प्रत्येक नगरसेवकाची असते. निर्णय प्रक्रियेत कोणतीही चूक होणार नाही, याची दक्षता घेण्याची जबाबदारी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांची आहे. मात्र अंबरनाथ पालिकेत व्यक्तिगत मतभेदावरुन सभागृहात होणारे वाद हे आता शहर विकासाच्या आड येत आहेत. वर्षभर सभागृहात भांडणारे नगरसेवक किमान अर्थसंकल्पीय बैठकीत प्रत्येक विषयानुसार चर्चा करतील हे अपेक्षित आहे. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी सूचना करणे, विकास कामांसाठी असलेला निधी कोठे जास्त वापरावा आणि कोठे कमी याचे नियोजन करणे गरजेचे आहे. एवढेच नव्हे तर सभागृहात जो अर्थसंकल्प सादर करण्यात आला त्यात अनेक बदल करण्याचे अधिकार सभागृहाला आहेत. मात्र अर्थसंकल्पावर अभ्यास करणारे नगरसेवक शिल्लक राहिलेले नाहीत. चार ते पाच नगरसेवक केवळ अर्थसंकल्पावर सविस्तर अभ्यास करुन आपले मत व्यक्त करतात. त्यांनी केलेल्या सूचनांचा आदर केला जातो. गेल्या दोन ते तीन अर्थसंकल्पात योग्य चर्चा झाली. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पावेळी व्यक्तीगत वादांवर जास्त चर्चा रंगली.
अर्थसंकल्पाच्या बैठकीची सुरुवातच वादाने झाली. अर्थसंकल्प सादर करतांनाच राजकीय हस्तक्षेप करुन परस्पर विषय कसा बदलला याच मुद्यावरुन वादावादी सुरू झाली. अर्थसंकल्पातील विकास कामांच्या यादीत छेडछाड झाल्याचे उघड झाले. त्या प्रकरणी निर्णय झाला. मात्र त्या सर्व प्रकारानंतर किमान अर्थसंकल्पावर सखोल चर्चा होणे गरजेचे होते. अर्थसंकल्प राहिला बाजूला सर्वांचे लक्ष अर्थसंकल्पातील विकास कामांच्या यादीत आपले काम समाविष्ट झाले की नाही हे पाहण्यात होते. ज्यांची कामे कमी होती ते नाराजी व्यक्त करीत होते तर ज्यांची कामे जास्त होती ते वादावादीची मजा घेत होते. काहीजण आपला विषय यादीत घेण्यासाठी हट्ट करीत होते. विकास कामांची यादी कितीही मोठी असली तरी त्या कामांसाठी निधीची तरतूद कशी आणि कोठे केली आहे याचे विश्लेषण कोणालाही करावेसे वाटले नाही. पालिकेचे उत्पन्न कसे वाढवता येईल यावर साधी चर्चा झाली नाही. प्रत्येकाच्या चुका शोधण्यातच अर्थसंकल्पाची बैठक पार पडली.
अर्थसंकल्पावर चर्चा कमीत कमी होईल हा पालिका प्रशासनाचा हेतू होता. कारण नगरसेवकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची सवय अधिकाºयांना राहिलेली नाही. त्यामुळे अधिकारी नगरसेवकांमधील वादावादीवर लक्ष केंद्रीत करुन होते. त्यामुळे अर्थसंकल्प आणि त्यातील आर्थिक तरतुदींकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. ३०४ कोटींचा महसूल कसा आणि कोठून येणार याची साधी कल्पना देण्यात आली नाही. तसेच आलेला निधी कोठे कोठे खर्च होणार याची माहिती घेतली गेली नाही. त्यामुळे गेल्या चार वर्षात नगरसेवकांना अर्थसंकल्पाचा अभ्यास करावा तरी कसा हाच मूळ प्रश्न पडला आहे. त्यातच वादावादीचे प्रकार घडून सभा उरकण्यात येणार असेल तर अभ्यास करावा तरी का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पालिका सभागृहातील वातावरण हे गेल्या काही वर्षात अत्यंत गढूळ झाले आहे. वादावादीचे प्रकार एवढे वाढले आहेत की एकमेकांच्या अंगावर धावून जाणे, मारामारी करणे हेच प्रकार आता शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे सभागृहात वाद व्हावे मात्र सभागृहाचे पावित्र्य संपुष्टात येणार नाही एवढी दक्षता नगरसेवकांनी घ्यायलाच हवी.