श्वानप्रेमींनाही आवरण्याची नितांत गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 11:30 PM2018-12-09T23:30:17+5:302018-12-09T23:30:42+5:30
ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. उल्हासनगरातील श्वानदंशाची ताजी घटना त्याचा ढळढळीत पुरावा आहे.
- अजित मांडके, ठाणे
ठाणे शहरासह जिल्ह्यातील सर्व महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. उल्हासनगरातील श्वानदंशाची ताजी घटना त्याचा ढळढळीत पुरावा आहे. श्वानांचे निर्बिजीकरण केल्याचे दावे महापालिका करीत असले तरी अजूनही हजारो कुत्र्यांचे निर्बिजीकरण झालेले नाही. या भटक्या कुत्र्यांपेक्षा जास्त दहशत ही श्वानप्रेमींची आहे. कुत्र्यांच्या गळ््यात पट्टे बांधून त्यांना पकडण्यास विरोध करण्यापासून रस्तोरस्ती बिस्किटे वाटत फिरण्यापर्यंत अनेक मार्गाने त्यांचा उपद्रव सुरु असतो.
उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्याने सात मुलांचा चावा घेतल्यानंतर आता जिल्ह्यातील भटक्या कुत्र्यांची दहशत कशी वाढते याची कल्पनाच न केलेली बरी. ठाण्यात दर १८ व्या मिनिटाला भटका कुत्रा एका व्यक्तीचा चावा घेतो. दिवसाला ठाण्यात श्वानदंशाच्या ५० ते ६० घटना घडतात. ठाण्यात आजच्या घडीला सुमारे एक लाखांच्या आसपास भटकी कुत्री आहेत. केवळ झोपडपट्टी भागातच नाही तर सोसायटींच्या परिसरातही या भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली आहे. याचा बंदोबस्त करण्यासाठी किंवा या भटक्या कुत्र्यांची संख्या वाढू नये म्हणून महापालिकेकडून निर्बिजीकरणाची शस्त्रक्रिया केली जात आहे. परंतु असे असतानाही ठाण्यातच नव्हे तर जिल्ह्यातील प्रत्येक महापालिकेच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांची दहशत अनुभवास येते.
कल्याण डोंबिवलीत श्वानदंशाचे प्रमाण दिवसाकाठी २० ते ३० च्या घरात असल्याची माहिती आहे. अशीच विदारक परिस्थिती मीरा भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर या महापालिकांच्या क्षेत्रातही आहे. दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. ठाण्यात २०१७ मध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या ही सुमारे ७५ हजारांच्या आसपास होती. केवळ वर्षभरात ही संख्या २५ हजारांनी वाढून लाखाच्या घरात गेली. कुत्र्यांची संख्या वाढण्याचे प्रमाण हे वर्षाला २० टक्क्यांच्या आसपास आहे.
२०१७ मध्ये मुंब्य्रात एका नऊ वर्षीय मुलाचा कुत्र्याने चावा घेतला होता. तसेच अडीच वर्षांच्या मुलाचे भटक्या कुत्र्यांनी लचके तोडले होते. एक कुत्री साधारणपणे वर्षातून दोनवेळा पिल्ले देत असते, तिला साधारणपणे एका वेळेस १२ पिल्ले होतात. त्यातील सुमारे ६ पिल्ले जगतात. याच्यावरुन भटकी कुत्री कशी वाढतात याचा अंदाज येतो. ठाण्यासह इतर महापालिका भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणावर वर्षाला लाखो रुपयांचा निधी खर्च करतात. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून मागील कित्येक वर्षापासून निर्बिजीकरणाची प्रक्रिया सुरुच आहे. जी आजतागायत संपलेली नाही.
