चौथ्या पिढीचा उत्सव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 03:31 AM2018-09-16T03:31:41+5:302018-09-16T15:15:55+5:30

ठाण्याचा गणेशोत्सव हा काही मुंबई, पुणे व कल्याणइतका प्रसिद्ध नाही. त्यामुळे इथल्या गणेशोत्सवाच्या इतिहासाबद्दल फारसं कोणी लिहिलं नसावं.

Fourth generation celebration | चौथ्या पिढीचा उत्सव

चौथ्या पिढीचा उत्सव

googlenewsNext

- श्रीकांत नेर्लेकर, ज्येष्ठ पत्रकार

ठाण्याचा गणेशोत्सव हा काही मुंबई, पुणे व कल्याणइतका प्रसिद्ध नाही. त्यामुळे इथल्या गणेशोत्सवाच्या इतिहासाबद्दल फारसं कोणी लिहिलं नसावं. पण, तरीही इथल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला तब्बल १२० वर्षांची प्राचीन परंपरा आहे. दा.बा. देवल यांनी लिहिलेल्या ‘ऐतिहासिक ठाणे’ या पुस्तकात ‘१८९८ मध्ये ठाण्यात सार्वजनिक गणेशोत्सव सुरू’ अशी फक्त एका वाक्यात नोंद आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या १२० वर्षांच्या परंपरेवर शिक्कामोर्तब होतं.

ठाणे पूर्वी फार छोटं होतं. आजच्या इतका शहराचा अवाढव्य विस्तार झाला नव्हता. ठाण्यात शंभरी पार केलेला एकच विद्यमान सार्वजनिक गणेशोत्सव आहे. तो म्हणजे आनंद भारती समाजाचा. १९१० साली तो सुरू झाला. आज या गणेशोत्सवाचं वय ११८ आहे. ठाण्याच्या लोकमान्यआळीतील सार्वजनिक गणेशोत्सव ९८ वर्षे वयाचा असून नौपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे (माघी) वय ८७ वर्षांचे आहे. ज्येष्ठत्वाचं बिरूद प्राप्त करणाऱ्या या गणेशोत्सवांनी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या गणेशोत्सवांची परंपरा निगुतीने जपली आहे, असे म्हणावे लागेल.

मेळा आणि पान- सुपारी
पन्नास-साठच्या दशकापर्यंत ठाणे गावाचे क्षेत्रफळ जेमतेम साडेपाच चौरस मैल होते. नौपाडा, कोपरी हे भाग १९५८ साली ठाणे नगरपालिकेत विलीन झाले. छोट्या ठाण्यात सार्वजनिक गणपती हाताच्या बोटांवर मोजता येतील, इतके कमी होते. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १९२० मध्ये त्या वेळच्या शेणवेआळीत (आताची लोकमान्यआळी) लोकमान्य टिळकांनी हजेरी लावून भाषण केल्याची नोंद इतिहासात आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवणे, हे एकमेव ध्येय त्या वेळी लोकांसमोर होते. त्या वेळी जे जे करावे लागेल, ते ते करण्याची त्यांची तयारी असे. १९२१ मध्ये तत्कालीन काळा गोविंदाच्या चाळीत गणेशोत्सवानिमित्त तांबे, इंगळे, चव्हाण, गायकवाड यांनी स्वदेशीच्या शपथा घेतल्याचे व विदेशी कापडाची होळी केल्याचे इतिहासात नमूद आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात मेळ्यांचे कार्यक्रम अधिक संख्येने होत असत. १९२१ साली मेळ्यांचे पहिले संमेलन ठाण्यात झाले होते. त्यात १२ मेळ्यांनी भाग घेतला होता. १९२२ मध्ये मेळ्यांचे दुसरे संमेलन ठाण्यात भरवण्यात आले असता त्यात २२ मेळे सामील झाले होते. लोकमान्य मेळा, ऐक्यवर्धक मेळा, सन्मित्र मेळा, पैसा फंड मेळा, मावळी मंडळ मेळा, अरुणोदय मेळा, शेतकरी मेळा, आनंद भारती मेळा, चरखा मेळा आदी अनेक मेळ्यांचा त्यात समावेश होता. त्या काळी मेळ्यांच्या स्पर्धा भरत. स्पर्धा भाजी मार्केटमध्ये होत असत. १९२२ मध्ये झालेल्या स्पर्धेत आनंद भारती मेळ्याने पहिला क्रमांक पटकावला होता. मेळ्यांनी त्या काळात लोकशिक्षणाचे काम मोठ्या प्रमाणावर केले. राष्टÑीय भावना पसरवण्याचे काम मोठ्या परिणामकारकतेने त्यांनी केले. समाजप्रबोधन, स्वदेशी राष्टÑीय शिक्षण यांचा आशय असलेली पदे मेळ्यात सादर करताना दत्तात्रेय माणिक ठाणेकर (दत्तुबुवा) अग्रेसर होते. १९१० ते १९२० या प्रारंभीच्या दशकात गणेशोत्सवामध्ये मेळा आणि पानसुपारी यांना खूप महत्त्व प्राप्त झाले होते. मेळ्यात सहभागी होणाºया मुलामुलींच्या गणवेशाचा खर्च लोक हौसेने व कर्तव्यभावनेने करत असत.पानसुपारीचा हा समारंभ म्हणजे उत्सवाची शान समजली जात असे. १९४०-४२ पर्यंत मेळा व पानसुपारीची प्रथा सुरू होती.

