जणू अत्तराची कुपीच!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2018 03:34 AM2018-09-16T03:34:58+5:302018-09-16T15:16:14+5:30
१९६०-६५ साली जेव्हा डोंबिवली हे छोटे गाव होते, तेव्हा तेथे साजऱ्या होणाºया गणेशोत्सवाच्या, त्या वेळी सादर होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आठवणी
- श्रीराम शिधये, ज्येष्ठ पत्रकार
सांस्कृतिक नगरी डोंबिवलीत दरवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो. मात्र, तो नव्या पद्धतीने. १९६०-६५ साली जेव्हा डोंबिवली हे छोटे गाव होते, तेव्हा तेथे साजऱ्या होणाºया गणेशोत्सवाच्या, त्या वेळी सादर होणाºया सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आठवणी...
डोंबिवली गाव तेव्हा लहान होतं. तेव्हा म्हणजे १९६० च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत ते लहान होतं. १९७० च्या दशकाच्या सुरुवातीला गाव वाढायला लागलं. त्याला मुख्य कारण होतं एमआयडीसी. तिथल्या कारखानदारीमुळे गावाच्या वाढीला चालना मिळाली. पण, तरीही श्वास रोखायला लागावा, अशी तेव्हा स्थिती नव्हती. १९६५ पर्यंत तर डोंबिवली हे एक मोठं गाव होतं. पण, त्या गावात अनेक नामवंत मंडळी राहत होती. गजाननराव जोशी, पु.भा. भावे, मोहनराव प्रधान, लिखिते बंधू, ल.ना. भावे, शं.ना. नवरे, वसुंधरा पटवर्धन, प्रभाकर अत्रे, मधुकर जोशी अशी मंडळी होती. ही मंडळी गावात भाजी, फळं घेताना सहजपणं दिसायची. आपलं मोठेपण सहजपणं पेलणाºया या मंडळींच्या वावराचाही तेव्हा एक आदरयुक्त धाक असायचा. त्यांना येताना पाहिलं की, सिगारेट ओढणारी मंडळी हातातली धूम्रकांडी लपवायची. वडीलकीला मान देण्याची ही गावाची परंपरा होती. अशा गावातला गणेशोत्सवही तसाच असायचा.
गणपतीच्या मंदिरातला गणेशोत्सव असो की, टिळकनगरमधला असो, तिथं उत्तम कार्यक्रम व्हायचे. व्याख्यानं, कथाकथन, गायन, नकला यांच्या कार्यक्रमांना लोक अलोट गर्दी करायचे. आठवतं त्याप्रमाणे एका वर्षी तर ग.दि. माडगूळकर, व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द.मा. मिरासदार यांच्या कथाकथनाचा कार्यक्रम झाला होता. तो अर्थातच अलोट गर्दीत झाला. चारही कथाकारांनी त्यावेळी मोठी बहार उडवून दिली होती. गदिमांनी सुरुवातीला प्रास्ताविक केलं. प्रासादयुक्त भाषेतलं त्यांचं बोलणं संपूच नये, असं वाटत होतं. त्यांच्यानंतर त्या चारही कथाकारांनी आपापल्या कथा सांगितल्या आणि श्रोत्यांना एक वेगळ्याच जगात नेऊन ठेवलं. कथाकथन सुरूअसतानाच व्यंकटेश माडगूळकर हातातल्या कागदांवर काही रेखाटनंही करत होते आणि ते करताकरताच सांगितल्या जाणाºया कथेला मनापासून दादही देत होते. या कथाकथनाप्रमाणेच गंगाधर गाडगीळ, विद्याधर गोखले, श्री. ज. जोशी यांच्या कथाकथनाचाही असाच बहारदार कार्यक्रम झालेला आठवतो. श्री. ज. जोशींच्या एका कथेनं हास्याचे उठलेले फवारे अजूनही कानात घुमत आहेत. शं. ना. नवरे, व. पु. काळे यांच्याही कथाकथनाला असाच भरघोस प्रतिसाद लोकांनी दिला होता.
