शापित परंपरेची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 12:59 AM2018-05-29T00:59:53+5:302018-05-29T00:59:53+5:30
भटक्या, विमुक्त समाजामध्ये पारधी समाज सर्वांच्या परिचयाचा आहे. या समाजाकडे यंत्रणा किंवा काही ठरावीक लोकांचा दृष्टिकोन गुन्हेगारी म्हणून बघण्याचा आहे.
- विजय जाधव
भटक्या, विमुक्त समाजामध्ये पारधी समाज सर्वांच्या परिचयाचा आहे. या समाजाकडे यंत्रणा किंवा काही ठरावीक लोकांचा दृष्टिकोन गुन्हेगारी म्हणून बघण्याचा आहे. त्यांना पकडा, मारा, जेलमध्ये टाका, अत्याचार करा, असे प्रकार होताना दिसतात. काही प्रमाणात यामध्ये सुधारणा झालेली दिसते.
या समाजातील मुले शहरीस्तरावर जेव्हा भटकत येतात, तेव्हा त्या मुलांसाठी ‘समतोल’ मदतकार्य सुरू करते. अशाच प्रकारे दोन मुले म्हणजे बहीणभाऊ समतोलच्या संपर्कात आले. मुलगा व मुलगी अत्यंत दयनीय अवस्थेत ऐरोली स्टेशनबाहेर भीक मागताना दिसली. समतोलच्या कार्यक्र मात ‘समतोल मित्र’ ही एक संकल्पना आहे. समाजातील समस्या दूर करण्यासाठी समाजानेच पुढाकार घेतला तर ती समस्या कमी होईल, यावर समतोलचा विश्वास आहे. ‘समतोल मित्र’ समतोल कार्याशी जोडली जातात. अशीच ‘समतोल मित्र’ दीप्ती यांच्या ही दोन मुलं लक्षात येताच तिने ‘समतोल’ला फोन केला. या अवस्थेतील मुलांना काळजी व संरक्षणाची खूप गरज आहे, असे कायद्याच्या भाषेत ‘समतोल मित्र’ सांगत होती. आपल्याकडे शासकीय १०९८ ही हेल्पलाइन मुलाच्या समस्येवर काम करणारी आहे. आम्ही ताबडतोब त्यांना या नंबरवर फोन करायला सांगितले. दीप्ती यांनी अपेक्षेने फोन केला तेव्हा आमच्याकडे मनुष्यबळ नाही, असे उत्तर आले, त्यामुळे आम्ही मदत करू शकत नाही, हे ऐकून दीप्ती यांनी ‘समतोल’ला पुन्हा फोन केला. मुलाला मदत मिळावी म्हणून दीप्ती मॅडमने पोलीस स्टेशन गाठले. ‘बालकल्याण पोलीस अधिकारी’ यांच्याशी बोलायचे आहे, असे म्हटल्यावर जरा थांबा, कामे आहेत म्हणून बाजूला बसवून ठेवले होते. त्यात दोन तास गेले; पण मुलांना मदत करायचीच असे ठाम मत ‘समतोल मित्रा’चे असल्यामुळे वेळेचे भान राहिले नाही.
मुलांची अवस्था तशी खूप वाईट होती. लहान मुलगी वय वर्ष ८. तिला कोणत्यातरी गाडीने धक्का दिला होता, त्यामुळे तिचा हात मोडला होता. डोक्यालाही मार लागला होता. तिचा भाऊ १० वर्षांचा होता. तो तिला समजावत होता की, ताई व पोलीसकाका आपल्याला नक्की मदत करतील. त्याला बालकाचे हक्क व अधिकार यांची जाणीव काय असणार? तोही आशेने पोलिसांकडे दोन तास बसून होता.
वेळ खूप होत आहे, हे दीप्तीताईच्या लक्षात आले. आपल्याला बराच वेळ थांबावे लागणार आहे की काय म्हणून त्यांनी पुन्हा ‘समतोल’ कार्यालयात फोन केला व आपला कार्यकर्ता पाठवा, अशी विनंती करू लागल्या.