पौराणिक व धार्मिक देखाव्यांवर भर
पूर्वीच्या काळी गणेशोत्सव म्हणजे इव्हेंट नव्हता. त्या काळी आजच्यासारखी रंगीबेरंगी विद्युत रोषणाई नव्हती. इलेक्ट्रॉनिक व स्वयंचलित वस्तू नव्हत्या. पण, गणपतीसमोर नेत्रदीपक आरास व सजावट करावी व ती लोकांनी पाहावी, असे गणेशोत्सवकर्त्यांना वाटत असे. गणपतीसमोर पौराणिक देखावे, निसर्गरम्य देखावे, एखाद्या प्रसिद्ध राजवाड्याची प्रतिकृती, ऐतिहासिक लढायांचे देखावे, धार्मिक व सामाजिक देखावे उभारून त्याद्वारे संदेश देण्याचे काम गणेशोत्सव मंडळे करत असत.
ठाण्याच्या टेंभीनाक्यावरील सावंतमास्तरांच्या गणपतीपुढील सजावट पाहण्यासारखी असे. ते जे.जे. स्कूल आॅफ आर्र्ट्सचे कलाकार असल्याने सजावट पाहण्यासाठी लांबून लोक येत असत. सिनेगॉगशेजारील भोईर यांचा गणपती, सिव्हिल हॉस्पिटलसमोरील पिंपळपाडा येथील सारंगांचा गणपती, चेंदणी कोळीवाड्यातील हरीशदादांचा गणपती, नारळवाला गल्लीतील सहदेव ढमालेंचा गणपती, कोलबाडमधील निवातेंचा गणपती, राममारुती रोडवरील शिवलकरांचा गणपती आदी अनेक ठिकाणचे गणपती आरास व सजावटीसाठी प्रसिद्ध होते.
१९४७ साली देश स्वतंत्र झाला. त्या वेळी स्वतंत्र भारताची आरास गणपतीसमोर करण्यात आली होती. १९५३ मध्ये हिमालयाचे एव्हरेस्ट शिखर जिंकल्याच्या घटनेने लोकांना आनंद झाला. त्या वेळी हेन्सी व शेर्पातेनसिंग यांच्या एव्हरेस्ट सर केलेल्या घटनेचा देखावा गणपतीसमोर चितारण्यात आला होता. १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध, १९६५ मधील भारत-पाकिस्तान युद्धातील भारताचा विजय, १९७१ मध्ये अपोलो चांद्रयान, १९९८ मध्ये कारगिल युद्धातील विजय यांचे देखावे गणपतीसमोर चितारल्याचे अनेकांना ठाऊक असेल. सारंग व भोईर यांचे पौराणिक व धार्मिक देखावे लोकांना आवडत.