मुद्दा असा की, त्या वेळी गणेशोत्सवात असे साहित्यिक कार्यक्रम होत असत आणि त्याला अलोट गर्दी जमत असे. लोकांना साहित्यिकांना बघायला, त्यांच्याच तोंडून त्यांच्या कथा ऐकायला आवडत होत्या. आपल्या आवडत्या लेखकाला ‘याची देही, याची डोळा’ पाहण्याची आणि त्याच्या तोंडून निघणाºया शब्दांना आपल्या कानांत साठवून ठेवण्याची आस होती. त्यामुळेच अशा कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असे. सभामंडप तर भरून जायचाच, पण लोकं रस्त्यावर उभं राहून त्यांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घ्यायचे. दाद द्यायचे.
कथाकथनाप्रमाणेच व्याख्यानंही होत असत. मराठी नवकथेचे एक शिल्पकार आणि दणकट वक्तृत्व यासाठी प्रसिद्ध असलेले पु.भा. भावे यांची व्याख्यानं गाजायची. वादळी व्यक्तिमत्त्वाच्या भाव्यांची आवेशपूर्ण, तिखट भाषणं श्रोत्यांना विचारात पाडायची. त्यांच्या भेदक भाषेचे वाक्तुषार त्यांच्या अंगावर रोमांच उभं करायचे. भाव्यांचा चाहतावर्ग डोंबिवलीतच नाहीतर महाराष्टÑभर पसरलेला होता. त्यांच्या कथांनी हजारो लोकांना मोहित केलं होतं आणि त्यांच्या वक्तृत्वानं त्यांना असीम असा आनंद दिला होता. त्यांची भाषणं ही श्रोत्यांसाठी एक पर्वणीच असायची. त्यामुळे त्यांच्या व्याख्यानाला तुफान गर्दी लोटायची. अगदी रस्त्यावर उभं राहूनसुद्धा लोक भाव्यांचं व्याख्यान शांतपणं ऐकत असायचे. योग्य तिथं दाद द्यायचे. टाळ्यांचा कडकडाट करायचे. शं.ना. नवरे यांचीही व्याख्यानं होत असत. त्यांची गोष्टीवेल्हाळ अशा सहजशैलीतील भाषणं श्रोत्यांना आपलंसं करत. मानवी जीवनातील एखादा हळवा कोपरा अलगदपणं दाखवून देत. त्यांच्या नादमयी भाषेनं श्रोते खूश होऊन जात असत. असे साहित्यिक कार्यक्रम हे डोंबिवलीतल्या गणेशात्सवाचे मोठं वैशिष्ट्य होतं.
साहित्यिक कार्यक्रमांप्रमाणेच गाण्याचेही कार्यक्रम होत असत. एका वर्षी, त्या वेळी मोठं नाव कमावणाºया, एका गायिकेचा कार्यक्रम होता. कार्यक्रम गणेश मंदिरातल्या गणेशोत्सवात होता. बार्इंच्या गाण्याला प्रचंड गर्दी झाली होती. बाई व्यासपीठावर आल्या. आसनस्थ झाल्या. त्यांनी समोरचा श्रोतृवृंद न्याहाळला. बहुधा, श्रोत्यांच्या चेहºयावरील भावाचा अर्थ बार्इंना कळला असावा. एका क्षणातच त्यांनी अंगभर पदर लपेटून घेतला आणि ते पाहताच श्रोत्यांनी टाळ्यांचा एकच कडकडाट केला. बाई बिनबाह्यांचा झम्पर घालून आल्या होत्या. श्रीगणेशापुढं गायला बसताना त्यांनी असा बिनबाह्यांचा झम्पर घालावा, ही गोष्ट डोंबिवलीकरांना रुचली नव्हती. त्यांच्या चेहºयावर नाराजी उमटली होती. पण, बाई गायनामध्ये जितक्या तयार होत्या, तितक्याच त्या श्रोत्यांचे चेहरे वाचण्यातही पटाईत होत्या. त्यांना लोकांची नावड बरोबर समजली आणि त्यांनी पदर लपेटून घेतला. नंतर, त्यांचं गाणं बहारीचं झालं. त्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली. ती दाद त्यांच्या गानकौशल्याला होती. त्यांच्या स्वराला होती. ती रात्र सूरमयी करून टाकणाºया त्यांच्या आवाजाला होती. कलेबद्दलचा आदर आणि कलाकारांची कदर मोकळेपणानं करायची, पण कलाकारानं काही पथ्यं पाळायला पाहिजेत, याबद्दलही आग्रही असायचं, अशी त्या वेळची डोंबिवलीकरांची रीत होती. त्या डोंबिवलीला तिचा असा एक खास चेहरा होता आणि तो लपवून ठेवण्याची किंवा त्याबद्दल लाज बाळगण्याची त्या वेळी तरी डोंबिवलीकरांना गरज वाटत नव्हती. जयवंत कुलकर्णी यांच्या गाण्याच्या कार्यक्रमानंही श्रोत्यांना रिझवलं होतं.
