गणेशोत्सव मंडळांत कार्यकर्ते आहेत कुठे?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 03:59 AM2018-09-17T03:59:40+5:302018-09-17T04:00:22+5:30
डोंबिवलीतील काही मोजकी गणेशोत्सव मंडळे सोडली, तर बहुतांश मंडळांना कार्यकर्त्यांची उणिव प्रकर्षाने जाणवत आहे.
- अनिकेत घमंडी, डोंबिवली
/>
डोंबिवली ही सांस्कृतिक नगरी आहे. इथे दर शनिवार, रविवारी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. नृत्य, नाट्य, वक्तृत्त्व, चित्रकला यांचे नानाविध अविष्कार पाहण्याकरिता डोंबिवलीकर तुडुंब गर्दी करतात. त्यामुळे अनेक कलाकार गुणग्राही रसिकांची दाद मिळवण्याकरिता डोंबिवली गाठतात. साहजिकच गणेशोत्सव ही तर अशा सांस्कृतिक कार्यक्रमांकरिता पर्वणीच. परंतु डोंबिवलीतील काही मोजकी गणेशोत्सव मंडळे सोडली, तर बहुतांश मंडळांना कार्यकर्त्यांची उणिव प्रकर्षाने जाणवत आहे.
गणेशोत्सवात डिजे लावायचा नाही, आरास साकारताना थर्माकोल नको, रस्त्यावर मंडप घालण्यात महापालिकांच्या तांत्रिक अटी, परवानग्या अशा अनेक समस्यांचे गतिरोधक गणेशोत्सव मंडळांना ओलांडताना धक्के बसत आहेत. मात्र, कार्यकर्त्यांची वानवा हा गतिरोधक ओलांडताना अनेक मंडळांची दमछाक होत आहे.
डोंबिवलीत मराठी माणूस मोठ्या संख्येनी राहतो. एके काळी गिरगाव, दादर येथे वास्तव्य करीत असताना, ज्या मराठी माणसाने तेथील उत्सवात समरसून भाग घेतला, त्याच कुटुंबातील पुढील पिढी उत्सवांपासून अंग चोरून का राहत आहे? महाविद्यालयीन तरुणांना शालेय जीवनापासून करिअरचे वेध लागतात. तीन-चार पदव्या, पदविका असल्याखेरीज मनाजोगी नोकरी मिळत नाही. त्यामुळे एकाच वेळी वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा देण्यात महाविद्यालयीन तरुण व्यस्त असतात. त्यांना गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते म्हणून साधारणपणे महिनाभर धावपळ करण्याकरिता सवड असत नाही. जे तरुण नोकरी-धंद्याला लागले आहेत त्यांना कुठल्याही कार्यालयात अधिकृतपणे आठ ते नऊ तासांची ड्युटी असते. याखेरीज अतिरिक्त दोन तास द्यावे लागतात.
सर्वसाधारणपणे १० ते १२ तासांची ड्युटी व तीन तास प्रवास म्हणजे दिवसभरातील पंधरा तास आजचा तरुण डोंबिवलीबाहेर असतो. घरी परतल्यावर त्यांच्यात कुटुंबाशी चार शब्द बोलायचे त्राण उरत नाही. बहुतांश खासगी आस्थापनांमधील नोकऱ्या या कंत्राटी पद्धतीच्या असून सुट्यांची वानवा आहे. त्यामुळे गणेशोत्सवात कार्यकर्ता म्हणून मिरवण्याकरिता सुट्या घेण्याकरिता सवड काढणे अशक्य आहे. त्यामुळे एकीकडे अनेक नियम, कायदे यामुळे कल्पकतेला मर्यादा आल्या आहेत तर दुसरीकडे कार्यकर्ता घडण्याची प्रक्रिया ठप्प झाली आहे. हा मोठा पेच मंडळांसमोर आहे. अनेक मंडळ परंपरा टिकवण्यासाठी, उपक्रम बंद पडू नये पन्नाशी पार केलेल्या जुन्या कार्यकर्त्यांच्या बळावर झटत आहेत.
डोंबिवली शहर परिसरात लहान, मोठी अडीचशेहून अधिक गणेशोत्सव मंडळे आहेत. जी मंडळे राजकीय पक्षाच्या नेत्यांशी संबंधित आहेत त्या मंडळांकडे त्यांच्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते उपलब्ध आहेत. त्यांना कार्यकर्त्यांची चणचण जाणवत नाही. मात्र जी मंडळे राजकीय कंपूंच्या तावडीत नाहीत. त्यांच्याकडे कार्यकर्त्यांची चणचण आढळून येत आहे. काही वर्षांपूर्वी आरास साकारण्यासाठी आबालवृद्धांची धडपड, लगबग दिसून यायची. पण आता पीओपीची मूर्ती आणायची, फुलांची आरास अन्यथा आकर्षक विद्युत रोषणाई करायची, आरत्या, प्रसाद, भंडारा एवढ्या मर्यादीत कामकाजाचा विचार करताना मंडळे दिसून येतात. त्यामुळे गणेशोत्सवात सलग ११ दिवस तोच कार्यकर्ता उपलब्ध असेल, अशी परिस्थिती सध्या नाही. दीर्घकाळ गणेशोत्सवाशी संबंधित मंडळी या बदलत्या परिस्थितीबाबत खंत व्यक्त करतात. शिवसंस्कृती प्रतिष्ठान, सुधीर वंडार पाटील यांच्या माध्यमातून भरविण्यात येणाºया गणेशोत्सवात तसेच अन्य संस्थांतर्फे आयोजित गणेश दर्शन स्पर्धांसाठी फेरफटका मारल्यानंतर हीच खंत व्यक्त होते.
डोंबिवलीत राजाजी पथ, म्हात्रेनगर, रामनगर, शिवमंदिर रोड, संगीतावाडी, फाटकवाडी, एकतानगर, सुनील नगर, डिएनसी रोड, मानपाडा रोड, गोग्रासवाडी, एमआयडीसी, आजदे, पश्चिमेला म.गांधी रोड, कोपर रोड, संतोषी माता मंदिर रोड, जुनी डोंबिवली, पं.दिनदयाळ रोड, महात्मा फुले रोड, जयहिंद कॉलनी, रेतीबंदर रोड, गरिबाचा वाडा, राजू नगर, कुंभारखणपाडा, बावनचाळ, गणेशनगर, भागशाळा मैदान परिसर आदी सर्व ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. या सर्व ठिकाणच्या मंडळांमध्ये नव्याने कार्यकर्ता निर्माण होण्यासाठी मंडळांना प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे.
पूर्वी वर्गणी गोळा करण्यापासून डेकोरेशन साकारण्यापर्यंत लहानग्यांची मंडपांमध्ये झुंबड व लगबग दिसून यायची, पण तशी झुंबड, लगबग आता दिसून येत नाही. गणपतीच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत विविध उपक्रमांनी भरगच्च कार्यक्रमपत्रिका दाखवली जाते.
पण त्यातील अनेक उपक्रम हे उपस्थितीअभावी रद्द करावे लागतात. शाळा, महाविद्यालयांना फारशा सुट्या नसल्याने, शिकवण्यांमध्ये विद्यार्थी व्यस्त असल्याने एकेकाळी होणाºया वक्तृत्व, चित्रकला स्पर्धांना अत्यल्प प्रतिसाद लाभतो. परिस्थिती अशीच राहील तर नावाला गणेशोत्सव होतील, पण त्यामधून कार्यकर्त्यांची फळी मात्र वाढीस लागणार नाही, एवढे मात्र निश्चित.