भाजपाची प्रतिमा झाली कलंकित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 11:11 PM2019-01-27T23:11:56+5:302019-01-27T23:12:48+5:30

कल्याण, डोंबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला. भाजपाचे डोंबिवली पूर्व मंडलाचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांना शस्त्रास्त्रे विक्रीकरिता अटक झाल्यामुळे पक्षाच्या बालेकिल्ल्याला हादरे बसणे स्वाभाविक आहे.

The image of BJP has been tarnished | भाजपाची प्रतिमा झाली कलंकित

भाजपाची प्रतिमा झाली कलंकित

googlenewsNext

- अनिकेत घमंडी , डोंबिवली

कल्याण, डोंबिवली हा भाजपाचा बालेकिल्ला. भाजपाचे डोंबिवली पूर्व मंडलाचे उपाध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांना शस्त्रास्त्रे विक्रीकरिता अटक झाल्यामुळे पक्षाच्या बालेकिल्ल्याला हादरे बसणे स्वाभाविक आहे. पांढरपेशा समाजातील कुलकर्णी हे पक्षाचा साधा, सोज्वळ चेहरा म्हणून ओळखले जात होते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी ते झटले. मात्र शस्त्रास्त्र विक्रीच्या प्रकरणात त्यांना अटक झाल्याने कुलकर्णी यांच्या व पक्षाच्या प्रतिमेला तडा जाणे क्रमप्राप्त होते. कुलकर्णी याला झालेल्या अटके इतकीच धक्कादायक या विषयावर स्थानिक भाजपा नेत्यांनी घेतलेली मिठाची गुळणी होती. त्याचबरोबर राजकीय दबावापोटी पोलिसांनी कुलकर्णी याच्या पोलीस कोठडीची मागणी न करता त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत होण्याकरिता पडद्याआड केलेली खटपट ही देखील धक्कादायक व निषेधार्ह होती. मीडियात कुलकर्णीच्या शस्त्रसाठ्यावरुन गाजावाजा झाल्यावर मग पोलिसांनी कुलकर्णीच्या पोलीस कोठडीकरिता न्यायालयात अर्ज केला. मात्र तोपर्यंत पोलिसांची बेअब्रु झाली.

कुलकर्णी हा रा. स्व. संघाचा स्वयंसेवक आहे. संघ दसºयाला शस्त्रपूजन करतो. डोंबिवलीत अनेक तरुणांमध्ये फॅशन म्हणून गुप्त्या, तलवारी, एअरगन ठेवण्यात येते हे जरी खरे असले तरी कुलकर्णीच्या दुकानात केवळ फॅशनेबल शस्त्रे नव्हे तर मोठी शस्त्रे सापडली. अन्य कुणी शस्त्रांचे दुकान काढणे व संघाचा स्वयंसेवक असलेल्या व भाजपाच्या पदाधिकाºयाने काढणे यामध्ये जमीनअस्मानाचा फरक आहे. निवडणुका जवळ येत असताना कुलकर्णीकडे शस्त्रसाठा सापडल्यामुळे हा दंगे करुन निवडणुका जिंकण्याचा कट होता किंवा कसे, अशी शंका घेण्यास विरोधकांना वाव निर्माण झाला. निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती झाली नाही तर भाजपाच्या कार्यकर्त्यांना स्वसंरक्षणाकरिता शस्त्रे वाटण्याकरिता हे दुकान उघडले होते का, अशी शंका लोकांच्या मनात येणे स्वाभाविक होते. त्यामुळे कुलकर्णी यालाच आपल्या चुकीची जाणीव व्हायला हवी होती. समजा कुलकर्णी याच्या हे लक्षात आले नाही तर पक्षातील अन्य मंडळींनी, नेत्यांनी हे त्याच्या लक्षात आणून द्यायला हवे होते.

मुंब्रा किंवा भिवंडीतील एखाद्या व्यक्तीकडे शस्त्रसाठा सापडला तर त्याला लागलीच दहशतवादी ठरवून पोलीस मोकळे होतात. मात्र कुलकर्णीसारख्या एखाद्याकडे शस्त्रे सापडूनही त्यावर कारवाई केली जात नाही, अशी जनभावना निर्माण होणे योग्य नाही. विशेष करुन जेव्हा महाराष्ट्र व कर्नाटक या राज्यांमधील काही जहाल हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडे शस्त्रे व बॉम्ब बनवण्याचे साहित्य सापडले असताना तर कुलकर्णी याच्याकडे सापडलेला शस्त्रसाठा काहूर माजवणारा ठरणार हे सूर्यप्रकाशाएवढे स्पष्ट आहे.