त्या काळात गणपती मंदिरातल्या उत्सवासाठी मंदिराचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करायचे. तेव्हा गाव मुख्यत: कनिष्ठ आणि मध्यमवर्गीयांच होतं. सारेच नोकरदार होते. ते जे काही देतील, ते विनातक्रार कार्यकर्ते स्वीकारत असत. त्याची लागलीच पावती देत असत. कार्यक्रमपत्रिका छापून तयार असेल, तर ती लगेच दिली जायची. नाहीतर नंतर कार्यक्रम जाहीर होत असत. जी पद्धत गणेश मंदिराची होती, तीच गावातल्या सर्वच सार्वजनिक गणेशोत्सवांची होती. याला मुख्य कारण म्हणजे श्रीगणेशाच्या उत्सवाला ‘इव्हेंट’चं रूप आलं नव्हतं. कार्यक्रमांच्या दर्जाबाबत मंडळी काटेकोरपणे विचार करत असे. गणेशाचं आगमन आणि त्याचं आपल्या घरी परतणं या दोन्ही वेळा निघणाºया मिरवणुका या फार गोंगाट न करता निघत. टिळकनगरमधल्या गणेश विसर्जनाची मिरवणूक तर पाहण्यासारखी असे. कमालीच्या शिस्तीत निघणारी ती मिरवणूक पाहण्यासाठी रात्री १० वाजल्यानंतरही, मुलांना ‘जागं’ राहावं लागायचं व त्याबद्दल त्यांना घरातून बोलणी खायला लागायची नाहीत! गणेश मंदिर व टिळकनगरचा गणेशात्सव यांच्या विसर्जनाची मिरवणूक अजूनही तशीच निघते. आता काळाप्रमाणें थोडेफार बदल झाले आहेत.
मात्र ते गणेशोत्सव आणि ते बुद्धीला खाद्य देणारे, मनाला निर्मळ आनदं देणारे, कानांना तृप्त करणारे आणि डोक्यात विचारांची आवर्तनं उमटवणारे कार्यक्रम आता अगदीच अभावाने दिसतात. महानगराचं रूप घेतलेल्या आजच्या डोंबिवलीत आता जुन्या गावाचा चेहरा पार झाकोळून गेला आहे. आता राहिल्या आहेत त्या फक्त आठवणी. त्यातल्याच या दोन मंडळांच्या थोडक्या आठवणी. काळाच्या ओघात व बदलच्या वेगातही त्या कधीही विस्मृतीच्या खोल गर्तेत हरवणार नाहीत. याचं कारण त्या कार्यक्रमांनी अनेकांच्या मनांना अक्षय आनंद दिला आहे. जुन्या अत्तराची कुपी उघडली तरीही होणारा असीम आनंदच त्या गतकाळातल्या गणेशात्सवाच्या आठवणी आजही देतात.