लोकमान्य टिळकांची आरती
चरई भागातील लोकमान्यआळीतील सार्वजनिक गणेशोत्सव २०२० मध्ये शंभराव्या वर्षात पदार्पण करेल. या आळीचे जुने नाव शेणवेआळी असे होते. १९१८ मध्ये लोकमान्य टिळकांचे या आळीत भाषण झाले होते. त्याची स्मृती जागवण्यासाठी शेणवेआळीचे बारसे होऊन त्याचे नामकरण लोकमान्यआळी झाले. हा गणेशोत्सव १९४० मध्ये झालेल्या ठरावानुसार लोकमान्य आळी गणेशोत्सव म्हणून ओळखळा जाऊ लागला. काळ बदलला, लोकवस्ती वाढली. समाज बदलला. पण, इथल्या गणेशोत्सव मंडळाने आपल्या गणेशोत्सवाची वैशिष्ट्ये निगुतीने जपली आहेत. वर्गणीसाठी सक्ती नाही. रात्री आरतीची वेळ कधी चुकली नाही. गुलाल उधळण्यास मज्जाव, सहस्रावर्तन ठरलेले, घरी प्रसाद देण्याची प्रथा, चोख हिशेब अशी या गणेशोत्सवाची कितीतरी वैशिष्ट्ये सांगता येतील. दरवर्षी एक रुपया तरी शिल्लक राहिला पाहिजे, असा या गणेशोत्सवाचा दंडक आहे. त्यामुळे हा उत्सव कधी नुकसानीत गेला नाही. लोकमान्य टिळकांची आरती म्हणणारा हा कदाचित जगातील एकमेव गणेशोत्सव असावा. गणेशोत्सवात दररोज कापूर, उदबत्ती, नारळ अशा कितीतरी वस्तू लागतात. गणेश विसर्जनानंतर या वस्तूंचा लिलाव केला जातो. लोक श्रद्धेने त्या खरेदी करतात. १९२० मध्ये गणेश गोविंद आठवले, विश्वनाथ लक्ष्मण जोशी, दत्तात्रेय प्रभाकर रहाळकर आणि रामचंद्र महादेव गाडगीळ या चौघांनी हस्तलिखित पत्रक काढल्याने हा उत्सव सुरू झाला. गणेशोत्सवाचे आद्यप्रवर्तक म्हणून या चौघांकडे त्याचे श्रेय जाते. या उत्सवाने आजवर किमान १५ पारितोषिके पटकावली आहेत. १९२५ मध्ये या मंडळाच्या मेळ्याने स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. या मंडळाचे मयूरेश देव, अजित रानडे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम समितीचे किशोर करमरकर, शर्मिली ठकार, आदिती भातखंडे, सौरभ डोंगरे व अन्य शताब्दी सोहळा भव्यदिव्य करण्याच्या विचारात आहेत.

‘प’ पोलीस आणि पालिकेचा
ठाण्यातील पोलीस लाइनचा गणपती आणि ठाणे महापालिकेचा गणपती हे दोन्ही गणेशोत्सव जुन्या सदरात मोडणारे म्हणून प्रसिद्ध आहेत. पोलीस लाइनचा गणपती १९४८ साली सुरू झाला. त्याचे वय ७० आहे. आज हा उत्सव पोलीस मुख्यालय व प्राथमिक शाळेचा उत्सव म्हणून ओळखला जात आहे. हिवराज पवार गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष म्हणून निगुतीचे काम पाहत आहेत. पूर्वी या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसºया दिवशी होत असे. अनंत चतुर्दशीला पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने बंदोबस्तासाठी असत, म्हणून येथील गणपतीचे विसर्जन दुसºया दिवशी होत असे. पण, आता गेली ८/१० वर्षे अनंत चतुर्दशीलाच विसर्जन होत असते. शिस्तीत चालणारा, कोणताही धांगडधिंगाणा नसलेला आदर्श गणेशोत्सव अशी त्याची ख्याती आहे.
दरवर्षी ताज्या घडामोडींवरील एखादा विषय घेऊन त्यावरील प्रबोधनात्मक व माहितीपूर्ण चित्रफीत दाखवण्याची या गणेशोत्सवाची ख्याती असून आजवर या गणेशोत्सवाने दीडशेहून अधिक बक्षिसे पटकावण्याचा विक्रम केला आहे. ठाणे नगरपालिकेचा गणपती सुरू होऊन ५५ वर्षे झाली आहेत. बाजारपेठेत जुनी नगरपालिका असताना १९६३ पासून हा उत्सव सुरू झाला. १९८२ मध्ये महापालिका अस्तित्वात आली. पालिकेच्या मुख्यालयात ३६ वर्षे गणपती बसत असून त्याच कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक आदी त्यात सहभागी होतात.

‘शतक’ पाहिलेला कोळ्यांचा गणेशोत्सव
ठाणे पूर्वेतील आनंद भारती समाजाच्या गणेशोत्सवाची शताब्दी २०१० मध्येच साजरी झाली. हा उत्सव प्रामुख्याने कोळी समाजाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. शंभर वर्षांपूर्वी अज्ञान, अंधश्रद्धा आणि व्यसनाधीनता यामध्ये बुडून गेलेल्या कोळी समाजाला बाहेर काढून त्यांचा शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक स्तर उंचावण्याचे अनमोल काम या गणेशोत्सवाने केले, असे म्हणता येईल. पारतंत्र्य, स्वातंत्र्य, ग्रामपंचायत, नगर परिषद आणि महापालिका या ठाण्याच्या बदलत्या घडामोडींचा जिवंत साक्षीदार म्हणून या गणेशोत्सवाला खूप महत्त्व आहे. चेंदणी कोळीवाडा असोसिएशनचे अग्रणी दगडू पांडू नाखवा, गजानन तथा काका नाईक, रामचंद्र तथा रामभाऊ शिवराम तनपुरे, विष्णू पांडू नाखवा, नारायण

 

Web Title: Fourth generation celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.