असुविधांचा हत्तीरोग...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 11:17 PM2018-12-09T23:17:12+5:302018-12-09T23:18:41+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील द्वारली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना हत्तीरोगाची लागण झाल्याचे उघड झाले आणि आरोग्य यंत्रणा हादरली.
- मुरलीधर भवार, कल्याण/डोंबिवली
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील द्वारली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना हत्तीरोगाची लागण झाल्याचे उघड झाले आणि आरोग्य यंत्रणा हादरली. परराज्यातून येणाऱ्या मजुरांच्या माध्यमातून या रोगाचे संक्रमण झाले आहे, हे स्वाभाविक आहे. त्याचबरोबर राज्यात राबवली जाणारी रोग प्रतिबंधक मोहीम अधिक प्रभावीपणे राबवली जात नाही, हेही स्पष्ट दिसत आहे. परप्रातीयांच्या लोंढ्यांकडे राजकीय पक्ष राजकारणाचा मुद्दा म्हणून पाहतात. मात्र त्याच्या आरोग्यविषयक बाजूकडे दुर्लक्ष करतात, हे दुर्दैव आहे.
केंद्र व राज्य सरकारच्या आरोग्य विभागातर्फे हत्तीरोगाचे संक्रमण ठाणे जिल्ह्यात आहे की नाही यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत असलेल्या द्वारली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना हत्तीरोगाची लागण झाल्याचे प्रथमदर्शनी उघड झाले. यावरुन हत्तीरोगाचे संक्रमण सुरु आहे, हेच निष्पन्न झाले. हत्तीरोगाचे प्रमाण ठाणे जिल्ह्यात घटले असले तरी परराज्यातून येणाºया मजूर कुटुंबाकरवी हे संक्रमण महाराष्ट्रासह देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई उपनगरात होत असल्याचे स्पष्ट झाले. परराज्यातून नोकरीधंद्यासाठी येणारे परप्रांतीयांचे लोंढ्यामुळे नागरी सोयीसुविधांवर पडणारा अतिरिक्त ताण व त्याला अपुरी पडणारी स्थानिक स्वराज्य संस्थांची व्यवस्था यातून हत्तीरोगाचा पुन्हा शिरकाव झाला आहे. त्याला तोंड कसे द्यायचे हे आरोग्य विभागासमोरील आव्हान आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवून चालणार नाही. अंग झाडून कामाला लागण्याची गरज आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेचे क्षेत्रफळ मोठे आहे. या महापालिकेतून एकदा २७ गावे वगळण्यात आली व पुन्हा ती समाविष्ट करण्यात आली. या गावांत नागरी सोयीसुविधा देण्यासंदर्भात बोंब आहे. गावांचा विकास ना महापालिकेमुळे झाला ना जिल्हा परिषदेच्या राजवटीत झाला. गावांना बकाल स्वरुप प्राप्त झालेले आहे. महापालिकेच्या हद्दीतील गावांची जमीन मोकळी होती. त्यामुळे टिटवाळा परिसरात बेकायदा चाळीची बांधकामे झाली. कोपर व डोंबिवली परिसरात महापालिका हद्दीलगत मोकळ््या जागेवर बेकायदा बांधकामे उभी राहली. कल्याण पूर्वेलाही चाळीच्या चाळी वसल्या. ही बेकायदा बांधकामे स्थानिकांनी केली. काही भूमाफियांचा त्यात हात होता. ही बेकायदा बांधकामे रोखण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले. २७ गावातील बेकायदा बांधकामे व चाळींचा आकडा हा हजारोंच्या संख्येत आहे. या बेकायदा बांधकामांमुळे पाणी, आरोग्य व्यवस्थेवर ताण आला. या भागातील कचरा उचलला जात नाही. पाणी मिळत नसल्याने अस्वच्छतेचे वातावरण आहे. पाणी आले तर वापरलेल्या पाण्यानंतर जे काही सांडपाणी तयार होते. त्याचा निचरा होण्यासाठी सांडपाण्याची व्यवस्था नाही. मलनिस्सारणाची योजना नाही. कचरा कुठेही फेकून दिला जात आहे. महापालिकेने शहर केंद्रीभूत नागरी सुविधा पुरवल्या आहेत. बकाल झालेल्या भागात नागरी सुविधांची वानवा आहे. त्यामुळे त्याठिकाणी रोगराई पसरण्याची दाट शक्यता आहे. क्युलेक्स नावाच्या डासाची मादी चावल्याने हत्तीरोग होतो. त्यात पाय व वृषण मोठे होतात. शरीर विद्रूप होते. हत्तीरोग क्युलेक्स डासाची मादी चावल्याने होतो. डेंग्युचा ताप, मलेरिया हादेखील डासांच्या चावण्यामुळे होते. डेंग्युचे डास बांधकामासाठी व घरात साठवून ठेवलेल्या पाण्यावर येतात. तसेच सांडपाण्याचा निचरा झाला नाही तर त्याचा प्रादूर्भाव होतो.
