कलानी-किणीकर श्रेयात रस्ते रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 03:30 AM2018-04-09T03:30:22+5:302018-04-09T03:30:22+5:30

शहरातील मुख्य रस्त्याच्या बांधणीसाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला दिला. रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आमदार ज्योती कलानी व आमदार बालाजी किणीकर यांच्यात स्पर्धा लागली असून आपापल्या विधानसभा क्षेत्रांतील रस्त्याचे भूमिपूजन धूमधडाक्यात केले.

Kalani-Kinnik tracked roads | कलानी-किणीकर श्रेयात रस्ते रखडले

कलानी-किणीकर श्रेयात रस्ते रखडले

Next

- सदानंद नाईक,
उल्हासनगर- शहरातील मुख्य रस्त्याच्या बांधणीसाठी एमएमआरडीएने कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला दिला. रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी आमदार ज्योती कलानी व आमदार बालाजी किणीकर यांच्यात स्पर्धा लागली असून आपापल्या विधानसभा क्षेत्रांतील रस्त्याचे भूमिपूजन धूमधडाक्यात केले. मात्र, रस्त्याच्या कामाला अद्याप मुहूर्त लाभला नसल्याने ऐन पावसाळ्यात रस्त्याचे काम सुरू होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात रस्त्याचे काम करण्याबाबत नागरिकांनी नाराजीचा सूर आळवला आहे.
उल्हासनगर पालिका रस्ताबांधणी व दुरुस्तीवर दरवर्षी ४० कोटींहून अधिक जास्त रक्कम खर्च करते. तरीही, रस्त्याची दुरवस्था कायम आहे. ठेकेदार, महापालिका अभियंता, स्थानिक नगरसेवक यांच्या संगनमतातून दरवर्षी त्याच त्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाते. मोर्यानगरी ते व्हीटीसी मैदानदरम्यानच्या रस्त्याचे काम दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च करूनही सहा महिन्यांत रस्ता खराब होतो. रस्त्याच्या बांधणी व दुरुस्तीवर गेल्या पाच वर्षांत कोट्यवधींचा खर्च पालिकेने केला.या रस्ते घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास पालिका अधिकाऱ्यांसह स्थानिक नगरसेवक तुरुंगात जातील.
शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत आरडाओरड सुरू झाल्यावर रस्त्यांची यादी महापालिकेने एमएमआरडीएकडे पाठवली. पाठवलेल्या यादीतील कामाला त्वरित मंजुरी मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह नगरविकास विभाग, राज्यमंत्री यांच्याकडे महापौर, उपमहापौर, आयुक्तांसह पक्षीय नेत्यांनी साकडे घातले. साई पक्षाचे प्रमुख जीवन इदनानी यांनी रस्ते, विकासकामे झाली नाही, असा आरोप करत सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा भाजपा श्रेष्ठींना दिला. त्यानंतर राज्यमंत्र्यानी दोनदा मुख्यमंत्र्यांची इदनानी यांच्याशी भेट घालून दिली. ३१ मार्चपूर्वी विकासकामाला चालना देण्याचे आश्वासन मिळाल्यावर पाठिंबा काढण्याचा इशारा इदनानी यांनी मागे घेतला. मध्यंतरी, एमएमआरडीएने ५० ते ५५ कोटी रुपयांच्या निधीतून सात ते आठ रस्त्यांच्या कामाला मंजुरी दिली. रस्त्याच्या मंजुरीचे श्रेय घेण्यासाठी उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी व अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर यांच्यात चढाओढ लागली. आमदार कलानी यांनी शहाड कटकेश्वर ते म्हारळगाव रस्त्यासह इतर रस्त्यांचे भूमिपूजन केले, तर दुसरीकडे २२ कोटींच्या निधीतील कैलास कॉलनी ते गायकवाडपाडा, भरतनगर ते डॉ. आंबेडकर चौक व लालचक्की ते व्हिनस चौकमार्गे सेक्शन रस्त्याचे भूमिपूजन गेल्या महिन्यात धूमधडाक्यात केले. दोन्ही आमदारांनी केलेल्या रस्त्याच्या भूमिपूजनाला दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, एकाही रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर काम सुरू केल्यास नागरिकांना येजा करण्याचा त्रास होऊन अपघाताची शक्यता आहे.
आमदार ज्योती कलानी व आमदार बालाजी किणीकर यांच्यातील श्रेयवादाच्या लढाईत रस्त्याची कामे रखडली असून आता ती ऐन पावसाळ्याच्या तोंडावर सुरू झाली, तर उल्हासनगरवासीयांचे अतोनात हाल होणार आहेत. महापालिका दरवर्षी रस्ते दुरुस्तीवर मोठी रक्कम खर्च करते. मात्र, काही महिन्यांत रस्ते खराब होतात. या घोटाळ्याची चौकशी झाली तर संबंधित अधिकारी, नगरसेवक गजाआड जातील, याबाबत संदेह नाही.
१८५ कोटींची विकासकामे एमएमआरडीएकडे धूळखात पडून
शहरातील मुख्य रस्त्यासह इतर विकासकामांचे १८५ कोटींचे प्रस्ताव एमएमआरडीएकडे पडून आहेत. त्या कामाला शासनाने व एमएमआरडीएने मंजुरी दिल्यास शहरातील बहुतांश रस्ते चकाचक होणार आहेत. ५० कोटींच्या निधीतून मुख्य सहा ते सात रस्त्यांचे भूमिपूजन झाले असून एका वर्षात रस्त्यांचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. ३१ मार्चपूर्वी इतर विकासकामांच्या प्रस्तावाला मान्यता मिळणार असल्याचे भाकीत सत्ताधारी भाजपा-साई पक्षाने केले आहे.
महापालिका निधीतील बांधकामे संथगतीने
शहरातील मुख्य चार रस्त्यांसाठी २० कोटींच्या निधीची तरतूद महापालिकेने केली. व्हीटीसी ते मानेरे रस्त्यासाठी साडेचार कोटी, काजल पेट्रोलपंप ते विठ्ठलवाडी स्टेशन रस्ता पाच कोटी, नेहरू चौक ते फॉरवर्ड लाइन रस्त्यासाठी सहा कोटी, तर जिजामाता ते स्टेशन रोडसाठी पाच कोटी असा एकूण २० कोटींचा निधी आहे. तिन्ही कामे संथगतीने सुरू असून पावसाळ्यात रस्त्यात चिखलाचे साम्राज्य उभे ठाकणार आहे. रस्त्यातील अर्धवट काम व चिखलामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराला महापालिकेसह ठेकेदार जबाबदार असल्याचा आरोप शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी केला आहे.

Web Title: Kalani-Kinnik tracked roads

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.