मागील सरकारमध्ये गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने अनेक दबंग मंडळी त्या पक्षाच्या वळचणीला होती. आता राज्यात भाजपाकडे गृहखाते असल्याने अनेकांनी भाजपाच्या आड आसरा घेतला आहे. काही डागाळलेल्या मंडळींना भाजपाने पक्षात घेऊन पदे दिली आहेत. अशा व्यक्तींमुळे पक्ष अडचणीत येणे स्वाभाविक आहे. मात्र कुलकर्णी हा तर पक्षाचा स्वयंसेवक असल्याने त्याला तरी पक्षाची संहिता माहिती असणे आवश्यक होते. किंबहुना भाजपमध्ये ज्यांना जबाबदाºया दिल्या जातात त्यांना पक्षशिस्त, इतिहास, वारसा याबाबतची जाण असणे आवश्यक आहे. केवळ निवडणुका जिंकणे हा मर्यादीत हेतू असता कामा नये.

सत्तेमुळे भाजपामध्येही गटबाजी बोकाळली आहे. कुलकर्णी याच्याकडे शस्त्रसाठा असल्याची माहिती कदाचित पक्षातील एखाद्या त्याच्या विरोधकानेच थेट पोलिसांना किंवा त्यांच्या खबºयांना पुरवली असण्याची शक्यता नाकारता येत नाही. गटबाजीने पोखरलेला असा पक्ष निवडणुकीत यशस्वी होऊ शकत नाही.

कल्याण-डोंबिवलीतील राजकारणाचे गुन्हेगारीकरण झपाट्याने झाले आहे. अनेक नगरसेवकांवर गुन्हे दाखल असून ते महापालिकेमध्ये आपल्या खासगी सुरक्षा रक्षकांसोबत किंवा कार्यकर्त्यांच्या फौजेसोबत येतात. त्यांच्यासोबत आणलेली शस्त्रे महासभेत नेली जातात, पालिकेच्या परिसरात असणाºया वाहनांमध्येही शस्त्रे असतात. यापूर्वी वादविवादांच्या वेळी ते दिसून आले आहे. लोकप्रतिनिधींमधील राड्यांची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी कुलकर्णीच्या शस्त्रसाठयाची झाली. सोशल मीडियावर या प्रकरणाची प्रचंड दखल घेत अनेकांनी भाजपाचे वाभाडे काढले. सध्या ट्रोलिंगचा जमाना असल्याने ही धोक्याची घंटा म्हणून भाजपाने याकडे पाहिले पाहिजे.

पश्चिमेला पक्षाचे केवळ हातावर मोजण्याएवढे नगरसेवक आहेत, त्यामुळे पश्चिमेला पक्षवाढीला वाव आहे. पण तेथे संघटनात्मक जाळे विणले गेलेले नाही. पूर्वेला पक्ष वाढला असून जवळपास भाजपाचेच नगरसेवक आहेत, तेथे पक्ष विस्तारला असला तरी ती सूज आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना तसेच काँग्रेसमधून भाजपात अनेकांनी प्रवेश केला. त्यातले काही भाजपच्या तिकिटावर नगरसेवक झाले, परंतु ते पक्षात फारसे नांदत नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मूळचे व उपरे अशा संघर्षांतूनही हे शस्त्र प्रकरण घडलेले असू शकते. आमदार रवींद्र चव्हाण त्यांच्या कार्यकौशल्यामुळे, संघटनात्मक कार्य करण्याच्या खुबीमुळे पुढे गेले.

आता तर ते राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांचा विश्वास जिंकल्याने ‘कोअर टीम’चा मुख्य घटक झाले आहेत. पण स्थानिक पातळीवर भाजपाला त्यांच्यासारखा भक्कम नेता मिळू शकलेला नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. चव्हाण यांनी हे जाळे विणण्याची आवश्यकता आहे.

Web Title: The image of BJP has been tarnished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.