‘औदुंबर’कार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 10:02 PM2018-05-06T22:02:35+5:302018-05-06T22:25:01+5:30
बालकवींचा ५ मे १९१८ रोजी अपघाती मृत्यू झाला, या घटनेला १०० वर्षे उलटून गेलीत. त्यानिमित्ताने बालकवींचे स्मरण...
- राजीव जोशी
त्र्यंबक बापूजी ठोमरे ‘बालकवी’ मराठी कवितेतलं अलौकिक पान. अवघं २८ वर्षांचं आयुष्य जगलेल्या या कवीनं आपली पहिली कविता वयाच्या तेराव्या वर्षी लिहिली. जेमतेम १०-१५ वर्षांच्या कालखंडात ठसठशीत अशा एकूण १६३ कविता मराठी काव्यविश्वाला दिल्यात. बालकवींचा ५ मे १९१८ रोजी अपघाती मृत्यू झाला, या घटनेला १०० वर्षे उलटून गेलीत. त्यानिमित्ताने बालकवींचे स्मरण...
बालकवी म्हटले की, त्यांच्या अनेक प्रसिद्ध कवितांमधली ‘औदुंबर’ कविता आठवते. लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्रातले बालकवी आठवतात आणि आठवते लक्ष्मीबाई, रेव्हरंड ना.वा. टिळक आणि बालकवी यांच्यातले घट्ट भावबंध स्पष्ट करणारी सदानंद रेगे यांची ठोमरे कविता. केवळ २८ वर्षे जगलेल्या बालकवी या होली घोस्टविषयी, व्यक्तिमत्त्वाविषयी मनात औत्सुक्य निर्माण करते.
‘आई माझ्या मनात एक औदुंबर उगवतोय, त्याचा ठणका लागलाय सारखा’ या ओळी आपल्याला औदुंबर कवितेकडे जणू काही खेचताय, असा अनुभव येताना ‘वेणी फाऽर फुलराणी, माय फुलराणी’ या ओळीतून बालकवींची भावावस्था डोळ्यांसमोर येत असतानाच रुळांवरून धावत सुटणं... भादली रेल्वेस्टेशनचे रूळ मुख्य लाइन ओलांडून दुसऱ्या लाइन्समधून जाताना बालकवींचा जोडा रुळात अडकतो, ते काढण्यासाठी वाकतात आणि रेल्वे इंजीनची धडक... तुळशीच्या पांदीतून पाहतापाहता निर्झरासारखा धावणा-याचा ठिपका होणं, आकाशात दिसेनासं होणं.. तो दिवस होता ५ मे १९१८. बालकवींच्या जाण्याने टिळक कुटुंब हादरले, गडकरी काही दिवस वेड्यासारखे झाले होते.
बालकवी दिव्याच्या भुलावणीत रममाण होऊन गेलेला कवी. या कल्पनेचा साक्षात्कार बालकवींना वारंवार होई, निसर्गाच्या सौंदर्याने ते वेडे होत. कधीकधी बालकवी, निसर्गकवी म्हणावं की, निसर्गात गवसणा-या दिव्य सौंदर्याचे कवी, असाही प्रश्न पडतो. मेघाचा कापूस, पाऊस, श्रावणमास, औदुंबर अशा कवितांत ते निसर्गाचा तपशील बारकाव्याने भरतात. बालकवींची कविता निसर्गसौंदर्याने सुरू होत असली, तरी कवीच्या संवेदनांनी भारावून टाकते. मानवी भावनांचे आरोप केलेली निसर्गदृश्ये, हृदयाच्या अंतर्हृदयाला काळोखून टाकणारी उदासीनतेचं भावार्त चित्रण, सुकुमारतेचं रूपलावण्य लाभलेली भाषाशैली या संचिताने बालकवींच्या कविता आजही अवीट अशा माधुर्याने रसिकांना मोहवीत आलेल्या आहे, सौंदर्याच्या कळा आवाहन करत आहेत आणि कवितेतील अढळ सौंदर्य उलगडण्याचे अथक प्रयत्न आजही होत आहे.