डासांची पैदास होऊ नये यासाठी विविध उपाययोजना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून केल्या गेल्या पाहिजेत. महापालिकेकडून धूर फवारणी केली जाते. तसेच घाणीच्या ठिकाणी मलेरिया आॅइल फवारले जाते. धूर फवारणीवर महापालिका लाखो रुपयांचा खर्च करते. तरीही डासांची उत्पत्ती रोखण्यात महापालिका पूर्ण यशस्वी ठरलेली नाही. डासांची उत्पत्ती होण्यास घाणीचे साम्राज्य जबाबदार आहे. कचरा उचलण्यावर महापालिका वर्षाला १०० कोटींपेक्षा जास्त खर्च करते. तरी डासांची पैदास रोखली गेलेली नाही. बाजारात डासांना पळवण्यासाठी विविध कॉईल्सची विक्री जोरात आहे. डास पळवून लावण्याचा दावा करणाºया उत्पादनांचा धंदा तेजीत आहे. ही उत्पादने मानवी आरोग्यास हानीकारक आहेत. डास पळविणाºया सुगंधी अगरबत्तींचे उत्पादन दक्षिणेकडील राज्यात जोरात केले जाते. त्यावर महाराष्ट्र सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही.
बेकायदा चाळीत राहणारे कोण आहेत? बहुतांश उत्तर भारतीय व परराज्यातून कामानिमित्त, पोटापाण्यासाठी आलेले मजूर आहे. परराज्यातील मजूर कमी रोजदांरीवर मिळत असल्याने त्यांना चाळीत भाड्याने खोली मिळते. ते त्यांच्या कुटुंबासह चाळीत वास्तव्य करतात. परप्रांतीय फेरीवाले, त्यांचे येणारे लोंढे याविषयी राजकीय पक्ष आपली पोळी पिकवण्याच्या उद्देशाने आंदोलने करतात. प्रत्यक्षात अशा प्रकारच्या आरोग्य समस्या उदभल्यावर या राजकीय पक्षांचे मौन असते. राजकीय पक्षांकडून सोयीस्कर भूमिका घेतली जाते. त्यामुळे हे राजकीय मुद्दे केवळ निवडणुकीपुरते शिळ््या कढीला ऊत आणण्यासारखे आहे.
द्वारली गावात ज्या सहा शाळकरी मुलाच्या रक्त तपासणीत हत्तीरोगाचे विषाणू आढळून आले त्यांच्यामध्ये हत्तीरोगाची लक्षणे दिसण्यास सुरुवात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. १२ दिवसांत त्यांना झालेली लागण आटोक्यात येईल. सहा मुलांपैकी पाच मुले ही उत्तर प्रदेशातून या ठिकाणी आलेली आहेत तर एक मुलगा लातूरचा आहे. या मुलांचे पालक पोटापाण्यासाठी या ठिकाणी आले आहेत. हत्तीरोगाचे संक्रमण परराज्यातून व राज्यांतर्गत जिल्ह्यातून झाले असावे. ठाणे जिल्ह्यात २००५ ते २०१५ या कालावधी हत्तीरोग होऊ नये यासाठी सरकारने हत्तीरोगाच्या गोळ््या वय वर्षे दोन ते पुढील वयाच्या व्यक्तिंना दिल्या आहेत. ही प्रतिबंधात्मक मोहीम आहे. परराज्यातून हत्तीरोगाचे संक्रमण झाले आहे का, यासाठी सर्वेक्षण केले गेले. त्यात अंबरनाथ, शहापूर आणि कल्याण तालुक्यातील ७१ शाळेतील विद्यार्थ्यांचे रक्तांचे नमूने तपासण्यात आले आहेत. या सर्वेक्षणात हत्तीरोगाचे संक्रमण आहे ही बाब उघड झाली आहे. उत्तर प्रदेशात हत्तीरोगाचे रुग्ण जास्त आहेत. हा रोग मानवी संसर्गातून होतो. राज्यात हत्तीरोग निर्मूलनाची मोहीम प्रभावीपणे राबवली जात नाही.
महाराष्ट्रात हत्तीरोग निर्मूलनाचे केंद्र अगोदर वर्ध्याला होते. आता ते नागपूर येथे गेले. २०१५ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात हत्तीरोगाचे २० हजार रुग्ण आढळून होते. लातूर गडचिरोली याठिकाणीही रुग्ण हजारोंच्या संख्येत आढळून आले होते. त्यानंतर हत्तीरोगाची मोहीम अधिक गतीमान करण्यात आली. मात्र राज्यात हत्तीरोगाचे पूर्ण निर्मूलन झालेले नाही. काही ठिकाणी हत्तीरोगाचे रुग्ण मिळून येत आहेत. प्रमाण कमी झाले असले तरी धोका टळलेला नाही. रुग्ण आढळून आल्याने हत्तीरोगाच्या गोळ््या वाटपाचा कार्यक्रम सुरु ठेवायचा की नाही याचा निर्णय सरकार घेणार आहे.