ऑपरेशन मुस्कान व्हावे मिशन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 11:27 PM2018-12-10T23:27:29+5:302018-12-10T23:28:36+5:30

विविध कारणास्तव अडचणीत किंवा घरापासून दूर असलेली मुलं पुन्हा स्वगृही परतावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर मुस्कान यावी यासाठी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू आहे.

Operation Smile to be Mission | ऑपरेशन मुस्कान व्हावे मिशन

ऑपरेशन मुस्कान व्हावे मिशन

- विजय जाधव

विविध कारणास्तव अडचणीत किंवा घरापासून दूर असलेली मुलं पुन्हा स्वगृही परतावी आणि त्यांच्या चेहऱ्यावर मुस्कान यावी यासाठी महाराष्ट्रात ‘ऑपरेशन मुस्कान’ सुरू आहे. या माध्यमातून अनेक मुले सुरक्षित स्वगृही परतली आहेत तर काही प्रतीक्षेत आहेत. शासनाच्या या उपक्रमात यंत्रणा आपापले काम करत आहेतच. मात्र त्यातील प्रत्येक घटकाने मुलांबाबत विचार करताना आपले मूल समजून निर्णय घेतला पाहिजे. ज्या संस्था, संघटना, पोलीस मुलांना घेऊन येतात त्यांचा आदर केला पाहिजे. कायदेशीर प्रक्रि येत काम करणाºयांना सक्षम केले पाहिजे आणि महत्त्वाचे म्हणजे समाज बालप्रेमी झाला पाहिजे. तर मुलांच्या दृष्टीने समस्या कमी होऊन त्यांचे पुनर्वसन होईल आणि ऑपरेशन मुस्कान हे मिशन होईल.

ऑपरेशन मुस्कान नंबर ३ सध्या महाराष्ट्रात सुरु आहे. प्रत्येत मूल हे निरागस असते. या निरागस चेहºयावरचे हास्य हे वेळप्रसंगी अनेक समस्यांवर उपाय ठरते. मुलांच्या चेहºयावर हास्य यावे, जी मुले अडचणीत आहेत किंवा ज्या मुलांना घरी पोहोचवण्यासाठी विलंब झालेला आहे, अशा मुलांचे मुस्कानच्या माध्यमातून पुनर्वसन करायचे व त्यांच्या चेहºयावर हसू आणायचे म्हणजेच ‘ऑपरेशन मुस्कान’ होय.
महाराष्ट्र शासनाने याबाबत चांगला उपक्रम राबविला आहे. अनेक मुले या माध्यमातून कुटुंबाकडे पुन्हा सुरक्षितपणे पोहोचली सुद्धा आहेत. तर काही मुले अद्यापही कुटुंबाच्या प्रतिक्षेत आहेत. परंतु मुलांच्या समस्या या विषयावर बोलताना किंवा काम करताना ज्या शासकीय यंत्रणा आहेत किंवा संबंधित विभाग आहेत, त्यातील व्यक्ती म्हणजेच अधिकारी, कर्मचारी मनाने बालप्रेमी असणे खूप महत्त्वाचे आहे.
समतोलने घेतलेल्या विविध अनुभवातून अनेक बालके जेव्हा संपर्कात येतात, तेव्हा सुरूवातीला ती नेहमीच खोटे बोलतात. परंतु, त्यावेळी मुलांचा पूर्ण विश्वास आपण जिंकलेला नसतो. शिवाय ही समोरील व्यक्ती मला मदत करेलच का याचीही त्या मुलाला खात्री नसते. म्हणून अनेकदा मुले खोटे बोलतात. त्याचप्रमाणे पोलिसांच्या बाबतीत हाच विषय आहे. मुले पोलिसांना बघितल्यावर घाबरतात, म्हणून बालन्याय अधिनियम कायद्यामध्ये पोलिसांनी वर्दी न घालता सिव्हील ड्रेसमध्ये मुलांबरोबर बोलावे असा नियम सांगतो. परंतु, रेल्वे पोलीस बाल कल्याण अधिकारी यांना हा नियम लागू आहे की नाही असा प्रश्न पडतो. कारण त्यांचा चाईल्ड ऑफिसर कधीही सिव्हील ड्रेसमध्ये नसतो. बालअधिनियम २०१५ च्या कलम १०७ पोट कलम (१) नुसार प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये पद निर्देशित अधिकारी असतो.