या सगळ्या प्रक्रियेमध्ये पोलिसांच्या लक्षात आल्यावर आपण मदत केलीच पाहिजे, असे मत तयार झाले. समतोल कार्यकर्त्या निधी तिथे गेल्या. पोलीस शिपायाला सोबत घेऊन निधी ठाणे रेल्वे पोलीस स्टेशनला आली. मुलाची जबाबदारी ‘समतोल’ने घेतलेलीच होती; परंतु प्रश्न मुलीबद्दल होता. शिवाय मुलीची वैद्यकीय तपासणी होणे खूप गरजेचे होते, म्हणून संध्यकाळी ६ वाजता हॉस्पिटलमध्ये मुलीला नेण्यात आले. मुलीची वैद्यकीय तपासणी करताना डोळ्याने दिसते की नाही म्हणून खूप वेळा तपासणी झाली. तिच्या डोक्यालाही जखम होती. यामध्ये रात्रीचे १ वाजले. निधी रात्री १ वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्ये थांबली. ही सामाजिक मानसिकता कार्यकर्त्यांमध्ये रुजवणे खूप महत्त्वाचे आहे, कारण काम सर्वच करतात. समाजसेवेची डिग्री दोन वर्षे घालवून घेतली जाते; परंतु खरी सेवा करण्याची वेळ आली की फिरणारे अनेक कार्यकर्ते ‘समतोल’कडेही आलेले आहेत. परंतु हे कार्यकर्ते समतोलच्या प्रवाहात टिकत नाही. प्रवाहात पोहून आपले ध्येय गाठणारे कार्यकर्ते ‘समतोल’ तयार करत असतात.
या मुलीला वात्सल्य ट्रस्ट सानपाडा येथे दाखल केले; परंतु भाऊबहीण वेगळे झाल्याचे दु:ख निधीच्या सांगण्यावरून जाणवत होते. निधीचा भाऊ शिबिरात गेला होता; परंतु त्या दिवशी बहिणीच्या प्रेमापोटी भूक असतानाही भूक नाही म्हणून उपाशी झोपला. सकाळी हाच मुलगा सर्वांच्या अगोदर उठून सूर्याला नमस्कार करतो. देवीची आठवण काढतो. आपली बहीण ठीक होण्यासाठी नवस करतो, अशी मानसिकता मुलाची होती. तो त्याच संस्कारात मोठा झाला होता. अनेक ठिकाणी फिरणाऱ्या या मुलाला शिबिरात मात्र सुरक्षित वाटले व त्याने हे बोलून दाखवले. जर मला सुरक्षित वाटले नसते तर मी केव्हाच येथून पळून गेलो असतो. शिबिरात हा मुलगा आता मला शिकायचे आहे. मोठे व्हायचे आहे. माझ्या बहिणीलाही शिकवायचे आहे, असे म्हणून तुम्ही मदत करा, अशी विनंती करू लागला. शिबिर संपल्यावर मुलाला आजीला भेटण्याची इच्छा होती. आम्ही त्याची ही इच्छा पूर्ण करायचे ठरवले. मुलाला घेऊन आमचा कार्यकर्ता रवी बोराडे यवतमाळमधील धामणगावला पोहोचला. तेथेही त्याने जीआरपीबरोबर चर्चा केली. पोलीस स्टेशनला सांगितले, तर पोलिसांनी तिकडे जाऊ नका, मुलाला येथेच सोडा, तो जाईल म्हणून सांगितले. रवीने त्यांना विचारले, असे का तर ते पारधी आहेत. मारतात, चोºया करतात. दारू पाडतात. तिकडे खूप वाईट परिस्थिती आहे. गावातले कोण जात नाही, म्हणून सांगितले.
समतोलच्या कार्यकर्त्याला याची उत्सुकता होती. शिवाय, मुलगा सांगतही होताच. रवी मुलाला घेऊन त्याच्या पालावर गेला. सर्वांनी उलट स्वागतच केले. रवीने त्या मुलाबद्दल सर्व सांगितले. आजी व इतर सर्व लोक आनंदाने रडू लागले. साहेब आम्ही वाईट नाही; पण लोकच आम्हाला वाईट बोलतात. आमची मुले शिकली पाहिजे, साहेब बनली पाहिजे. असे पारध्यांच्या पालावरील सर्वजण म्हणू लागले.
आजीने मुलाला छातीशी लावल्यावर बहिणीची आठवण भावाला आली. आई बहीण सुखरूप आहे. हॉस्पिटलला इलाज करते आहे, असं म्हटल्यावर सगळे जण मुंबईला यायला निघाले; परंतु त्यांची समज घालून मुलीशी बोलणे करून देऊन तिला शिकवायचे, मोठे करायचे आहे नं, मग राहू द्या अशी सहमती झाली.
आज हा मुलगा शाळेच्या ओढीने शाळा सुरू होण्याची वाट बघत आहे. भाऊबहीण वेगळे जरी असले, तरी पुढच्या विकासाच्या दृष्टीने वेगवेगळे आहेत व त्याला मुलांपासून परिवारची सहमती आहे. खरा समतोल जेव्हा साधला जातो, तेव्हा विकास दूर नसतो आणि हा विकास डोळ्यांच्या अश्रूंतून व्यक्त होतो.