ठाणे महापालिकेची २००४ पासून निर्बिजीकरण शस्त्रक्रियेची आकडेवारी तपासली असता, २०११ मध्ये ६३७३, २०१२ मध्ये ५१६०, २०१३ मध्ये ५५६, २०१४ मध्ये ४६४८, २०१५ मध्ये ३६८३, २०१६ मध्ये १७७६ आणि २०१७ मध्ये ३००० आसपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. परंतु आजही १५ हजारांच्या आसपास भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करणे शिल्लक असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. नवीन कुत्र्यांची संख्या आटोक्यात आल्याचा दावा महापालिका करीत आहे. काही महिन्यांपूर्वी भटक्या कुत्र्यांच्या लचके घेण्याच्या वाढत्या घटनांचा मुद्दा महासभेत आणि स्थायी समितीच्या बैठकीत गाजला होता. त्यावेळी वाढलेली कुत्री ही महापालिका हद्दीतील नसल्याचा दावा पालिकेच्या संबधींत विभागाने केला होता. मुंबईच्या वेशीवरील ही भटकी कुत्री ठाण्यात सोडली जात असल्याचा दावा पालिकेने केला होता. वास्तविक एखाद्या ठिकाणी अगोदर असलेली चार ते पाच कुत्री बाहेरुन आलेल्या नवीन कुत्र्यांना आपल्या परिसरात सामावून घेत नाहीत. त्यामुळे माणसांमधील हद्दीचे वाद कुत्र्यांसारखे भुंकण्याच्या पातळीवर गेल्याचे दाखले दिले जातात. त्यामुळे पालिकेने केलेला कुत्र्यांच्या लोंढ्यांचा हा दावा कितपत योग्य आहे, हाच खरा सवाल आहे. दरम्यान, भटक्या कुत्र्यांच्या निशाण्यावर लहान मुले अधिक असल्याची माहिती एका सर्व्हेतून उघड झाली आहे. उल्हासनगरमध्ये भटक्या कुत्र्याने चावा घेतलेल्यांमध्ये लहान मुलांचाच समावेश अधिक असल्याचे वास्तव आहे. ३ ते ८ या वयोगटातील मुलांवरच अधिक हल्ले होत असल्याचे चित्र असून ते प्रमाण ८० टक्क्यांच्या आसपास असल्याची माहिती आहे. भटक्या कुत्र्यांना आळा घालण्यासाठी किंवा ही भटकी कुत्री एकत्र करुन ती एकाच ठिकाणी ठेवण्यात यावीत यासाठी काही वर्षांपूर्वी बहुतेक महापालिकांची चर्चा झाली होती. त्यानुसार भिवंडीपासून थोड्या अंतरावर असलेल्या एका ठिकाणी ही भटकी कुत्री ठेवण्याचे नियोजन होते. परंतु या भटक्या कुत्र्यांच्या संगोपनाचा खर्च, त्यांची निगा, देखभाल आदींचा खर्च कोण उचलणार यावर एकमत न झाल्याने हा प्रस्ताव मार्गी लागू शकलेला नाही. भटक्या कुत्र्यांसाठी शेल्टरची मागणी ठाण्यात झाली होती. परंतु त्याचे घोंगडे भिजत पडलेले आहे.
त्यातही प्रत्येक महापालिकांच्या ठिकाणी भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी एक ते दोन स्कॉड असून त्यामध्ये तीन ते पाच कर्मचारी आहेत. ठाण्यात एकच स्कॉड असून त्यामध्ये एकच डॉग व्हॅन असून ती दिवा ते घोडबंदर असा प्रवास करते. दिवसाला सुमारे २५ कुत्रे या डॉग व्हॅनच्या माध्यमातून पकडले जातात. २०१३ मध्ये आणखी एक डॉग व्हॅन प्रशासनाकडे मागितली होती. परंतु ती अद्याप देण्यात आलेली नाही. भटक्या कुत्र्यांच्या संख्येवरुन गदारोळ झाला तेव्हा भटक्या कुत्र्यांचे दुचाकीवरुन सर्व्हेक्षण करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाने, दीड वर्षांपूर्वी आणला होता. परंतु निधी अभावी हा प्रस्ताव कागदावरच राहिला होता. त्याला अद्याप गती मिळालेली नाही. त्यामुळे शहरात आजच्या घडीला किती भटके कुत्रे आहेत, याची ठोस आकडेवारी पालिकेकडे सुद्धा नाही.
वेगवेगळ््या शहरांमध्ये श्वानप्रेमींच्या टोळ््यांचाही धुमाकूळ वाढला आहे. प्रत्येक कुत्र्याचे पालनपोषण केल्याचे दाखवून त्या बदल्यात आर्थिक हितसंबंध जपण्याचे प्रकार ही मंडळी करतात. भटक्या कुत्र्यांच्या गळ््यात पट्टे बांधून ते जणू पाळीव कुत्रे असल्याचे भासवले जाते. महापालिकेचे कर्मचारी कुत्रे पकडायला आल्यावर हे श्वानप्रेमी फक्त भुंकण्याचे बाकी ठेवतात. काही श्वानप्रेमी किंवा भूतदया दाखवणारे कुत्र्यांना बिस्कीटे वाटत फिरतात. रस्त्यात ठिकठिकाणी बिस्कीटे टाकून ते सार्वजनिक स्वच्छतेला बट्टा लावतात. मात्र त्यांच्या भूतदयेला कुरवाळण्यापुढे त्यांना शहर विद्रुपीकरणाची पर्वा नसते. एकूणच ठाण्यासह इतर महापालिकांच्या ठिकाणी या भटक्या कुत्र्यांची आणि श्वानप्रेमींच्या टोळ््यांची दहशत दिवसागणिक वाढत आहे.