औदुंबर केवळ आठ ओळींचीच कविता...
‘ऐल तटावर पैल तटावर हिरवाळी घेऊन। निळासावळा झरा वाहतो बेटाबेटांतून। चार घरांचे गाव चिमुकले पैल टेकडीकडे। शेतमळ्यांची दाट लागली हिरवी गर्दी पुढे। पायवाट पांढरी तयातुनि आडवीतिडवी पडे। हिरव्या कुरणामधुनि चालती काळ्या डोहाकडे। झाकळुनि जळ गोड काळिमा पसरी वाट्यावर। पाय टाकूनि जळात बसला असला औदुंबर...’
कवितेचा विषय अगदी साधा आहे. मोजक्या अचूक शब्दांत एका देखाव्याचे वर्णन आहे. सोयीसाठी कवितेच्या पहिल्या चार ओळींचा पूर्वार्ध आणि दुसºया चार ओळींचा उत्तरार्ध असे भाग केलेत, तर पहिल्या भागात ओढा, टेकड्या, गाव, शिवारे यांचं विलोभनीय दृश्य आहे, कवीने कदाचित डोंगरमाथ्यावरून कधीतरी पाहिलेले, अनुभवलेले. मात्र, जसे पाहिले तसे ते सांगितले, असे ते नाहीये तर त्याही पलीकडे काहीतरी उरलंय. झरा वाहतोय, पण कसा ऐल तटावर।पैल तटावर, हिरवाळी घेऊन. इथे ऐल तट आणि पैल तट या नादमधुर शब्दसंकल्पनातलं नर्तन रसिकाच्या अंतर्मनाला वाहणाºया प्रवाहाचा वेग, गती सूचित करतं. ‘शेतमळ्याची दाट लागली हिरवी गर्दी पुढे’ या ओळीत दाट आणि गर्दी या समानार्थी शब्दांची द्विरुक्ती अर्थाला समृद्ध करणारी आहे. ‘हिरवी गर्दी’ शब्दप्रयोग अर्थाला अधिक वजन प्राप्त करून देतो.
विस्तारलेल्या, खुल्या आणि कोवळ्या उन्हाने न्हाऊन निघालेल्या दृश्यात, खेळकरपणे खळखळणारा, धावणारा झरा, दवबिंदंूनी चमचमणारी हिरवळ, टेकडीपलीकडलं टूमदार गाव आणि हिरवीगार शेते हे कवीने पाहिलेलं दृश्य शब्दातून दूरवर क्षितिजापर्यंत कुशीत घेणारं विहंगम झालेलं आहे.
पुढच्या चार ओळी ‘पांढºया पायवाटेने आडवीतिडवी पडे’ कवीच्या बदललेल्या चित्तवृत्तीची साक्ष देणाºया आहेत. ऐल तटावर पैल तटावर ही शब्दरचना नर्तनाचं नादमूल्य सूचित करते, तर आडवीतिडवी या शब्दप्रयोगातून ठेचाळणं, अडखळणं, पडत-धडपडणं सूचित होतं. नंतरच्या या चार ओळी पूर्वार्धातल्या वर्णनाशी संपूर्णपणे विसंवादी आणि विरोधी आहे. झºयाप्रमाणे पायवाटेच्या दोन्ही बाजूला हिरवी कुरणं आहेत, मात्र हिरव्या कुरणातून पायवाटेचं काळ्या डोहाकडे जाणं कवी सूचित करतोय आणि म्हणूनच झºयाप्रमाणे पायवाटेचं अस्तित्व खेळकर, आनंदी न राहता त्राण नसलेलं, निरुत्साही, दु:खी व हताशपणे काळ्या डोहाकडे आहे, जणू काही विसर्जित होण्यासाठी, बुडण्यासाठीच. बालकवी झरा, गाव, शिवारं या आनंदी दृश्यातून काळ्या डोहाकडे जाणाºया पायवाटेने वाचकाला नेतात जिथे झाकळूनि जळ, गोड काळिमा लाटांवर पसरलेली आहे आणि औदुंबर जळात पाय टाकून बसलेला आहे. विहंगमतेतून काळ्या डोहाकडे जाण्याचा आणि त्या डोहातील कोंदलेल्या अंधाराच्या व्यामोहात जीव दडपल्याचा अनुभव ‘हे दिसूनही मज न दिसेसे होई। समजून मनाला काही उमजत नाही, व्यामोह भयंकर दुस्तर भरला भारी, की जीव दडपतो मम निद्रेमाझारी’ अशा शब्दांत ‘हृदयाची गुंतागुंत’ या कवितेत बालकवींनी उघड केलेली आहे.