समतोलच्या संपर्कात रेल्वे स्टेशनवर सापडणारी मुले जेव्हा बालकल्याण पोलीस अधिकारी व यांच्याकडे नेली जातात, तेव्हा कोणी त्या बालकांकडे बघतसुद्धा नाही. आमचे कार्यकर्ते त्या मुलांना आरोपी असल्यासारखे घेऊन थांबतात. पोलिसांना वेळ मिळेल तेव्हा ते पोलीस स्टेशनमध्ये आलेल्या मुलांची विचारणा करतात, तेही दम देऊनच. तो अधिकारी कायद्याच्या यंत्रणेत असूनही त्याला कायदा माहीत नसतो हे मोठे दुर्दैवच आहे. शिवाय या बालकाविषयी असणारी संवेदनशीलता तर फार दूरच असते. त्यामुळे त्या मुलामध्ये पोलीस स्टेशनला गेल्यावर सुरक्षिततेच्या ऐवजी भीतीची भावना तयार होते. अशावेळी त्या अधिकाºयाची कीव येते. तिथे न बालप्रेमी वातावरण असते, ना बालप्रेमी पोलीस कायदे फक्त कागदावरच असतात. प्रत्यक्षात वस्तुस्थिती खूपच वेगळी असते. इथे पोलीस सहकार्य करत नाही असा मुद्दा नाही. परंतु, मुस्कान हे रोजचे ऑपरेशन आहे हा मुद्दा आहे.

खरंतर या मुस्कान ऑपरेशनमध्ये फक्त पोलिसांचीच जबाबदारी आहे, असे नाही. संबंधित यंत्रणेचीही तेवढीच जबाबदारी आहे. बाल कल्याण समिती हा तर त्यातील प्रमुख भाग आहे. मुलांच्या कायद्याबाबतचे प्रशिक्षण हा भाग इथे खूप महत्त्वाचा असतो. रेल्वे एसओपी, मिसिंग एसओपी हे तर अनेकांना माहित नाही. समतोलचे कार्य वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर चालते. त्यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, जळगाव, अकोला येथे सुद्धा सध्या सुरु आहे. काही ठिकाणी तर बालकल्याण समितीला मूल स्वत: येऊन मदत मागू शकते, याबाबतही शंका येते. आरपीएफ, जीआरपी, स्टेशन मॅनेजर या सर्वांची जबाबदारी रेल्वे स्टेशनवर आहेच, पण समाजातील नागरिकही तेवढेच जबाबदार आहे. पण हे न्याय देणाºया समितीला माहित असणे गरजचे आहे. आपल्या सोयीनुसार वागणे हे सर्वांनाच सोपे असते. पण, जबाबदारी घेतली आहे त्यांच्या मदतीनुसार आपले कर्तव्य असावे हे अनेकजण विसरतात.

समतोलच्या संपर्कात येणारे अनेक बालके ही मदतीची भावना घेऊनच आलेले असतात. त्यामुळे त्यांना मदत करणे हे आपले कर्तव्यच आहे. बालकांसाठी आपण आहोत हे विसरून चालणार नाही. अनेक समितीच्या निवड प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असणेही महत्त्वाचे आहेच. त्या त्या यंत्रणा काम करतात, परंतु त्या यंत्रणांमध्ये काम करणाºया व्यक्ती ही माणूसच असतात. मुलांच्या समस्या हा परिवारातील समस्येचा भाग आहे आणि परिवार हा सगळ्यांचा असतो. शिवाय ‘हे विश्वची माझे घर’ असे आपली परंपरा सांगते. त्यामुळे मूल कोणाचेही असले तरी ते आपलेच आहे, अशी भावना ठेवूनच त्या मुलाला यंत्रणा, समिती यांनी मदत केली पाहिजे.

समतोलच्या संपर्कात नेहमीच मुले येतात. त्यामुळे मुलांना मदत करण्यासाठी विविध यंत्रणांना सोबत घेऊनच कार्य करावे लागते. कधीकधी त्यांना कामाचा ताण होतो की, काय माहित नाही. कधी फोन बंद असतो, तर कधी ओरडून बोलणे असते तर कधी मुले आणूच नका असे बोलले जाते.

मी स्वत: आयोगाचा सदस्य असूनही वस्तुस्थिती बदलू शकत नाही. पण मनापासून काम करणे ही बालप्रेमी व्यक्तीची गरज आहे. त्यामुळे आपल्याला यामध्ये सुधारणा आणायची असेल तर बालप्रेमी व्हावेच लागेल. अन्यथा कोर्ट, सरकार, आयोग, विभाग हे आपले काम करतीलच; पण समस्या मात्र तेथेच राहतील. आपला समाज सक्षम व्हायचा असेल तर भावी नागरिक असलेल्या मुलांना योग्य प्रशिक्षण देणे महत्त्वाचे आहे. त्यांची सुरक्षा आणि प्रत्येक कामात त्यांचा सहभाग वाढवणे महत्त्वाचे आहे. मुलांना आणि पर्यायाने कुटुंब सक्षम बनवायचे असेल तर मुलांना समजून घेऊन तसे वागले पाहिजे. मुस्कान आॅपरेशन हे मिशन होण्यासाठी जनजागृती होणे गरजचे आहे. समतोल फाउंडेशन यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून गरज आहे ती सहकार्याची.

(लेखक महाराष्ट्र राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगाचे सदस्य आहेत.)
 

Web Title: Operation Smile to be Mission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.