तरूणाईला ‘अंमली’ विळखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 12:30 AM2018-06-24T00:30:05+5:302018-06-24T00:30:21+5:30
अंमली पदार्थांची सहज उपलब्धता आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी असलेल्या अनभिज्ञतेमुळे तरूण पिढीभोवती अंमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतोय.
- राजू ओढे
अंमली पदार्थांची सहज उपलब्धता आणि त्याच्या दुष्परिणामांविषयी असलेल्या अनभिज्ञतेमुळे तरूण पिढीभोवती अंमली पदार्थांचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होतोय. कुटुंबच्या कुटुंब उदध्वस्त करणारी ही समस्या समाजासाठी अत्यंत गंभीर स्वरूपाची असली, तरी या समस्येचा बिमोड करण्याची जबाबदारी असलेली यंत्रणा सर्वार्थाने सक्षम नाही.
अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने सरकारी यंत्रणेकडून सर्वत्र जनजागृती केली जाते. अंमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणाम पटवून देण्यासाठी ठिकठिकाणी पथनाट्ये सादर केली जातात. सोशल मीडियाचाही यासाठी मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या उपक्रमाचे महत्त्व निश्चितच आहे; मात्र तेवढ्याने ही समस्या सुटण्यासारखी नाही.
अलीकडच्या काही वर्षांमध्ये या समस्येची पाळेमुळे समाजात खोलवर रूजली आहेत. झपाट्याने बदलत चाललेली जीवनशैली, पाश्चिमात्य संस्कृतीचा शिरकाव, आई-वडील आणि मुलांमध्ये निर्माण झालेला दुरावा यासारखी अनेक सामाजिक कारणेही या समस्येला खतपाणी घालत आहेत. आई-वडील दोघेही नोकरी किंवा व्यवसायात गुंतलेल्या कुटुंबांची संख्या कमी नाही. वाढत्या महागाईमुळे अशा कुटुंबांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या कुटुंबांमधील मुलांकडे कुणाचे फारसे लक्ष नसते. वाईट मित्रांची संगत लागून ही तरूण मुले व्यसनांच्या आहारी जातात.
मुंबई आणि ठाण्यात अंमली पदार्थांच्या तस्करांचे मोठे जाळे आहे. ठाण्यात मुख्यत्त्वे मुंब्रा तर मुंबईत कुर्ला भागात या तस्करांचे अड्डे आहेत. गांजा, एमडी, चरस यासारख्या अंमली पदार्थांची विक्री येथे राजरोसपणे होते. तरूणांना व्यसनाच्या आहारी लावण्यासाठी तस्करांचे हस्तक कार्यरत असतात. महाविद्यालय तसेच वसतीगृह परिसरात या हस्तकांचा ठिय्या असतो. हे महाविद्यालयीन तरूणांशी मैत्री करून, त्यांना सिगारेटमधून अंमली पदार्थ पिण्यासाठी देतात. यासाठी त्यांच्याकडून सुरूवातीला ते एक पैसाही घेत नाहीत. मात्र तरूणाला एकदा का सवय लागली की मग त्याच्याकडून पैसे उकळण्यास सुरूवात केली जाते. व्यसनाच्या अधीन गेलेली ही तरूण मंडळी हळुहळू घरातील पैशावर हात मारू लागतात. पैशासाठी वाईट वळणावर जाण्यास ते मागेपुढे पाहत नाही. ठाण्यात वर्षभरापूर्वी घडलेले असेच एक प्रकरण तरूणांची मानसिकता स्पष्ट करणारे आहे. ठाणे जिल्ह्यातील या तरूणाने पैशासाठी मित्राच्या आईला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी चौकशी केली असता हा तरूण व्यसनांच्या आहारी गेला होता. त्यासाठी त्याला पैशाची गरज होती. सुशिक्षित कुटुंबातील या तरूणाने कुटुंबाच्या नकळत घरामध्ये चक्क अफूचे झाड लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. मुले मोठी झाली, महाविद्यालयात जाऊ लागली म्हणजे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असा गैरसमज बाळगणाऱ्या पालकांनी यातून शिकण्याची गरज आहे. मुला-मुलींमध्ये आजकाल कुणी भेदभाव करीत नाही. ते योग्यही आहे. अशा मित्र-मैत्रिणींच्या अधुन-मधून पार्ट्या होत असतात. जुनाट विचारसरणी झटकून सुशिक्षित पालक त्यांना पार्ट्यांसाठी परवानगी देतात. मात्र या पार्ट्यांमध्ये नेमके काय चालते, मुलं घरी नेमक्या कोणत्या अवस्थेमध्ये येतात याकडे लक्ष देण्याची जबाबदारी पालकांचीच असते. आई-वडिलांनी मुलांकडे योग्य लक्ष दिले आणि आवश्यक तेवढा धाक ठेवला तर ही समस्या बºयापैकी नियंत्रणात येईल, असे मत या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्त केले.
गेल्या काही वर्षांत तरुणाईमध्ये अंमली पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. मुंबईतील कुर्ला व ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा हे अमली पदार्थांच्या विक्रीची मोठी केंद्रे आहेत. कुठल्याही शाळा, महाविद्यालयांपाशी सहजपणे अंमली पदार्थ उपलब्ध होतात. कौटुंबिक वाद, स्पर्धा, ताणतणाव यातून मुक्ती मिळवण्याकरिता अंमली पदार्थांच्या सेवनाचा घातक मार्ग पत्करला जातो. मंगळवार २६ जूनच्या अंमली पदार्थ विरोेधी दिनानिमित्त घेतलेला आढावा...
कोरेक्ससारख्या औषधांचा साठा औषधी दुकानदाराव्यतिरिक्त अन्य कुणी बाळगु शकत नाही. त्यामुळे अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून याविरोधात अधुन-मधून कारवाया केल्या जातात. अशा प्रकारच्या बºयाच प्रकरणांमध्ये औषधांचा साठा आरोपींनी परराज्यांतून आणल्याचे निष्पन्न झाले. काही प्रकरणांचे धागेदोरे गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये आढळून आले होते. तपासाची कक्षा राज्याबाहेर रूंदावली की यंत्रणेच्या अडचणी वाढतात. त्यामुळे अशा प्रकरणांचा तपास पुढे होत नाही.
अंमली पदार्थांच्या तस्करांचे जाळे वाढल्यानंतर २00८ साली ठाण्यात स्वतंत्र अंमली पदार्थ विरोधी पथकाची स्थापना करण्यात आली. या पथकाकडे पुरेसे मनुष्यबळ नसले, तरी या यंत्रणेने अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी केलेल्या काही कारवाया देशभर गाजल्या आहेत.
एप्रिल २०१६ मध्ये पोलिसांनी सोलापूर येथील एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडच्या फॅक्टरीवर छापा टाकून २ हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिनची देशविदेशात तस्करी करणाºया रॅकेटचा भांडाफोड केला होता.
अभिनेत्री ममता कुलकर्णी या प्रकरणात आरोपी आहे. एव्हॉन लाइफ सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेडमध्ये इफेड्रिनचे उत्पादन व्हायचे. हे इफेड्रिन केनिया येथे निर्यात केल्यानंतर रासायनिक प्रक्रिया करून त्याचे अंमली पदार्थात रूपांतर केले जायचे. अंमली पदार्थांच्या तस्करीची ही नवी शक्कल त्यावेळी उजेडात आली.