पहिल्या सहा ओळींत आनंदातून दु:ख या विरोधातून शेवटच्या दोन ओळीत चित्तवृत्ती औदुंबरापाशी येऊन ठेपतात. काळा डोह या शब्दातूनच खिन्नता सूचित होते, मात्र औदुंबर प्रतिमेत संन्यस्त मनाने स्थितप्रज्ञतेने जगाकडे पाहण्याचेच भाव येतात. काळ्या डोहावर स्वत: कवीचं औदुंबर होऊन पाण्यात पाय सोडून बसणं, तेही निर्विकार शून्य मनाने... यात कवीने मानवाचं आरोपण केलेलं आहे. ‘पाय टाकूनी जळात बसला’ या ओळीने औदुंबराला मानवी जिवंतपणा आलेला आहे. मुळात औदुंबर विरागी वृत्तीचं निदर्शक आहे. या वृत्तीला पोहोचलेल्यापाशी आर्तता, असंतोष नावालाही राहत नाही, निरासक्तीत प्राप्त झालेला आनंदच वैराग्यात सामावलेला आहे, म्हणून गोड काळिमा असं कवीला सूचित करायचं असावं.
आशा-निराशेच्या द्वंद्वाच्या अनुभवाला पूर्तता देणारा औदुंबर एका विकल अवस्थेला नेणारा आहे. जगाला उबगलेल्या आणि तरीही आलेल्या वैराग्यात शांत व गंभीर राहणा-या कलावंताच्या जीवनात विश्वाविषयीचं आकर्षण, नंतर आलेला उद्वेग आणि वैराग्य असे तीन अवस्थांतराचं औदुंबर कविता प्रतीक आहे.
बालकवी म्हणताच डोळ्यांसमोर येतात त्या त्यांच्या निसर्गकविता आणि उदासीनता आळवणाºया कविता. निसर्ग आनंद, प्रेम, सौंदर्य, चैतन्य, दिव्यत्व अशा गुणांनी भरलेला आहे.
बालकवींच्या काव्यसंभारात ३५-४० निसर्गकविता आहेत. आनंदीआनंद, पारवा, अरुण, निर्झरास, औदुंबर, पाखरास, फुलराणी, तारकांचे गाणे, श्रावणमास, खेड्यातील रात्र, मधुयामिनी, संध्यारजनी, फुलपाखरू, फुलवेली, मेघांचा पाऊस इत्यादी. सर्व कवितांच्या वैशिष्ट्यांत ओसंडणारा आनंद, सृष्टीसौंदर्याविषयीची अनुरक्ती, दिव्य तेजाची भक्ती, मांगल्याचा हव्यास, शांतीविषयीची ओढ, निसर्गावर केलेला मानवी भावनांचा आरोप आदींचा समावेश आहे. मात्र पारवा, औदुंबर अशा मोजक्या पाचेक कविता अशा आहेत, ज्यात व्यवहाराच्या बसलेल्या चटक्यांनी आविष्कारात नैराश्य आणि खिन्नतेची काळिमा पसरलेली मनोवृत्ती दिसते. औदुंबर कविता त्यातल्या निसर्गवर्णनाच्या पलीकडे जाते आणि औदुंबराचं गूढत्व आजही रसिकांना मोहवतं.
joshrajiv@gmail.com